Friday, January 22, 2016

निर्वाण

गेले हुंदके आटून, जनही गेले विरून
थोडा उरलो मी मागे, इथे राखेत अजून

नाही यावयाचे कोणी, नाही जावयाचे कोठे
वाट पाहायची राख, जाता मातीत विरून

कसे शांत शांत वाटे, निर्वाणीचा हा एकांत
योग्य वेळ ही स्वतःशी, घ्याया संवाद साधून

काही वाद आपल्याशी, जरा आठवांची सैर
वाटे करावी जराशी, गोळाबेरीज बसून

मग वाटले कशाला, काय त्याचा उपयोग?
शून्य उत्तर शेवटी, किती वजा शून्यातून

सत्य जाणियले आता, घडीभरचा प्रवास
मुक्त झालो मी अखेर, घ्याया निरोप इथून

तोच अनाम एक पक्षी, अंग माखतो राखेत
मऊ पिसामध्ये त्याच्या, जातो मीही सामावून

एक घेऊन भरारी, पक्षी जाय दिगंतरा
मीही जातो त्याच्यासवे, आल्या गावी परतून
सुरेश नायर
 १/२०१६

Thursday, January 21, 2016

गाठ

गालिबचा एक सुन्दर शेर आहे " मत पूछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे, तू देख के क्या रंग है तेरा मेरे आगे". 
याचं रुपांतर करताना सहज एक पूर्ण गजलवजा कविता झाली

गाठ

या आल्याड मी उभा, त्या पल्याड तू उभी,
उंबरा पाहे धरू त्या, ढाळणाऱ्या चौकटी,

पुसू नकोस मी कसा, राहिलो तुझियाविना
बघ जरा स्वतःस तू, आहे कशी माझ्याविना

एकमेका विचारण्याचे, प्रश्न जरी उरले किती
काय असतील उत्तरे, वाटे परी मना भीती

पापण्यांनीच दे निरोप, शब्द राहूदे मुकेच
थरथर ओठावरी तव, सांगते आहे बरेच

गाठ घडली, योग होता, आणखी काही नव्हे
पाऊले वळता उडाले, अंगणातील बघ थवे

सुरेश नायर
 १/२०१६

एक फांदी चार पक्षी

एक फांदीवर चार पक्षी एवढ्या visual वर सुचलेली एक कविता. कधी कधी कविता आपसूक स्वतःचे एक वळण घेते, आपला तसा हेतू नसला तरी.. एक फांदी चार पक्षी...