आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात
आईचा हात धरून दर्शन घेताना
आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता
बाबांचा हात धरून ओलांडताना
आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा
आईनं शाळेत सोडलं होतं
आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर
बाबांनी खांद्यावर घेतलं होतं
देवळात असो वा रस्ता ओलांडता
किती सुरक्षित आहोत वाटायचे
खांद्यावर बसून बाबांच्या मला
आपण उंच झालो असे भासायचे
कित्येकसे रस्ते असे ओलांडत गेलो
उंचीने अन वयाने वाढत गेलो
पुस्तकातले, अनुभवाचे धडे गिरवत
सुसंस्कृत, सुशिक्षित, सुखवस्तू झालो
हाताला आधाराची नको झाली गरज
कसलेही भवताली नको झाले कडे
अन रस्ता पार करताना जाणवले कधी
कसे आपण एकटेच आलो आहोत पुढे
आई बाबा जसे होते तिथेच राहिले
रस्त्याच्या पलीकडे दुसरया बाजूला
मधेच कधीतरी आमच्यामधला तो
रस्ता मात्र काहीसा रुंद झाला
रूढी परंपरा जरी त्याच असल्या
तरी आचार-विचारांचा फरक पडला
घर, भिंती, खिडक्या त्याच असल्या
तरी पडदे व भिंतींचा रंग बदलला
कळत नाही दोष हा त्यांचा, माझा,
कि नियम जुना पिढ्यानपिढ्यांचा
वाऱ्यासोबत झाडापासून दूर कुठेसे
बियांनी मुळे नवीन धरण्याचा
कधी येतो प्रश्न माझ्या मनात
होईल का पुन्हा तो रस्ता अरुंद?
गडद निळ्या रंगाची एखादीतरी
शोभेल का घरातली खोली वा भिंत?
समोरचा दिवा मग हिरवा होतो
अन गाड्यांचा ओंढा पुढे वाहतो
आरशात मुलांना हसताना पाहत
मीही आपली गाडी चालवू लागतो
सुरेश नायर
३ /२०१०
No comments:
Post a Comment