Saturday, May 21, 2022

अक्षय गाणे, अभंग गाणे



रात्रीचे 10-11 वाजलेले. पूर्वीच्या आमच्या वाड्यात शेजारी कुणीतरी रेडीओवर छायागीत अथवा बेला के फुल लावलेलं. आर्त स्वरात तीचा आवाज येतो "छुप गया कोई रे दुरसे पुकारके"...

भेंड्या/अंताक्षरी खेळताना कुणी सुरू करतं "अजिब दास्ता है ये " आणि सगळे 'अं अं अं' करून कोरस धरतात...

गणपतीचे दिवस. चौकाचौकात मंडळाचे गणपती बसलेले आणि लाऊडस्पीकरवर "सुखकर्ता दुखहर्ता " किंवा "गणराज रंगी नाचतो" गात तिचा आवाज चौफेर घुमतो...

बाळ असताना आई मला "झिलमील सितारोंका" गात गात झोपवते. माझी वेळ येते तेव्हा मी माझ्या तान्ह्या मुलीला "ये रात ये चांदनी" गात झोपवतो...

"आयेगा आनेवाला" गाणारी मधुबाला, "आजा रे परदेसी" गाणारी वैजयंतीमाला, "ओ सजना" गाणारी साधना, "इन्ही लोगोने" गाणारी मीना कुमारी... मग हेमा, रेखा, राखी, झीनत, परवीन, पूनम, टीना, जुही, माधुरी, श्रीदेवी, काजोल, भाग्यश्री अश्या बहुपिढी नट्यांच्या ओठांवर गाणं गाताना सूर उमटतात ते तिच्याच आवाजात.

या जगात देव सर्वव्यापी असतो म्हणे. पण प्रत्यक्षात आपल्यासारख्या पामरांना तो दिसत नाही. लताचा आवाजही सर्वव्यापी आहे आणि (निदान आपण सर्व भारतीयांच्या) कानाला त्याचा पुण्यस्पर्श झालेला आहे व होत राहील. हे आपलं अहंभाग्य!

लताव्यतिरिक्त तिच्याआधी, ती असताना कितीतरी गुणी, उत्तम, गायक होऊन गेले व नंतरही होतील. त्यांची गाणी आपण रसास्वाद घेत ऐकतोदेखील. पण तिने सुगम संगीतात कुठेतरी एक benchmark स्थापन केलं. असं काय होतं तिच्या गाण्यात? खुपश्या गोष्टी नमूद करता येतील - वडिलांकडून आलेेला सांगीतिक वारसा, भक्कम शास्त्रीय पाया, सुरांचा आवाक (vocal range), स्वरांची शुद्धता, आवाजातला गोडवा, निरनिराळ्या भाषेत सहज गाता येणं, उत्तम रेकॉर्डिंगचं तांत्रिक सूत्र, शिवाय चिकाटी व शिस्तबद्धता.

पण यासाऱ्या पलीकडे तिच्या गाण्याची काहीतरी खासियत, काहीतरी गोम आहे की जेणेकरून ती गाणी आपल्याला भावतात. मग ते "लग जा गले असो", "रुक जा रात" असो, "दिल हुम हुम करे" असो की "दिया जले जा जले" असो. एखादा pause, एखाद अक्षरावर जोर किंवा हुंकार, कधी लाडिक आर्जव, कधी विरहांतीक आर्तता...या ना त्या प्रकारे त्या गाण्याचे सूर, त्याचे शब्द, त्यातले भाव आपल्या हृदयाला भिडून जातात. मग "बेकस पे करम" गाणारा आवाज फक्त लताचा नसून बेड्या घातलेल्या अनारकलीचा होतो, "चाला वाही देस" गाणारा आवाज सर्वकाही त्याग करून कृष्णाशी एकरूप होऊ पहाणाऱ्या मीरेचा असतो. "मुझे कुछ केहना है" किंवा "मेेरेे ख्वाबो में" गाणारी, कोवळ्या वयाची बॉबी किंवा सिमरन असते. ती गाणी पुन्हा पुन्हा न वीटता आपण ऐकतो.

हिंदी - मराठी चित्रपटात भलंमोठं यश पदरी असताना, गाण्यांच्या मागण्याची काही कमतरता नसताना दिदींची त्याबाहेरची कामगिरी तितकीच मोलाची आहे. भगवद्गगीतेतील अध्याय, संत ज्ञानेश्वर, तुकारामांचे अभंग/ विराण्या, मिराबाईंच्या रचना, गुरुबानी, गालिब व इतर ऊर्दू गजला, मराठी भावगीते, सावरकर गीते, शिवाय इतर भाषेतील विशेषतः बंगाली मधील गाणी या साऱ्याचा एक बहुमोल नजराणा आपल्या पदरी आहे. त्याचा अर्थ समजावून गायला, उच्चार शिकायला खचितच अधीक वेळ लागला असणार. म्हणूनच मी वर चिकाटी आणि शिस्तबद्धता ह्याचा उल्लेख केला.

तब्बल साठ-सत्तर वर्षे आपल्यावर स्वरांचा वर्षांव करून लता मंगेशकर नावाचा हा 'आनंदघन' नुकताच आपल्यातून दूर क्षितिजापल्याड गेला. स्वामी कादंबरीतली काही वाक्यं आहेत "आयुष्य किती जगलात, त्यापेक्षा ते कसं जगलात याला महत्व आहे. तसं नसतं तर चंदनाचे नावही राहिले नसते. साऱ्यांनी वटवृक्षाचे कौतुक केले असते". लतादीदी आपलं आयुष्य वटवृक्ष आणि चंदन दोन्हीला शोभेल असं जगून गेल्या. त्यांचा सांगीतिक वारसा एखाद्या वटवृक्षासारखा पारंब्या फोफाऊन उभा आहे, त्याचा सुगंध चंदनापरी पिढ्यानपिढ्या पसरत राहील. की स्वर्गातून देवाने आपल्यासाठी गाता-बोलता "स्वरांचा पारिजात" भेट पाठविला होता? 

काही असो शेवटी तिच्या गळ्यातून ती जे सांगून गेली तेच खरं "अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, माझे गाणे"

सुरेश नायर

4/2022

(महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईट च्या 'स्नेहबंध' पत्रकात प्रकाशित लेख)

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...