Friday, October 18, 2024

जावकर काका

मी देत्रॉइटला 1998 ला आलो आणि पहिल्या काही मित्रांमध्ये जावकर कुटुंब आले. त्याच ओघात एक दोन वर्षात जावकर काका काकुंशी माझी भेट झाली. नातवंडे लहान होती व दोघांना प्रवास झेपायचा म्हणून काका काकू तेव्हा वारंवार इथे यायचे. तेव्हा आमच्या - त्यांच्या घरी, किंवा कुठे potluck/get-together ला, कॅम्पिंग अश्या अनेक प्रसंगी त्यांच्याशी नेहमी संपर्क यायचा. एका कॅम्पिंगच्या वेळी मी, काका आणि काकू एका कूलरचे टेबल करून पत्ते खेळतोय असा एक ठेवणीतला फोटो माझ्याकडे आहे.

2001ला सिद्धी झाली तेव्हा आई इथे आली होती आणि त्यांची आईशी सुद्धा खूप मस्त गट्टी जमली. विशेषतः काका आणि आई ह्या दोघांचा स्वभाव म्हणजे जगमित्र, सगळ्यांशी चटकन कनेक्ट होण्याचा, खूप गप्पिष्ट असा होता म्हणून ते खूप खेळीमेळीने, एकमेकांना दादा - ताई असे संबोधत, बोलायचे.

आमच्या घरी गणपती उत्सवाला बहुतेक 2001 लाच ते पहिल्यांदा आले. त्यानंतरही बऱ्याचदा आले. मग डेकोरेशनसाठी फुलांच्या माळा/ तोरणे, घंटा, इलेक्ट्रिक दीपमाळ अश्या गोष्टी ते आवरजून आणत किंवा कुणासोबत भारतातून पाठवत. अजूनही दरवर्षी गणपतीला त्या गोष्टी वापरताना त्या दोघांची मला हमखास आठवण होते. 

काकांना माणसे नीट परखण्याची जाण होती.  कुणाचे डावे उजवे ते आपसूक हेरत. मग कधी कुणाची खूप वाखाणणी करत किंवा कुणाला वडिलकीच्या नात्याने डटावत सुध्दा. प्रशांतच्या सर्व जवळच्या मित्रांचे काकाही जणू मित्रच होते. त्यांच्यासोबत निखळ गप्पा गोष्टी करणे किंवा पार्टीत त्यांची कंपनी/ ड्रिंक्स एन्जॉय करण्यात कधीच आम्हाला संकोच नाही वाटला.

2014 साली काका काकूंचा ऐंशीवा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा मी एक कविता केली होती. ती त्यांना खूप आवडली. मंडळाच्या मासिकांमध्ये माझ्या कविता छापून येत त्या ते वाचत. एकदा ते मला म्हणाले "तुझ्यात खोल कुठेतरी तू खूप साठवून ठेवले आहेस. ते तुझ्या डोक्यात घोळत असते आणि तुझ्या कवितेतून साकारते". FB/Insta वरच्या हजार likes पेक्षा ही अशी एक दोन वाक्ये ही खरी ओळख पावती.

काकांचं स्वतःचं असे मुंबईला एक विश्व होते. त्यांच्या खास एका क्लबला जाणे, मित्रांना भेटणे, स्वतः ड्रायव्हिंग करणे ह्या गोष्टी सोडून कायम इथे येणे त्यांना कधी पटले नाही. प्रशांतने खूपदा विनवणी करूनही ह्यावर ते ठाम राहिले. काही वर्षांपूर्वी काकू गेल्या. त्यानंतर काकांची तब्येतही खालावत गेली. 2-3 वर्षापूर्वी त्यांची पुण्यात रहायची व्यवस्था झाली कारण मुंबईत एकट्याने रहाणे शक्य नव्हते. आईच्या आजाराचे निदान झाले तेव्हा आईची इच्छा म्हणून मी 2022 ला पुणे, त्रिवेंद्रम अशी एक धावती भेट दिली. तेव्हा काकांना भेटायचे होते पण आईच्या तब्येतीमुळे राहून गेले...

जसजशी आपली वये वाढताहेत तसतशी आपल्याला आधार देणारी, सावली देणारी झाडे हळूहळू वठत जाऊन, उन्मळून, स्वर्गात जाताहेत. ह्याचे दुःख वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी जी समृध्द आयुष्ये जगली आणि आपली समृध्द केली तेही विसरता कामा नये. असेच काहीसे मी या ऐंशीव्या वाढदिवसाच्या कवितेत सादर केले होते. काका आता एका वेगळ्या क्लबमध्ये सामील झाले. तिथेही त्यांचा आत्म्याला तृप्ती आणि शांती मिळो हीच प्रार्थना🙏

वय ऐंशी उलटले तेव्हा मला उमजले
जे जे मी साधले ते ते मला गवसले

उत्तुंग पर्वतशिखर मला सर करायचे होते
विस्तीर्ण सागराला आलिंगन द्यायचे होते
चांदणे वेचून ओंजळीत भरायचे होते
कल्पवृक्षाचे बन अंगणी फुलवायचे होते

विशीतल्या स्वप्नांची हीच गोडी असते
कल्पनेचे फुलपाखरू हवे तसे उडते
चाळीशीच्या उंबरठ्यावर पाय खाली टेकले
साठी आली तोवर खुंट, घट्ट खोल रुतले

मग सुरु झाली त्या स्वप्नांची उजळणी
किती अधिक, किती वजा, सर्वांची मोजणी
कर्तृत्वाची शिखरं सारी मी सर केली
संकटांना अभिडपणे आलिंगने दिली

कुटुंबाच्या सहवासात ओंजळ सुखाने भरली
सगे -सोयरे मित्रांची अंगणात बाग फुलली
कल्पनेतली फुलपाखरं नेहमीच उडत होती
क्षणोक्षणी मधुकण प्राशून घेत होती
वय ऐंशी उलटले, तेव्हा उमजतंय मला
जे जे मी साधले, ते ते गवसले मला

सुरेश नायर
 ९/२१/२०२४
 
 


Sunday, October 13, 2024

सरस्वती वंदना

 दसऱ्याचे निमित्त साधून ही रचना झाली. सरस्वती रागावर आधारित देवीची स्तुती व प्रार्थना

वंदीन तुला देवी सरस्वती
वागीश्वरी वरदायिनी

श्र्वेतांबरी तू, हंसवाहिनी 
वेद, वीणा, शोभती हाती
तू बुध्दीदात्री, कलास्वामिनी 
देई कृपा हे भगवती

Peru Trip Aug 2025

Peru-Machu Picchu Hiking Trip Links to all photos and videos from the trip https://photos.app.goo.gl/5RtxFgbRedR5kyoh8 I went on a hiking tr...