न सखा तो, न बंधू
न माता ती, न तात
असे जगाच्या पाठीशी
एका अज्ञाताचा हात
येते उधळीत प्रभा
रंग सोन केशरी
नक्षी ओढतो कुंचला
एका अज्ञाताचा हात
येते वाऱ्याची लकेर
पाने- फुले धरी फेर
धून उठे वेणूवरी
एका अज्ञाताचा हात
पहाटेस भूपाळी
रात्री अंगाई गीत
थोपटीतो हलकेच
एका अज्ञाताचा हात
देतो मातीला आकार
घडा घडतो, मोडतो
चाकावर निरंतर
एका अज्ञाताचा हात
नोवेंबर, २०१५