कधी वाटते पुन्हा एकदा, मागे जाऊन प्रेम करावे
आंधळ्याने अनुभवले जे, डोळसपणे पुन्हा करावे
विशीतल्या त्या प्रेमामध्ये, धुंदी, कैफ, नशा होती
स्वप्नांच्या रेशीम शालीला, सत्याची झालर नव्हती
अजाणते होतो जरी का, निरागस परी भाव ते होते
नजरेचा एक कटाक्ष इतुके, हृदयावरती घाव होते
काळाचे मग येता सावट, प्रेमावर शेवाळे पिकले
नव्याची नवलाई गेली, सारे कसे रुळते झाले
अधीरतेचे उधळण होते, मंथरलेल्या भेटीत आधी
दिनरात्रीच्या सहवासात, दोन जीवांची झाली कोंडी
नकळत एक अंतर आले, आपण दोघे तु-मी झाले
"ये कहा आ गये हम" असे, दोघा मनी चाटून गेले
वाहूनी जावा काळ मधला, सैल व्हावी गाठ आताची
पुन्हा नव्याने भेटावे अन, पुन्हा फुलावी वेल प्रितीची
