Wednesday, December 28, 2011

संकल्प (New Year Resolution)

आजकाल मी New Year Resolution करत नाही 
कारण ते पाळणं, सालं आपल्याला जमत नाही

Diet करा, Healthy खा, मीठ कमी, तेलकट टाळा? 
अहो सलाड व कच्च्या भाज्या पोटाला पचत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही

Soda आणि Coke मी शक्यतो टाळतो 
Whiskly आणि Rum नेहमी नीटच घेतो 
उन्हाळ्याशिवाय एरवी कधी Beer मी घेत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

भानगडी, प्रेम प्रकरणं वगैरे दुसऱ्यांना शोभतं 
सिनेमातल्या हिरॉइन वर आमचं आपलं भागतं 
बायको सोडून कुणाकडे डूंकूनदेखील मी पहात नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

थोडं नाच, थोडं गाणं, थोडं Karaoke Partying 
कधी Family Dinner, कधी Guys Night Outing 
याशिवाय आणखी मी स्वतःला Entertain करत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

वर्ष काय, दिवस काय, सगळं मानण्यावर असतं 
रोजचा दिवस नवीन असतो, रोज काही घडत असतं, 
Journey चा मी आनंद घेतो, Destination चा विचार करत नाही 
आजकाल मी New Year resolution करत नाही 

सुरेश नायर 
(डिसेंबर २०११)

Tuesday, October 18, 2011

तुझं साजरं ते रूप


(या चित्रावर आधारित कविता लिहा आणि त्याची प्रत्येक ओळ "किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप" अशी असायला हवी असं कुठेतरी होतं. तेव्हा लिहिलेल्या या ओळी)

झुंजूमुंजू झालं,  भाट आळविती भूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

घेउनिया मांडीवर, कुरवाळावे खूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

माथा मोरपीस तुझ्या, शोभे अनुरूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

हरपले ध्यान, गेली दूर तहान-भूक
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

लाभले कि मला, सात जन्माचे ते सुख
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

तुला पाहून वाटे, अन्य सारेची विरूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप

सुरेश नायर
२०११

Wednesday, August 31, 2011

भेटावा मजला तू असा

२०१२ साली डेट्रोईट मध्ये झालेल्या एका नाटकासाठी मी ही दोन गीते लिहिली आणि काही स्थानिक कलाकारांना घेऊन ध्वनिमुद्रित केली. एक जोडपं प्रेमात पडतं, त्यांचं लग्न होतं, काही कारणास्तव ते वेगळे होतात आणि पुढे अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात अशी काहीशी कथा. त्यामुळे एका गीताचा भाव आनंदी तर दुसऱ्याचा त्याहून उलट (somewhat regretful) असा. 

भेटावा मजला तू असा, दरवळणारा गंध जसा, 
भेटावी मजला तू अशी, एक अनावर ओढ जशी 

गाण्यामधले शब्द पुराणे, उमजावे परी अर्थ नव्याने 
भेटावा मजला तू असा, गाण्यामधला अर्थ जसा 

स्वप्नी जे मी चित्र रेखिले, प्रीतीच्या रंगांनी भरले 
भेटावी मजला तू अशी, स्वप्न घडावे सत्य तशी

हे जग जणू एक, मैफिल भासे, सूर न जुळता, अधीर श्रोते 
भेटावा मजला तू असा, मैफिली गवसे, सूर जसा 

पिंपळ पाने, कधी ठेविली,  पुस्तकात जी खुण म्हणोनी 
भेटावी मजला तू अशी, पानामधली खुण जशी
 (शेवटची दोन कडवी रेकॉर्डिंग मध्ये नव्हती )

तुझी नि माझी प्रेमकहाणी, भूल जराशी सजाच भारी
भेटावी मजला तू अशी, चुकलेल्याला वाट जशी

चित्र दुभंगले संसाराचे, शाप कळ्यांना निर्माल्याचे 
भेटावा मजला तू असा, पाषाणा रघुस्पर्श जसा

 सुरेश नायर
८ / २०११ 

Thursday, August 25, 2011

तुझ्या रेशमी केसांनी

तुझ्या  रेशमी  केसांनी,  केलीस  काय  किमया
कित्येक  गळे  कापले,  केलेस  जीव  वाया

तुझ्या  रेशमी  केसांनी,  आषाढमेघ  लाजले
श्वासात  गंध  भरुनी,  उरात  पूर  वाहिले

तुझ्या  रेशमी  केसांनी,  उधाण  येई  अंधारा
अवसेची  रात्र  काळी,  कि  देवळातील  गाभारा?

