अलीकडे ते एकमेकांचा
वाढदिवस साजरा करत नाहीत
एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ
साधसं भेटकार्डही देत नाहीत
इतर कुठल्याही दिवसासारखी
ती तारीख येते, निघून जाते
मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये
हरवतात दोघे एकमेकांचे
'वय वजन वाढते त्यात
साजरं काय करायचं' ती म्हणते
डिनर व केक, सुंदरशी भेट
त्याची सर्व इच्छाच मरते
कधी तोही असतो हिरमुसलेला
तिच्यावर कशास्तव चिडलेला
त्याचा आवडीचा पदार्थ करायचा
मग तिचाही बेत रद्ध झालेला
यावेळेस तो विचार करतोय
निदान प्रयत्न तरी करायचा
डिनर नको तर चौपाटीवरच्या
भेळेचाच आग्रह करायचा
कोमेजणाऱ्या फुलांऐवजी
मोगऱ्याचं रोप घ्यायचं
पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी
कवितेचं एक पुस्तक द्यायचं
तिच्याही मनात असेच विचार
जखमांवर फुंकर घालावे
केकचा नुसता बहाणा करत
अंतर दोघांतले कापावे
यावेळेस काही वेगळेसे होईल
कदाचित वाढदिवस साजरा होईल
प्रश्न आता फक्त उरतो एवढा
पहिला पुढाकार कोण घेईल?
सुरेश नायर
५/२०१०