Thursday, December 24, 2015

धुंद वाटेवरी

आयुष्य म्हणजे वाटेवरचा एक प्रवास. मुक्काम प्रत्येकाचा एकच. पण प्रवास मात्र प्रत्येकाचा निराळा. आपापल्या वाटेवर पावले टाकीत आपण जात असतो. कुणाकडून बरेच काही घेतो तर कुणाला थोडे काही देतोही. रिकाम्या हाती सुरु झालेला हा प्रवास, शेवटी रित्या हातीच संपतो. वाटेवरच्या पाउलखुणा देखील, कालांतराने मिटून जातात. मग या प्रवासाचं प्रयोजन काय ? वाटेवरून कळत नकळत तुम्ही काहीतरी पेरीत जाता. आणि जिथे पेरणी आली तिथे आपसूक उगवणी आलीच.

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

धुंद वाटेवरी पेरीत जावे तराणे
जाता मिटुनी खुणा पावलांच्या
मागे उरावे गाणे

हा देश, हा गाव, हा कुंद वारा
तो  सूर्य, तो  चंद्र, तो शुक्रतारा
मी चालतो वाट इथली नव्याने
सारे आहे पुराणे

ओंजळ पुरेशी, झोळी कशाला,
घ्यावे कुणाचे, द्यावे कुणाला
प्राशीत जावे वाटेवरी या
आहेत जे  नजराणे

आलो कुठोनी, जाणार कोठे 
इवला प्रवास, अन प्रश्न मोठे 
वाटा निराळ्या जुळतात जेथे
सुटतील तेथे उखाणे

सुरेश नायर (१२/२०१५)

No comments:

Post a Comment

बिलोरी मार्ग

नेहमीचा कामाला जायचा मार्ग. अश्या वेळी मेंदू auto pilot वर असतो. पण त्यातही काही क्षण, दृश्ये अशी येतात की आपले लक्ष आपोआप वेधले जाते. त्यात...