Monday, October 20, 2025

उंच उंच माझा झोका

 



उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता, उतरता झाला पदर वारा-वारा

झोक्याला देते वेग, पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या परागाचा, रंग चढतो पावलाला

झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
दंवा धुक्याचा शुभ्र साज, अंगावरती चढविला

झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
मोकळ्या केसांमधे, गुंफी सनया लाल लाल

झोका चढतो उंच उंच, पाय पोचती मेघांवरती
इंद्राच्या डोहावरी, लाल पाखरे पाण्या येती

झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर, त्याची ओळख आवडेना

फार वर्षापूर्वी पद्मजा फेणाणी यांचा "घर नाचले नाचले" हा गीतसंचय आला होता ज्यात त्यांनी इंदिरा संत यांची ही कविता सुंदर गायली होती. काळाच्या ओघात ते गीत माझ्या विस्मृतीत गेले होते. 

नुकताच मी पेरू या देशाची सैर करून आलो. तिथे भ्रमंती करत असताना एके ठिकाणी एक डोंगराच्या अगदी कडेला दोन मोठाले झोके होते. झोका घेताना त्याची अर्धी चक्री वर डोंगरावर, तर अर्धी खालच्या दरीवर असे होते. त्यावर बसून मी आपली झोक्यावरची आठवेल ती गाणी गुणगुणत होतो त्यात एकदम हे गीत आठवले. मग पुन्हा एकदा ते गाणे शोधून मी काही वेळा ऐकले. आधी ऐकले होते तेव्हा मला त्यातले फारतर संगीत सौंदर्य जाणवले होते. पण पुन्हा ऐकताना मला त्यातले काव्य सौंदर्य भावले. 

इंदिराबाईंच्या बहुतेक कविता तरल, भावनाप्रधान असतात. साध्या तरी सुंदर शब्दात वरवर हलक्या वाटणाऱ्या या कविता काहीतरी खोल भाव सांगून जातात. ही कविता देखील मला तशीच वाटली. आधीची सर्व कडवी, आणि शेवटच्या कडव्यातली पहिली ओळ वाचून असे वाटते की एखादी स्त्री झोक्यावर मुक्त आनंद घेत आहे. आणि ते करताना तिची कल्पनेचे फुलपाखरू निरनिराळे भाव व आभास अनुभवत भिरभिरत आहे. 

पण शेवटच्या ओळीवर मी काहीसा थबकलो. "गुंजेएवढे माझे घर, त्याची ओळख आवडेना". आधी सर्व काही छान, आनंदी, positive भाव असताना या शेवटच्या वाक्यात काहीतरी आवडत नाही हा negative विचार कशाला? मग विचार करता मी त्याचा असा अर्थ लावला - पुर्वी स्त्रियांचे विश्व हे घरापुरतीच मर्यादित असे. घर सांभाळायचे, घरच्यांचे करायचे हाच नियमित राबता असे. घराबाहेरचे विश्व काय असते, कसे असते याचा अनुभव त्यांना वंचितच असे. पूर्ण घर सांभाळण्याची क्षमता असतानादेखील एक अर्थी त्यांना आश्रित, पुरुषांवर निर्भर असेच मानले जायचे. मग असे वाटले की या कवितेतल्या स्त्रीला झोका घेताना जी मोकळीक, स्वातंत्र्य, मुक्तता वाटते, जिला बाहेरच्या विस्तारित जगाची दृष्टी लाभते, तिला मग स्वतःचे ते घर गुंजेएवढे छोटे वाटायला लागते आणि त्याची ओळख आवडेनाशी होते. 

आज सुदैवाने ती परिस्थिती नाही. स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, घराबाहेर पडून इतर क्षेत्रात आपला ठसा उमटवायला अनेक संधी आहेत. पण जगात सर्वच लोकांना, मग ते स्त्री असो वा पुरुष, असे स्वातंत्र्य आहे का?  "परवशता पाश दैवे ज्यांचा गळा लागला" ही जगात बऱ्याच ठिकाणी अजूनही वस्तुस्थिती आहे. त्यांचे घर अजून गुंजेएवढेच आहे. त्यांचा झोका अजून उंच जायचा आहे. 

पुन्हा कवितेवर येत मी इतकेच म्हणेन की कविता आणि त्याचा अर्थही झोक्या सारखा मुक्त असतो. कवीला अमुक एक अर्थ अभिप्रेत असेल तरी वाचकाला हवा तो (logical) अर्थ लावायचे स्वातंत्र्य असते. केवळ त्यामुळेच कविता जुनी, शिळी न होता ताजी, relevant राहते. 

सुरेश नायर 
१७ ऑगस्ट '२५

(गुंज माहिती)

उंच उंच माझा झोका

  उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला झोका चढता, उतरता झाला पदर वारा-वारा झोक्याला देते वेग, पाय टेकून धरणीला लाल मातीच्या परागाचा, रंग च...