Tuesday, June 6, 2006

शब्द शब्द जपून ऐक

आपल्या सर्वांनाच गाणी ऐकायला आवडतात. मग ते चित्रगीत असो, भावगीत असो, नाट्यगीत असो वा भक्तीगीत असो. मराठीत तर याचा जणू खजिनाच आहे. आणि विशेष म्हणजे बहुसंख्य गाणी फक्त त्यांच्या चाली अथवा गायकीमुळेच नाही तर त्यांच्या शब्दांमुळेही लोकप्रिय झाली आहेत. सर्वसामान्य लोकांना काव्यवाचनाची वगैरे खूप आवड नसली तरी अशा गाण्यांमधून येणाऱ्या कवीकल्पनांची आणि शब्दसौंदर्याची दखल ते घेतल्याशिवाय रहात नाहीत.

आपल्या अवतीभवती नेहमी काहीतरी घडत असतं. सामान्यतः आपल्याला याचे काही वाटत नाही पण एखादा कवी किंवा गीतकार तेच कसे वेगळ्या प्रकारे पाहतो याचे फार छान नमुने आहेत. " जे न देखे रवी, ते ते देखे कवी " असे म्हणतात ते काही खोटे नाही. घरात नवीन पाहुणा येणार म्हटलं की त्याचे भावी आई वडीलच नव्हे तर इतर सगेसोयरे सुद्धा मुलगा का मुलगी याची कितीतरी चर्चा करतात. पण हेच एखादी कवयित्री गीतात विचारते, "हाती काय येई, जाई की मोगरा?" (भरून भरून आभाळ आलंय)

प्रेम ही भावना बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. " नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी , परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी" असे म्हणणाऱ्या प्रेयसीची द्विधा मनस्थिती किंवा " समयीच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते, केसातच फुललेली जाई पायाशी पडते" अशा शब्दातील एका नववधूच्या मनातील कोमल भावना आरती प्रभू किती तरल आणि भावपूर्ण शब्दात सांगतात. एखाद्या प्रेमी युगुलाला एकमेकांचा स्पर्श रोमांचित करतो, पण सुरेश भटांसारखे कवीच लिहू शकतात "श्वास तुझा मालकौंस, स्पर्श तुझा पारिजात " (चांदण्यात फिरताना).

कॉलेजमध्ये असताना एखाद्या मुलीला " तू चवळीची कवळी शेंग दिसते" असे म्हटले तर त्याचे उत्तर "आणि माझी चप्पल अशी दिसते " असे मिळाले असते. पण शाहीर होनाजी बाळा यांनीच नाही का त्या "नारी ss ग" ला "जशी चवळीची शेंग कवळी " असे वर्णिले आहे? माझ्या एका मित्राने "ग साजणी " या पिंजरा चित्रपटातील गीतातला "प्रितीचं बेण तुझ्या काळजात रुजवावं" याचा अर्थ सांगितला होता. उसाची पेरणी करताना, डोळे असलेल्या उसाचा छोटा भाग शेतकरी मातीत रुततात, त्याला बेण म्हणतात. काय सुंदर व्याख्या आहे नाही? शेवटी प्रेमाइतक्या गोड भावनेला उसाशिवाय आणिक कशाची उपमा शोभेल? तसेच शांता शेळकेंनी केलेल्या तरुण मुलीचे वर्णन "जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात नागीण सळसळली " किती अप्रतिम आहे. कॉलेजच्या कट्ट्याकट्ट्यावर ही ओळ कितीतरी पिढ्या अजरामर राहील.

फक्त आनंदी गोष्टीच मोहक शब्दात मांडता येतात असे नाही. गंभीर आणि करुण प्रसंगही तितक्याच ताकदीने शब्दात मांडता येतात. "विरहात चिंब भिजुनी, प्रीती फुलोनी यावी " (स्वप्नातल्या कळ्यांनो) ही कल्पना जितकी करुण, तितकीच सुंदर! "कोण मेले कोणासाठी रक्त ओकून ?" (कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे) अशा भेदक प्रश्नातून एक विदारक सत्य सामोरी येते. "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे" हे गाणे जितके गायला अवघड , तितकाच त्याचा अर्थही खोल. "आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला, होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा ". बहुतेकांच्या जीवनातले नैराश्य आणि वैफल्य किती अचूकतेने टिपलय या काव्यपंक्ती मध्ये.

हा माझा एक छोटासा प्रयत्न होता गाण्यातल्या शब्दांचे सामर्थ्य आपल्यासमोर आणण्याचा. ही अपेक्षा बाळगून की यापुढे तुम्ही जेव्हा काही ऐकाल तेव्हा त्या शब्दांवर थोडे थांबाल, त्याचा अर्थ उकलण्याचा प्रयत्न कराल आणि त्याची गोडी चाखाल. कुणीसे म्हटलेच आहे "शब्द शब्द जपुनी ठेव, बकुळीच्या फुलापरी". आणि शेवटी "शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले " हे सांगायलाही शब्दांचीच गरज पडते, नाही का?

सुरेश नायर
२००६

Tuesday, February 21, 2006

की?

चंद्राचा  मंद  प्रकाश  की  तुझ्या  चेहऱ्याची  तजेलता
बावरल्या  हरणीचे  पळणे  की  तुझ्या  डोळ्यातली चंचलता

फुलपाखराचे  सहज  उडणे  की  तुझे  असे  बागडणे
वाऱ्याची  जराशी झुळूक  की  तुझे  उगी  गुणगुणणे

अंगावरून  मोरपीस  फिरणे  की  तुझा  हलका  स्पर्श
पाण्यावर  तरंगणाऱ्या  लहरी  की  तुझ्या  मनातला  हर्ष

जाईच्या  फुलांचे  कोमेजणे  की  तुझे  उगी  हिरमुसणे
काचेच्या  बांगड्यांचे  किणकिणणे  की  तुझे  निखळ  हसणे

मुग्ध  मी  मोहित  मी  की  कल्पनेत  मन  रंगलेले
सत्य  तू  असत्य  तू  की  स्वप्न  जागेपणी  पाहिलेले

 सुरेश नायर
२००६

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...