Wednesday, March 23, 2011

एक कविता सुचते

रविवारची  सकाळ, लक्ख  कोवळे उन 
ओलेत्या  केसांनी,  नुकतीच  न्हाऊन,
 चहाचा  एक  कप, हसत, ती  हाती देते
सहज  मला  एक  कविता  सुचते

भर  दुपारची वेळ, हवा  कुंद कुंद
 वरांड्यात झोक्यावर, डुलकी घेत मंद
झोपेतच खुदकन, ती गालात हसते
सहज  मला  एक  कविता  सुचते

अशीच एक निशा, खोलवर  झुकली  दरी,
कड्याशी उभी स्तब्द, पदर वाऱ्यावरी
दाटणाऱ्या धुक्यात, ती पाहता पाहता विरते,
सहज  मला  एक  कविता  सुचते

पौर्णिमेची  रात्र, मग्न तळ्याकाठी
मारव्यात गुंफुवतो, साद तिच्यासाठी,
तळ्यात चंद्र दुणा होतो, ती जेव्हा येते,
सहज  मला  एक  कविता  सुचते

घरात, अंगणात, उन्हात, धुक्यात,  
दरीकड्यावर, कधी  तळ्यातल्या जळात
ती  दिसते, लपते, असते, नसते,
मला मात्र सहज एक  कविता  सुचते

सुरेश नायर
 मार्च, २०११ 

No comments:

Post a Comment

ये पावसा

ये पावसा मेघांचा रथ करुनी भेटून जा तू आनंदे बरसोनी  संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी  वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी सृष्टीच आहे सारी तुजसाठ...