Wednesday, June 18, 1997

‎चारोळ्या‎ - पान दोन

गालावरून  कधी  तुझ्या
आसवांचे  ओघळणे
हेही  एक  रूप  तुझे
भासते  लोभसवाणे

देहरूपी  सतारीला
हृदयाची  एक  तार
रात्रंदिवस  छेडी  जणू
श्वासांचा  गंधार

माझ्या  मृत्यूवर  माझा
राग  मुळी  नसावा
मात्र  एक अश्रू तेव्हा
डोळ्यात  तुझ्या  असावा

चारचौघात  तुला पाहूनही
न  पाहिल्यासारखं  करते
एकांतात  मात्र  तू  नसतानाही
तुलाच  पाहत असते

तू  जवळी  असते
भान  मला  नसते
क्षण  क्षण  जाती  कसे
रात्र  कशी  सरते

सारेच सुखाचे  सोबती
दुख्खात  कुणीच  नसते
प्रकाशातली  सखी  सावलीही
अंधारात  सोबत नसते

प्रेमातले  रुसवे  फुगवे
सागरासारखे  असावे
ओहोटीला  दुरावा  जरी
भरतीला  मागे  फिरावे

स्वर्गलोकीचा  प्राजक्त
पृथ्वीवर  उभा  असतो
आसवांची  फुले  करून  का
ढाळीत  सदा  असतो?

माणसे  तशीच  राहतात
युग  फक्त  सरते
महाभारतातली  द्रौपदी
कलियुगातही  झुरते

Friday, February 21, 1997

‎चारोळ्या‎ - पान एक

लिहावे  म्हणतो  काही
पण  सुचत  काही  नाही
माझ्यावाचून  अपुरा  तू
प्रेरणा  सांगून  जाई

माझ्या  हृदयाची  स्पंदने
तुझा  हळुवार  श्वास
प्रणयी  संगीताचा  जणू
एक  नवा  आभास

तुझी  जागा  मनामध्ये
अपुरीच  राहिली
फुल  खुडलेल्या देठाला का
कधी  पुन्हा  कळी  आली?

लोचनिचे  शब्द  माझे
तूच  घ्यावे  जाणुनी
शब्द  जाती  दूर  दूर
स्पर्शिता ही लेखणी

दृष्ट  लागण्याजोगी
तुझ्या  गालावरची  खळी
जपून  ठेव  जशी  काही
मोगऱ्याची  कळी

रात्री  कधी  कळीचे
उमलून  फुल  झाले
आरशात  पाहताना
मी  यौवनात  आले

पत्रातल्या  शब्दांना
अर्थ  मुळी  नसतात
रिकाम्या  जागा  तेवढ्या
काही  सांगून  जातात

आताशा  डोळ्यात
आषाढ  मेघ  येऊन  वसलाय
मनात  मात्र  माझ्या
वैशाख  वणवा  पेटलाय

रात्रभर  जागून  चंद्राने
चांदण्यांचे   पीक  राखले
पहाटेस  मात्र  सूर्याने
सारेच  चोरून  नेले

एक फांदी चार पक्षी

एक फांदीवर चार पक्षी एवढ्या visual वर सुचलेली एक कविता. कधी कधी कविता आपसूक स्वतःचे एक वळण घेते, आपला तसा हेतू नसला तरी.. एक फांदी चार पक्षी...