Thursday, April 29, 2010

ऋतूराज आज आला

कुहू कुहू कुहू येई साद
उधळीत वनी स्वर तुषार
मधुर हे तराणे, ऋतूराज आज आला

हवेतला गारठा कमी होतोय. वसुंधरा पुन्हा आपले नवीन हिरवे वस्त्र धारण करतेय. तरू - वेलींना नवी पालवी फुटायला लागली आहे. फुलांच्या सुगंध दरवळतोय व त्याने मत्त होऊन, पराग कणांनी न्हालेले भ्रमर, या फुलावरून त्या फुलावर बागडत आहेत. पक्षांची सततची एकमेकांना दिलेली साद ऐकू येतेय. आणि ही सर्व चिन्हे कमी म्हणून की काय, आपल्या कंठातून अगदी तारसप्तकातल्या पंचम स्वरात गाऊन सर्वांना "ऋतुराज आज आला" असे सांगणारी ती कोकिळा. वसंताचे आगमन झाले आहे याची कुणाच्या मनात अजून शंका असेल तो विरळाच म्हणायचा.

खरच ऋतूंचा राजा शोभावा असाच हा वसंत ऋतू. हिरवा सुंदर अंथरलेला गालीचा, रंगबिरंगी सुगंधित फुलांची उधळण, सनई - चौघडेहि लाजतील अशी सृष्टीने पक्ष्यांच्या तोंडी गायलेली मंजुळ स्वरांची स्वागतगाणी, हे सगळे एका राजालाच शोभून दिसते. गीतामागून गीतातून वसंताची अशीच मोहक चित्रे आपल्याला दिसून येतात. कधी "बसंत है आया रंगीला" तर कधी "केतकी, गुलाब, जुही, चंपक बन फुले".

कालिदासाने आपल्या "ऋतू संहार" या काव्यरचनेत वसंत ऋतूला, हातात प्रेमाचा धनुष्य घेतलेला योद्धा, असे वर्णिले आहे. वसंत ऋतूशी अतूट नाते सांगणारा राग बसंत, या बंदिशीत एका नवऱ्यामुलाचे रूप घेतो "और राग सब बने बाराती, दुल्हा राग बसंत, मदन महोत्सव आज सखी री, विदा होत हेमंत". हिंदी भाषेत हाच बसंत, कधी बसंती तर कधी बहार असे स्त्री रूप धारण करतो. हेच पहा "छम छम नाचत आई बहार, पात पात ने ली अंगडाई, झूम रही है डार डार " किंवा "सज सिंगार ऋत आई बसंती, जैसे नार कोई हो रसवंती, डाली डाली कलियों को तितलियाँ चूमे, कुंज कुंज में भवरे डोले, अमृत घोले…... (कुहू कुहू बोले कोयलिया).

ऋतुसंहार मधेच वसंत ऋतूचे अतिशय सुंदर असे अलंकारिक शब्दचित्र रंगवताना कालिदास पुढे म्हणतो "सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते " (वसंतात सर्व काही सुंदर व मधुर भासते). जर वसंताच्या आधीचे दोन ऋतू, हेमंत व शिशिर, ध्यानात घेतले तर ह्याचे कारण लगेच उमजते. झाडांची पानझड, हवेतला वाढता गारठा, उष्ण प्रदेशात गेलेल्या पक्षांमुळे जाणवणारी बाहेरची सामसूम. सारेच कसे उदास, तन - मन सुस्तावणारे असे. मग वसंत येताच जो वातावरणाचा कायापालट होतो तो मनाला भावला नाही तरच नवल. ह्या गीतात माडगुळकर म्हणतात
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरीरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू
जिवलगा कधी रे येशील तू

गदिमांच्या  ओळींचाच संदर्भ देत वसंताचे आणखी खास वैशिष्ट्य सांगावेसे वाटते, ते म्हणजे प्रेमभावना उत्कटतेला पोहोचवणारा असा हा ऋतू. एकमेकांना साद घालून आळवणारे प्राणी - पक्षी तर याची साक्ष देतातच पण तुमच्या आमच्या मनातही अशी भावना जागृत होते. त्या भावना मग शब्दरूपात अवतरतात आणि एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते……….

कोकीळ कुहू कुहू बोले, तू माझा तुझी मी झाले

कधी तीच प्रेयसी एकांतात स्वताशीच गुणगुणत गाते… 

जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे

आणि कधी तरुण प्रेमी युगुले एकमेकांचा हात हातात घेऊन बागेत फिरताना गातात.....

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

तर असा हा लोभसवाणा, सर्वांचा आवडता ऋतुराज वसंत. सरतेशेवटी सुधीर मोघे यांची, वसंताची उपमा देत जीवनावर लिहिलेली, एक सुंदर कविता आठवते.
प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो

उमलती फुले इथे जी, ती ती अखेर वठती
लावण्य रंग रूप, सारे झडून जाती
तो गंध तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो
तरीही वसंत फुलतो

जी वाटती अतूट, जाती तुटून धागे
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळपत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो 

तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो
तरीही वसंत फुलतो
तरीही वसंत फुलतो.

*****
सुरेश नायर
४/२०१०

(ॲन आर्बर मराठी मंडळाच्या वसंत २०११ च्या 'संवाद' नियतकालीकेसाठी लिहिलेलेला लेख)

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...