२०१२ साली डेट्रोईट मध्ये झालेल्या एका नाटकासाठी मी ही दोन गीते लिहिली आणि काही स्थानिक कलाकारांना घेऊन ध्वनिमुद्रित केली. एक जोडपं प्रेमात पडतं, त्यांचं लग्न होतं, काही कारणास्तव ते वेगळे होतात आणि पुढे अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात अशी काहीशी कथा. त्यामुळे एका गीताचा भाव आनंदी तर दुसऱ्याचा त्याहून उलट (somewhat regretful) असा.
भेटावा मजला तू असा, दरवळणारा गंध जसा,
भेटावी मजला तू अशी, एक अनावर ओढ जशी
गाण्यामधले शब्द पुराणे, उमजावे परी अर्थ नव्याने
भेटावा मजला तू असा, गाण्यामधला अर्थ जसा
स्वप्नी जे मी चित्र रेखिले, प्रीतीच्या रंगांनी भरले
भेटावी मजला तू अशी, स्वप्न घडावे सत्य तशी
हे जग जणू एक, मैफिल भासे, सूर न जुळता, अधीर श्रोते
भेटावा मजला तू असा, मैफिली गवसे, सूर जसा
पिंपळ पाने, कधी ठेविली, पुस्तकात जी खुण म्हणोनी
भेटावी मजला तू अशी, पानामधली खुण जशी
(शेवटची दोन कडवी रेकॉर्डिंग मध्ये नव्हती )
तुझी नि माझी प्रेमकहाणी, भूल जराशी सजाच भारी
भेटावी मजला तू अशी, चुकलेल्याला वाट जशी
चित्र दुभंगले संसाराचे, शाप कळ्यांना निर्माल्याचे
भेटावा मजला तू असा, पाषाणा रघुस्पर्श जसा
सुरेश नायर
८ / २०११