Tuesday, March 30, 2010

तुझीच याद

जेव्हा  उदास  वाटे,  खंतावल्या  मनाला
तेव्हा  तुझीच  याद,  देते  मला  दिलासा

जेव्हा  हिवाळी  वारा,  देहास  दे  शहारा
तेव्हा   तुझीच  याद,  शेकावया   निखारा

जेव्हा  तहानलेल्या,  ओठास  आस  न्यारी
तेव्हा  तुझीच  याद,  बेधुंद  मद्य  प्याला

जेव्हा  जडावलेल्या, डोळ्यास  पेंग  भारी
तेव्हा  तुझीच  याद,  घेतो  जरा  उशाला

जेव्हा  सतारीतुनी,  स्वर  ये  सुनेसुनेसे
तेव्हा  तुझीच  याद,  झंकार  देई  तारा

जेव्हा  निरोप  द्याया,  येतील  लोक  अंती
तेव्हा  तुझीच  याद,  होईल  श्वेत  शेला

सुरेश नायर
 ३ /२०१०

Friday, March 26, 2010

रस्ता ओलांडता

आठवते  चतुर्थीला  गणपतीच्या  देवळात
आईचा  हात  धरून  दर्शन  घेताना
आठवते  अजून  तो  भरगर्दीतला  रस्ता
बाबांचा  हात  धरून  ओलांडताना

आठवतं  अंधुकसं  पहिल्यांदा  जेव्हा
आईनं  शाळेत  सोडलं  होतं
आठवतं  जेव्हा,  माझ्या  हट्टाखातर
बाबांनी  खांद्यावर  घेतलं  होतं

देवळात  असो  वा  रस्ता  ओलांडता
किती  सुरक्षित  आहोत  वाटायचे
खांद्यावर  बसून  बाबांच्या  मला
आपण  उंच  झालो  असे  भासायचे

कित्येकसे   रस्ते  असे   ओलांडत   गेलो
उंचीने  अन  वयाने   वाढत  गेलो
पुस्तकातले,  अनुभवाचे  धडे  गिरवत
सुसंस्कृत,  सुशिक्षित,  सुखवस्तू   झालो

हाताला   आधाराची   नको   झाली   गरज
कसलेही  भवताली  नको  झाले   कडे
अन  रस्ता  पार  करताना  जाणवले  कधी
कसे  आपण  एकटेच  आलो  आहोत   पुढे

आई  बाबा  जसे  होते  तिथेच  राहिले
रस्त्याच्या  पलीकडे  दुसरया  बाजूला
मधेच  कधीतरी  आमच्यामधला  तो
रस्ता  मात्र  काहीसा  रुंद  झाला

रूढी  परंपरा  जरी  त्याच  असल्या
तरी  आचार-विचारांचा  फरक  पडला
घर,  भिंती,  खिडक्या  त्याच  असल्या
तरी  पडदे  व  भिंतींचा  रंग  बदलला

कळत  नाही  दोष  हा  त्यांचा,  माझा,
कि  नियम  जुना  पिढ्यानपिढ्यांचा
वाऱ्यासोबत   झाडापासून   दूर  कुठेसे
बियांनी  मुळे  नवीन  धरण्याचा

कधी  येतो  प्रश्न   माझ्या  मनात
होईल  का  पुन्हा  तो  रस्ता  अरुंद?
गडद  निळ्या  रंगाची  एखादीतरी
शोभेल  का  घरातली  खोली  वा  भिंत?

समोरचा  दिवा  मग  हिरवा  होतो
अन  गाड्यांचा  ओंढा  पुढे  वाहतो
आरशात  मुलांना  हसताना  पाहत
मीही  आपली  गाडी  चालवू  लागतो

सुरेश नायर
 ३ /२०१०

Friday, March 12, 2010

होळीची लावणी

(खास होळी निमित्त ही लावणी.  मीराबाईंच्या  " केनो संग खेलू होरी,  पिया  त्यज  गये  है अकेली" या  वरून  स्फुरली.  चाल  पुरिया धनश्री/कल्याण वर आधारित.ऐकण्यास इथे क्लिक करा )  

गेली  संक्रांत  आली  बाई  होळी  हो
नाही  काही  तुमचा  पता
कुणासंग  पंचीम  रंगाची  मी  खेळू  हो

सन  भाग्याचा,  आहे  फार  मोठा
घरला  या  धनी, राग  आता  सोडा
तुम्हांसाठी  केली,  पुरणाची  पोळी  हो

दिस  उन्हाळी,  सोसवेना  उन
किती  पुसावं, घामाघूम  अंग
आग  लावी  राती, चंदनाची  चोळी  हो

तुमच्याविना  शेज, सुनी  सुनी  लागे
विझली  होळी  अन, राख  उरं  मागे,
रोज  खुणविते, चंद्रकोर  भाळी  हो

सुरेश नायर
३/२०१०

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...