Friday, December 1, 2023

फुले वेचिता

माझ्या ब्लॉगचे नाव मी "सुरांगण" ठेवले यात फारशी कल्पकता होती असे नव्हे. मला 'मुक्तांगण' हा शब्द आवडतो तोच उसना घेऊन मी माझ्या नावाला जोडलं इतकेच. पण त्याखाली मी "अंगणात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुले वेचायला येशील इकडे" ही ओळ टाकली. तीही उसनीच " घाल घाल पिंगा वाऱ्या" या गीतातील पण दोन तीन शब्दांची फेरफार करून ब्लॉगच्या नावाशी त्याची जुळणी केली. एकूण विचार हा की हा ब्लॉग हे संपूर्ण आंतरजालातील (internet) माझे हक्काचे असे अंगण आहे, माझे लिखाण परिजातकांच्या फुलांसारखे आहे आणि ती फुले वेचायला कुणी कधी येईल याची मी वाट पाहतोय. 

एका अर्थाने पहायला गेले तर कीव यावी असा हा भिकार विचार वाटतो. एखादी गोष्ट विकायचा बाजार मांडून विक्रेत्याने लोकांचे लक्ष वेधून घ्यावे तसे काहीसे. पण खरे सांगायचे तर प्रत्येक निर्मात्याला/ कलाकाराला आपली निर्मिती/ कला इतरांपर्यंत पोहोचावी असे वाटणे स्वाभाविक आहे. मग तो एखाद कुणी प्रतिभावंत असो की अगदी सुमार कुणीसा असो (शेवटी ते ठरवायला देखील कुणी पाहणारे/ अनुभवणारे असायला हवेतच!).

माझे जे काही थोडे थोडके लिखाण (बऱ्याचश्या कविता व गीते, काही लेख, एक दोन कथा, प्रवासवर्णन) आहे ते फार उच्च प्रतीचे आहे असा माझा अजिबात भ्रम नाही. किंबहुना बहुतांश सुमारच असावे (अर्थात 'अंधों मे काना राजा' तसे कशाशी तुलना हेही महत्वाचे). पण काही मोजक्या कविता नक्कीच अश्या आहेत ज्याला दर्जा आहे, depth आहे.

असे हे लिखाण ब्लॉगवर टाकल्यावर कुणी वाचते का, वाचले तर प्रतिक्रिया काय हे कळायला मार्ग नसतो. एखाद कुणीतरी कधी एक दोन वाक्याची कमेंट टाकून जातो. तेवढ्यात समाधान मानून घ्यायचे. अश्यावेळी अपेक्षा असते आपल्या जवळचे लोक तरी वाचक आणि समीक्षक ठरतील. पण इथेही काहीसा अपेक्षाभंगच होतो.

मी बऱ्याच वर्षांपासून माझे काही समछंदी स्नेही आहेत त्यांच्याबरोबर जुळवून आणलेल्या एका बुक - कलब चा सदस्य आहे. त्यातील सर्वांना मी कविता करतो व माझ्या ब्लॉगबद्दल ठाऊक आहे. कधी प्रसंगी मी वाचून दाखवलेली किंवा फेसबुक वर  व इतरत्र शेयर केलेली कविता वाहवा देखिल मिळवून जाते. 

बहुतेक वाचन इंग्रजी पुस्तकांचे असले तरी दरसाली दिवाळीच्या सुमारास आम्ही मराठी वाचायला निवडतो. यंदा मराठी कविता हा विषय निवडला. बहुतेकांचा शाळेनंतर कवितेशी संबंध तुटलेला. पण बरीचशी चित्रगीते, भावगीते, अभंग, गजल हे प्रकारही काव्य या सदरात मोडतात. त्यामुळे या ना त्या निमित्ताने कवितेशी आपले जुळते असतेच. मग काहींनी शाळेतल्या कविता शोधल्या, कुणी ओळखीची गाणी निवडली तर कुणी कुठल्या तरी अपरिचित कवींच्या कविता ऐकवल्या. 

मला खंत या गोष्टीची वाटली की एकाला सुद्धा माझी एखादी कविता निवडावी असे वाटले नाही. एकाने मला backup म्हणून ठेवले होते इतकेच काय ते समाधान. स्वतः मी ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' हा अभंग आणि कोविड लॉकडाऊनच्या वेळी तो अभंग मी कसा अनुभवला हे ऐकवले. शिवाय मुद्दाम माझी एक 'नाव' ही कविता ऐकवली. त्या कवितेचा मतितार्थ हा की नावाला लोक ओळखतात, जास्त महत्त्व देतात. पण कुणाला त्याचा काही संदर्भ लागला का नाही माहित नाही.

नंतर विचार आला की उगाच नाही 'घरकी मुर्गी दाल बराबर' असे म्हणतात. मीही त्याला अपवाद नसेन. आरती प्रभू सारखा अतिशय प्रतिभावंत कवी सुद्धा "ही निकामी आढयता का, दाद द्या अन शुद्ध व्हा, सुर आम्ही चोरतो का, चोरता का वाहवा" असे लिहितो. मग यावर मी राग मानावा का? मुळीच नाही. माझ्याच एका कवितेतल्या ओळी

"आपलेच दात आपलेच ओठ
घेती आपला आपणच चावा
ओघळणारे रक्तही आपलेच
मग राग कुणावर यावा?"

(चावा, रक्त कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण उपेक्षा ही प्रत्यक्ष जखमेपेक्षा जिव्हारी लागते)

मग प्रश्न येतो की आपण निर्मिती करावी कशाला? सरळ उत्तर म्हणजे त्यात स्वनिर्मितीचा स्वानंद आहे. म्हणून आपण आपलेच श्रोता व्हावे, आपलेच वाचक व्हावे, आपलेच रसिक व्हावे. जंगलात एकटा असला तरी मोर नाचतोच ना?
कधीतरी, कुणीतरी एखादा वाटसरू येऊन अंगणातील फुले वेचून जाईल. तेव्हा मी असेन, किंवा नसेनही.....

"धुंद वाटेवरी पेरीत जावे तराणे
जाता विरूनी खुणा पावलांच्या
मागे उरावे गाणे"

सुरेश नायर
१२ डिसेंबर २०२३

No comments:

Post a Comment

ये पावसा

ये पावसा मेघांचा रथ करुनी भेटून जा तू आनंदे बरसोनी  संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी  वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी सृष्टीच आहे सारी तुजसाठ...