तुझ्या  रेशमी  केसांनी,  भलतीच  होय  जादू
वेणीत  बांध  यांना,  नको  मोकळे  सोडू

सुरेश नायर 
८ / २०११

Thursday, August 18, 2011

शारदाची रात्र होती

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

शारदाची रात्र होती 
चांदण्यांची साथ होती 
दूर मागे गाव होता 
वाट पुढची दाट होती 

गार समिराचे शहारे 
सावल्यांची पाठशिवणी, 
किर्र भवती रान होते 
मज कशाचे भान नव्हते, 

एक वेडी आस होती 
तू दिलेली साद होती, 
भय कशाचे आज नव्हते 
लाजही वेशीस होती 

सुरेश नायर 
२०११

Thursday, April 28, 2011

जाऊन जराशी येते

(मालकौंस  रागात  एक  चाल  सुचली  त्यावर  हे  शब्द  बसवले आहेत.  याला  काहीसा  गझलचा  घाट  आहे  असे  मला  वाटते. ऐकण्यास  इथे क्लिक करा)

जाऊन  जराशी  येते,  तू  सांगून  गेलीस  होती
मी  अजुनी  पिसतो  पाने,  क्षण जाती बघ निसटुनी

जाण्या  आधीचा  डाव,  मी  जिंकून  नेला  होता
हा  दोष  असे  पानांचा,  का  व्यर्थ  रोष  माझ्याशी?

दोघात  तुझ्या  नि  माझ्या,  तू  राजा  आणिक  राणी
हे  भाग्य  असे  गे  माझे,  होतसे  तुझा  गुलाम  मी

आयुष्य  असो  की  पाने,  हा  डाव  घडी  दो  घडीचा
भोगून  घे  खेळापुरती,  शेवट  जाई  विखरुनी

सुरेश नायर

Thursday, March 31, 2011

'रसिका तुझ्याचसाठी'

महाराष्ट्र मंडळ डेट्रोइट यांनी आयोजित केलेल्या 'रसिका तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात कविता सादर करताना



Wednesday, March 23, 2011

एक कविता सुचते

रविवारची  सकाळ, लक्ख  कोवळे उन 
ओलेत्या  केसांनी,  नुकतीच  न्हाऊन,
 चहाचा  एक  कप, हसत, ती  हाती देते
सहज  मला  एक  कविता  सुचते

भर  दुपारची वेळ, हवा  कुंद कुंद
 वरांड्यात झोक्यावर, डुलकी घेत मंद
झोपेतच खुदकन, ती गालात हसते
सहज  मला  एक  कविता  सुचते

अशीच एक निशा, खोलवर  झुकली  दरी,
कड्याशी उभी स्तब्द, पदर वाऱ्यावरी
दाटणाऱ्या धुक्यात, ती पाहता पाहता विरते,
सहज  मला  एक  कविता  सुचते

पौर्णिमेची  रात्र, मग्न तळ्याकाठी
मारव्यात गुंफुवतो, साद तिच्यासाठी,
तळ्यात चंद्र दुणा होतो, ती जेव्हा येते,
सहज  मला  एक  कविता  सुचते

घरात, अंगणात, उन्हात, धुक्यात,  
दरीकड्यावर, कधी  तळ्यातल्या जळात
ती  दिसते, लपते, असते, नसते,
मला मात्र सहज एक  कविता  सुचते

सुरेश नायर
 मार्च, २०११ 

Tuesday, February 15, 2011

नको पाऊस पाऊस

नको  पाऊस  पाऊस, जीव  होतो  कसाबसा
मारशील  कारे  दडी, तुला  देतो  खरा  पैसा

नको  पाऊस  पाऊस, सगळीकडे  नुसता  राडा
कुठे  तुंबली  गटारे, कुठे  खचे  जुना  वाडा

नको  पाऊस  पाऊस, बसे  खिशाला  कात्री
ह्याला नवा रेनकोट, तिला  नवी  कोरी  छत्री

नको  पाऊस  पाऊस, कपडे  ओले  दोरीवर
उद्या  घालावी  लागेल, तशी  ओली  अंडरवेअर  

नको  पाऊस  पाऊस, रस्त्या खड्डे  जणू  'crater '
त्यावर  टेलिफोनवाले, भरती  खणायचे  'tender

नको  पाऊस  पाऊस, होतो  ऑफिसला  उशीर
दारी  उभा  साहेब, त्याला  गाडी  अन  ड्रायवर  

नको  पाउस  पाउस, सर्दी  खोकल्याची  साथ
दमा  उफाळे  कुणाचा, कुणा  त्रासे  संधिवात

नको  पाऊस  पाऊस, जप  करी  शहरवासी
जारे  गावाकडे  तुझी, वाट  पाहे  शेतकरी  

सुरेश नायर

२ /२०१०

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...