Wednesday, May 19, 2010

वाढदिवस

अलीकडे  ते   एकमेकांचा
वाढदिवस  साजरा  करत  नाहीत
एकमेकांना  छोटासा  पुष्पगुच्छ
साधसं   भेटकार्डही  देत  नाहीत

इतर  कुठल्याही  दिवसासारखी
ती  तारीख  येते,  निघून  जाते
मित्र  मैत्रिणींच्या  शुभेच्छामध्ये
हरवतात  दोघे  एकमेकांचे

'वय   वजन  वाढते   त्यात  
साजरं  काय  करायचं' ती  म्हणते
डिनर व  केक,  सुंदरशी   भेट
त्याची  सर्व  इच्छाच   मरते

कधी  तोही  असतो  हिरमुसलेला
तिच्यावर  कशास्तव  चिडलेला
त्याचा  आवडीचा  पदार्थ  करायचा
मग  तिचाही  बेत  रद्ध  झालेला

यावेळेस  तो  विचार  करतोय
निदान  प्रयत्न  तरी  करायचा
डिनर  नको  तर  चौपाटीवरच्या
भेळेचाच  आग्रह  करायचा

कोमेजणाऱ्या  फुलांऐवजी
मोगऱ्याचं   रोप  घ्यायचं
पोकळ  शब्दांच्या  कार्डाऐवजी
कवितेचं  एक  पुस्तक  द्यायचं

तिच्याही  मनात  असेच विचार
जखमांवर  फुंकर  घालावे  
केकचा  नुसता  बहाणा  करत
अंतर  दोघांतले  कापावे 

 यावेळेस  काही  वेगळेसे  होईल
कदाचित  वाढदिवस  साजरा  होईल
प्रश्न  आता  फक्त  उरतो  एवढा
पहिला  पुढाकार  कोण  घेईल?

सुरेश नायर
५/२०१०

No comments:

Post a Comment

जावकर काका

मी देत्रॉइटला 1998 ला आलो आणि पहिल्या काही मित्रांमध्ये जावकर कुटुंब आले. त्याच ओघात एक दोन वर्षात जावकर काका काकुंशी माझी भेट झाली. नातवंडे...