Friday, January 22, 2016

निर्वाण

गेले हुंदके आटून, जनही गेले विरून
थोडा उरलो मी मागे, इथे राखेत अजून

नाही यावयाचे कोणी, नाही जावयाचे कोठे
वाट पाहायची राख, जाता मातीत विरून

कसे शांत शांत वाटे, निर्वाणीचा हा एकांत
योग्य वेळ ही स्वतःशी, घ्याया संवाद साधून

काही वाद आपल्याशी, जरा आठवांची सैर
वाटे करावी जराशी, गोळाबेरीज बसून

मग वाटले कशाला, काय त्याचा उपयोग?
शून्य उत्तर शेवटी, किती वजा शून्यातून

सत्य जाणियले आता, घडीभरचा प्रवास
मुक्त झालो मी अखेर, घ्याया निरोप इथून

तोच अनाम एक पक्षी, अंग माखतो राखेत
मऊ पिसामध्ये त्याच्या, जातो मीही सामावून

एक घेऊन भरारी, पक्षी जाय दिगंतरा
मीही जातो त्याच्यासवे, आल्या गावी परतून
सुरेश नायर
 १/२०१६

No comments:

Post a Comment

बिलोरी मार्ग

नेहमीचा कामाला जायचा मार्ग. अश्या वेळी मेंदू auto pilot वर असतो. पण त्यातही काही क्षण, दृश्ये अशी येतात की आपले लक्ष आपोआप वेधले जाते. त्यात...