Friday, December 25, 2015

नाही मनास आता

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

नाही मनास आता, आनंद वा विसावा
छळतो क्षणाक्षणाला, दोघातला दुरावा

मिटलेल्या पाकळीत, कोंडून राही गंध
वाटे कळीस आधी, बागेत भृंग यावा

गुंफून वेदनेत, घुमतात सूर माझे,
झंकारतील जेव्हा, तू छेडशील तारा

साराच आसमंत, जातो आता विरून,
व्योमात मी बुडाले, नाही कुठेच अंत,

अस्तित्व ना, न प्राण, मी अणुमात्र बीज
होऊनी ये प्रकाश, जागून श्वास यावा

(चाल - बागेश्री रागावर आधारित )
सुरेश नायर 
(१२/२०१५)

Thursday, December 24, 2015

धुंद वाटेवरी

आयुष्य म्हणजे वाटेवरचा एक प्रवास. मुक्काम प्रत्येकाचा एकच. पण प्रवास मात्र प्रत्येकाचा निराळा. आपापल्या वाटेवर पावले टाकीत आपण जात असतो. कुणाकडून बरेच काही घेतो तर कुणाला थोडे काही देतोही. रिकाम्या हाती सुरु झालेला हा प्रवास, शेवटी रित्या हातीच संपतो. वाटेवरच्या पाउलखुणा देखील, कालांतराने मिटून जातात. मग या प्रवासाचं प्रयोजन काय ? वाटेवरून कळत नकळत तुम्ही काहीतरी पेरीत जाता. आणि जिथे पेरणी आली तिथे आपसूक उगवणी आलीच.

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

धुंद वाटेवरी पेरीत जावे तराणे
जाता मिटुनी खुणा पावलांच्या
मागे उरावे गाणे

हा देश, हा गाव, हा कुंद वारा
तो  सूर्य, तो  चंद्र, तो शुक्रतारा
मी चालतो वाट इथली नव्याने
सारे आहे पुराणे

ओंजळ पुरेशी, झोळी कशाला,
घ्यावे कुणाचे, द्यावे कुणाला
प्राशीत जावे वाटेवरी या
आहेत जे  नजराणे

आलो कुठोनी, जाणार कोठे 
इवला प्रवास, अन प्रश्न मोठे 
वाटा निराळ्या जुळतात जेथे
सुटतील तेथे उखाणे

सुरेश नायर (१२/२०१५)

Peru Trip Aug 2025

Peru-Machu Picchu Hiking Trip Links to all photos and videos from the trip https://photos.app.goo.gl/5RtxFgbRedR5kyoh8 I went on a hiking tr...