बरचसं काही वाचनात येतं, पण त्यातलं काहीच एकदम चटकन मनाला भावतं. इतक्यात वाचनात आलेल्या दोन कविता माझ्या मनात एकदम खोल घर करून राहिल्यात. एक म्हणजे बोरकरांची "संधीप्रकाशात" आणि दुसरी हेमंत गोविंद जोगळेकर यांची "होड्या". हेमिंग्वेच्या लघुकथा व त्याचं लेखनतंत्र वाचताना "Iceberg Theory " बद्दल वाचलं होतं. उघड उघड अगदी मोजक्या गोष्टीच मांडायच्या, पण बरचसं अनुत्तरीत तरी उकल करता येण्याजोगं ठेवायचं. "होड्या" मला तशीच वाटली. इथे मी त्या iceberg चा पाण्याखालचा भाग कसा असेल याचं एक कल्पनाचित्र मांडलंय. मला स्वतःला अजून एक - दोन तरी वेगळी चित्र दिसतायत. कुणाला कदाचित आणखी दिसतील.
होड्या
दास
अंकलकडे आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा ती भेटली. बाबा आणि दास अंकल चेस खेळत होते.
तिनं कॉफी आणि फरसाण दिला. बिट्टूला बरं नव्हतं म्हणून तो आणि आई घरीच होते. तो असता
तर आम्ही काहीतरी खेळलो असतो नाहीतर एकमेकांशी भांडलो तरी असतो. वेळ गेला असता. पण
मी एकटाच होतो म्हणून कंटाळलो.
मग
तिने मला तिच्या खोलीत नेले. टेबलावर खूपश्या
रंगाच्या बाटल्या आणि पेंटिंगचे ब्रश होते. आणि भिंतीवर सगळीकडे चित्रं
होती. बऱ्याचश्या चित्रात होड्या होत्या. निळं आकाश, डोंगर, हिरवं - निळं पाणी, कमळं, कधी बदकाची जोडी आणि होड्या. कधी समुद्रावर एकदम खुपश्या तर कधी
नदी किंवा तळ्यात एकटीच होडी.
"तू
काढल्यास?"
"हो"
"तुला
फक्त होड्याच काढता येतात का ?"
ती
हसली "नाही, बाकी सुद्धा काढू शकते . पण मला होड्या खूप आवडतात "
"का?"
"पाण्याच्या
लाटेवर झुलणारी होडी. त्यात बसून तरंगायला किती छान वाटतं. आईच्या कुशीत असावं तसं.
हवं तर वल्हव वापरायचा नाहीतर वारा घेऊन जाइल तिथे जायचं. कधी कुठला किनारा लागेल,
काय दिसेल कुणी सांगावं. तू येशील माझ्याबरोबर ?"
"माहित
नाही. बाबा रागावतील "
"ठीक
आहे. पण माझ्याबरोबर पावसाच्या पाण्यात तरी कागदाच्या होड्या सोडशील ना ? लहानपणी पावसाच्या
सरी आल्या कि मी होड्या करून वाहत्या पाण्यात सोडायचे आणि तिच्यामागे धावत जायचे. कागदीच
त्या, फार लांब जायच्या नाहीत. मग थांबून, गटांगळ्या खात त्या बुडाल्या कि मी खूप,
खूप रडायचे. मम्मीला मला समजावता समजावता नाकीनऊ
यायचं "
"त्यात
काय, दुसरी करायची"
"तू
देशील करून ? "
"हो,
देईन कि. कागद दे. पण आता पावसाळा नाहीये म्हणून पावसात सोडता नाही येणार "
"मग
आपण पावसाची वाट बघूयात.. .”
तिने
एक छान रंगीत चौकोनी कागद दिला. तो दोन वेळा दुमडून मी होडी केली आणि तिच्या पुढे धरली.
"वा.
सुरेख. किती छान केलीस. पुढच्या वेळी येशील तेव्हा आणखी करून दे "
मग
बाबांनी हाक मारली आणि आम्ही निघालो. मी वळून पाहिले तेव्हा तिच्या हातात ती होडी होती.
त्यानंतर
बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो. कधी कधी त्यांच्या चिंकू कुत्र्याला घेऊन गंधेकाका
सुद्धा यायचे. बाबा आणि दास अंकल चेस खेळायला लागले कि गंधेकाका मला त्यांच्या बरोबर
खेळायला घ्यायचे. ते बहुतेक बाबा आणि अंकल इतकं चांगलं खेळत नसावेत. ती चिंकुला बाहेर
घेऊन जायची. चिंकु तिच्यासोबत खूप छान खेळायचा.
दरवेळी
मी कुणाकुणाकडून शिकून घेतलेल्या वेगवेगळ्या होड्या करून तिला द्यायचो. थोड्याफार फरकाने
त्या सर्व सारख्याच होत्या पण नावे मात्र वेगवेगळी - बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची
होडी. ती मात्र एकदम डोळे मोठे करून आनंद झाल्याचं दाखवायची आणि शेल्फ वर ठेवायची.
