सुखाच्या कल्पना
प्रत्येकाच्या निराळ्या
कुणाला गुलाब हवा
कुणाला बकुळीच्या कळ्या
शेकडो श्वासांपैकी
तेवढेच आठवतात मला
जेव्हा जेव्हा त्यातून
तुझा गंध आला
तुझा गंध घेऊन येतो
वारा हा बेभान
पावलांना मग पंख फुटतात
शोधते रानोरान
वाऱ्याचा वेगही कधी
सहज मंदावतो
तुझ्या गंधाने वेडा
तोही छंदावतो
दुख्खामध्ये डोळ्यांनी
एवढे अश्रू गाळले
की सुखाकरता थोडे
आनंदाश्रूही नाही उरले
माझ्या गुणांचं कौतुक
तुला कधीच नव्हतं
सोडून जाताना कारण मात्र
माझ्या अवगुणांच होतं
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं
तुझ्या समवेत कळलेच नाही
रात्र कशी सरली
समयीची ज्योतही आता
हलकेच पेंगू लागली
सारं काही विसरायचं
मनात ठरवतो कधी
तेवढं मात्र विसरतो
बाकी आठवे सर्वकाही
कोरड्या अर्थशून्य जगात
एक तुझा स्पर्श ओला
ओसाड माळावरच्या बाभळीला
बांधलेला जणू झूला
रात्रीची झोपही
तूच दूर सरली
पहाटेची स्वप्नही
तुझ्या मिठीत विरली
सहज तुझे पाठीशी येऊन
कानाशी फुंकरणे
फुलपाखरू होऊन मनाचे मग
अलगदसे उडणे
कधी तुझा स्पर्शही मला
मोरपिसापरी भासे
आताशा तुझे श्वासही
वाटतात जणू उसासे
सत्यही कधी कधी
स्वप्नापरी भासतं
खरं मानायला माझं
मन तयार नसतं
पौर्णिमेचा चंद्र जसा
निळ्या तळ्यात तरंगतो
तुझा चेहरा तसा
माझ्या डोळ्यात हासतो