एकदा एक हलवाईण(हलवायाची बायको) होती. ती फार वाईट होती. तिला मुले अजिबात आवडत नसत. ती मुलांना फसवायला गोड गोड शब्दात बोलवायची "अरे बाळांनो या, मी तुम्हाला छान छान मिठाई देते". मुले बिचारी खूप आशेने तिच्या दारात जायची. ती त्यांना मिठाई वाटायची. पण ती खरी नसायची. काही पदार्थ दूध खव्या ऐवजी पिठाचे असायचे. काही वरून खरे पण आत कडू कारले किंवा मिरचीचा ठेचा भरलेले असायचे. मुले बिचारी फसायची आणि पडके चेहरे, कडू-तिखट तोंडे घेऊन परत जायचे.
असे खुप दिवस चालले. मग एक दिवस मुले वैतागली. त्यांनी खूप प्रार्थना केली, मनधरणी केली तेव्हा एक देवदूत प्रकट झाला. त्याने मुलांची गोष्ट ऐकली आणि तो फार दुखी झाला. तो त्या हलवाइणीवर संतापला आणि त्याने तिला शाप दिला "यापुढे तुझी इच्छा नसतानाही तू या मुलांना रोज खरीखुरी मिठाई वाटशील. इतकेच काय तुझे रूप बिघडेल आणि तू चेटकिणी सारखी दिसशील. शिवाय वर्षातून एकदा सर्व लोक चित्रविचित्र सोंगे घेऊन मुलांना मिठाई आणि आणखी गोड पदार्थ वाटतील. आणि त्या दिवसाला तुझे नाव पडेल". इतके सांगून तो देवदूत अदृश्य झाला. मुले खूप आनंदली.
आणि अश्याप्रकारे दुष्ट हलवाइणीच्या वाईट कृत्याला आळा पडला. तिच्या नावाचा दिवस साजरा करत वर्षातून एकदा सर्व लोक मुलांना मिठाई आणि गोड पदार्थ वाटू लागले. पाश्चात्य भाषेत "ण" चा उच्चार नसल्यामुळे, पुढे "हलवाइण" या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्या दिवसाला "हलोवीन" असे नाव पडले.