मी दिलेल्या सर्व होड्या एका शेल्फ वर नीट मांडून ठेवल्या होत्या. भिंतीवरदेखील नवीन
नवीन चित्रं येत होती, काही चित्रात मी केलेल्यासारख्या होड्या होत्या असं मला वाटलं.
कधी
कधी आम्ही केलेला एक खेळ खेळत असू. डोळे मिटून दोघे होडीत बसलोय अशी कल्पना करायची
आणि आजूबाजूला जे काही दिसतंय ते सांगायचे. कधी फळाफुलांच्या बागा, कधी जंगल, प्राणी,
राक्षस, कधी मोठं शहर, असं खूप काही भरभरून सांगायचो. हसायचो. एकदम मजा यायची.
एकदा
मी गेलो तर तिच्याकडे एक सुंदर लाकडाची, नाजूक कोरीव काम केलेली होडी दिसली. माझ्या
होड्या ज्या शेल्फवर होत्या त्यात सर्वात मध्ये ती होती. मी विचारलं तर म्हणाली तिच्या
वाढदिवसाला कुणीतरी भेट म्हणून दिली.
"मैत्रिणीने
दिली ?"
ती
हसली "नाही मित्राने दिली. तुज्यासारखाच माझा एक खूप चांगला मित्र आहे. पण इतर
कुणाला माहित नाही. आमचं…. आणि आता आपलं गुपित आहे ते. कुणाला सांगू नकोस. नाही ना
सांगणार ? "
मी
मान हलवली "नाही सांगणार ". पण माझं
लक्ष त्या होडीकडेच होतं. तिच्या शेजारी माझ्या कागदी होड्या अगदी साध्या वाटत होत्या.
नंतर
जवळ जवळ लगेचच ते सगळे आमच्याकडे जेवायला आले. गंधेकाका सुद्धा चिंकुला घेऊन आले होते.
बिट्टू म्हणाला तिचं लग्न ठरलंय आणि ती परदेशी जाणार आहे म्हणून बोलावलंय. तो नेहमीच
कुणाचं काहीतरी ऐकतो आणि सगळ्यांना सांगत असतो म्हणा. ते आले तेव्हासुद्धा तोच सांगत
आला कि ती चालवत आली होती म्हणे गाडी.
सगळे
एकमेकांशी खूप बोलत होते. ती सुद्धा सगळ्यांशी चिक्कार बडबडली, नेहमीपेक्षा जरा जास्तच
जोरात बोलत, हसत होती. चिंकुशी सुद्धा खेळली. पण माझ्याशी नाही बोलली. मी फारसं बोललोच
नाही काही कुणाशी. फक्त दास अंकलनी दोनदा एकच प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं. ती
शेजारीच होती, आणि फक्त म्हणाली " पप्पा, तुम्ही कमालच करता !". ते निघाले
तेव्हा दारापर्यंत सगळेच गेलो. ती सगळ्याना बाय करत होती "बराय अंकल, बराय ऑन्टी,
टाटा बिट्टू, टाटा चिंकू " नंतर म्हणालीच नाही काही.
काही
दिवसांनी बाबा पुन्हा दास अंकलकडे घेऊन गेले तोस्तोवर ती गेली होती. अंकल म्हणाले माझ्याकरता
काहीतरी दिलंय, तिच्या खोलीत आहे. मी गेलो तर रंगाच्या बाटल्या आणि ब्रश असायचे त्या
टेबलावर फक्त एक बॉक्स होता. त्यात ती लाकडी होडी होती आणि रंगीत कागदांचा एक गठ्ठा.
मी शेल्फ वर पाहिलं तर तो मोकळा होता.
घरी
येउन तो बॉक्स मी माझ्या खोलीत कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेऊन दिला. त्यावर माझी
जुनी गोष्टीची पुस्तकं वगैरे ठेवली. बिट्टूला खेळ आवडतात, तो फारसा वाचत नाही.
त्यावर्षी
खुप उशिरापर्यंत पाउस पडला नाही. पडला तोही अगदी थोडा जेमतेम, भुरभुरा. पाणी जोरात
वहायलंच नाही. रंगीत कागदांचा गठ्ठा न उघडता तसाच राहिला. होड्या केल्याच नाहीत. पण
मला पुष्कळ होड्या येतात, बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची होडी आणि साधी होडी……
सुरेश नायर
३/१८/१६
(ब्लॉग वर हे प्रसिद्ध करायच्या आधी 'होड्या' कवितेचे कवी श्री. हेमंत गोविंद जोगळेकर यांची परवानगी घेतली होती. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार)
Where can I get this poem? In book or video or so?
ReplyDeleteअतिशय अप्रतिम अन्वेषण केलेय कवितेचे, हे मधे मधे येणारे होड्याचे प्रकार नसून मनस्थितीस्वरूप आहेत, आपण त्याला दिलेले कथारूप अव्वल असे आहे. कवितेच्या वेच्यात अडकलेले कथेचे बंध आपण लीलया सोडवले... सरळ सांगायचे तर आपण हुडकलेली प्रेमकथा वाचून रडायलाच आले... great you are
ReplyDeleteDhanyawad
Delete