कुठेतरी स्मिता पाटील जाऊन तीस वर्षे झाली हे पाहिलं आणि चटकन मला जैचईची आठवण झाली. १९८६ च्या त्याच डिसेंबर महिन्यांत ती सुद्धा आम्हाला सोडून गेली.
पुण्याला लहानपणी वाड्यात राहायचो तिथे आमच्या शेजारी एक जोशी कुटुंब होतं. माझे आजी-आजोबा यांच्या वयाचे पपा आणि जैचई आणि त्यांची चार मुले (साधारण माझ्या आईच्या वयाचे) जया, मीना, चारू आणि किरण/प्रमोद. जैचई म्हणजे थोडक्यात 'जयाची आई'. माझ्या आई-वडिलांचं शिक्षण तसं बेताचं, त्यात मराठी त्यांची मातृभाषा नसल्यामुळे नुसती ऐकून बोलायला शिकलेली. पण नशिबाने म्हणा किंवा योगायोग म्हणा माझ्यावर मराठीचे उत्तम संस्कार घडवणाऱ्या जोशी कुटुंबाचा मी आणि माझी बहीण एक अविभाज्य घटक झालो होतो. माझं त्या घरचं नाव 'पिल्लू' (आता नातवंडं सुद्धा पिल्लू काका म्हणतात, म्हणजे बेबी नंदा वगैरे तसं !). त्यांच्याकडच्या TV मुळे साप्ताहिकी फेम भक्ती बर्वे ते स्टार ट्रेकचा कॅप्ट्न कर्क आमच्या दृष्टीस पडले. तसेच पुलं, वपु, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांच्या कलाकृतीचा परिचय झाला. माझ्या वाचन-संगीताच्या छंदाचा पाया इथेच रुजला.
तर मी सांगत होतो जैचई बद्दल. उषा जोशी (आधीची बकुल रेगे) तिच्या नावासारखीच अगदी निरागस, भोळी, बालमनाची. एखादी गोष्ट हरवली कि 'टपूदेवी टपूदेवी अमुक तमुक पटकन सापडू दे' असं ती म्हणायची ते आता गमतीचे वाटते. आता कदाचित मी तिला आजी सारखी होती असं म्हणेन कारण आम्ही तिला संबोधायचो देखील एकेरीत. पण तेव्हा नकळत का होईना गुलजारचे शब्द आम्ही पाळत होतो 'प्यार को प्यारही रेहने दो, कोई नाम ना दो' . माझ्या बहिणीवर तिचा अधिक लळा. अगदी कुठलाही पदार्थ मागितला कि न कुरकुरता करून द्यायची. मग ते थालपीठ असो कि दाण्याचा लाडू. पोळी ऐवजी तिला भाकरी जास्त प्रिय. तसेच चॉकोलेट सुद्धा. फ्रीझ नव्हता तर बर्फ आणून दूध-कोको पावडर वापरून एकदा कॅडबरी केल्याचं ओझरतं आठवतं.
लाल मिरच्या-हळकुंड, भाजदाणीचं पीठ दळायला आम्ही आनंदाने तिच्यासोबत कुठल्यातरी ठराविक गिरणीत जायचो. रथसप्तमीला दूध उतवणे, वसुबारसला गायीला खायला देणे, तुळशीचे लग्न ह्या सगळ्यात ती आम्हाला सामील करून घ्यायची. मी ५-६ वर्षाचा असताना 'आपल्याकडे सुद्धा गणपती बसवायचा' असा हट्ट धरला आणि 'म्हणतोय तर बसव, मी सांगते काय काय करायचं ' असं माझ्या आईला धीर देत तिने सगळं रीतसर करवून घेतलं. दुर्वा निवडायला आणि दोरा न वापरता दुर्वेच्या पातीनेच जुडी बांधायला मी तिच्याकडूनच शिकलो. रामशास्त्री, रामराज्य, शेजारी असे जुने प्रभातचे चित्रपट लागले कि हमखास ती आम्हाला घेऊन जायची. अनंतचतुर्दशीला मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घ्यायला तीच आम्हाला लाकडीपुलापाशी घेऊन जायची.
साधारण ८३-८४ च्या सुमारास तिला पॅरालीसीसचा अटॅक आला. तिनं कुणाचं काय वाकडे केले होते मला अजून कळत नाही. घरच्यांनी, तिन्ही मुलीनी खुप छान सांभाळलं. पण शेवटी परावलंबत्व आल्यामुळे कधी कधी तिची चीडचीड व्हायची. स्वतः भाकरी थापणं आणि मुलींना सांगणं, शेवटी कुठेतरी जाणवणारच ना? २-३ वर्षे अशीच गेली. डिसेंबर ८६ ला मी दहावीत होतो. वर्गात एकदा निरोप आला कुणीतरी घ्यायला आलंय. आयुष्यात पहिल्यांदा कुणी जवळचं जाण्याचा प्रसंग. घरी येऊन तिचा देह पलंगावर पहिला आणि रडू आवरेना. आज लिहिताना सुद्धा तेच होतंय.
तीस वर्ष उलटली खरं वाटत नाही. आईच्या तोंडून कधी कधी आपसूक निघतं, जैचईने असं करायला शिकवलं. पॉपकॉर्न करताना तिच्यासोबत केलेल्या ज्वारीच्या लाह्या आठवतात. गणपतीला दुर्वा काढताना अजून जुडी बांधायला दोरा वापरत नाही. गणपतीला आवडेल कि नाही ते माहित नाही, पण वाटतं तिला आवडलं नसतं. मग दुर्वेच्या पातीनेच बांधलेली जुडी गणपतीला वाह्यली जाते.
सुरेश नायर
१६ डिसेंबर, २०१६
सुंदर लिहिले आहे. प्रत्येक गोष्ट डोळ्यांसमोर उभी राहते.
ReplyDelete