आशाताई स्वयंपाकघरात काम करताहेत. दारावरची बेल वाजते. वर्षा (त्यांची मुलगी) दार उघडते
वर्षा - आई ए आई
आशाताई - वर्षा मी कामात आहे दिसत नाही? कशाला हाक मारतेएस
वर्षा - आई बाबूजी आले आहेत
आशाताई (लगबगीने बाहेर येत) - बाबूजी.... तुम्ही असे अचानक
बाबूजी - आहेत तश्या चला. रेकॉर्डिंग आहे. स्टुडिओत जायचंय. खाली टॅक्सी थांबली आहे
आशाताई - पण मी ते कढाई गोश्त साठी मसाला वाटत होते. पंचमला खूप आवडते म्हणून आग्रह करत ....(बाबूजींच्या चेहऱ्याकडे पहात). वर्षा, आल्यावर मसाला वाटते. आलेच इतक्यात...
आशाताई (टॅक्सीत) - बाबूजी गाणं कुठलं ते तरी सांगा
बाबूजी - सुवासिनी मधील "कधी रे येशील तू"
आशाताई - बापरे, इतक्या वर्षानंतर पुन्हा गायचं. होईल का तितकंच चांगलं?
बाबूजी नुसतेच हसतात
स्टुडिओत कॅमेरे पाहून आशाताई गोंधळतात
बाबूजी - दुरदर्शनवर कार्यक्रम आहे. चित्रीकरण करणार आहेत
आशा - पण मी तर आहे तशी आले
बाबूजी - ते गुलदाणीतलं फुल माळा. छान दिसेल
बाबूजींच्या देखरेखीत सर्व तयारी होते. रेकॉर्डिंग सुरू होतं. पहिल्या टेकमध्ये OK मिळतो. आशाताई रेकॉर्डिंग रुम मधून बाहेर येतात. बाबूजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून टॅक्सीतल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळतं. इतक्यात आशाताईंचं लक्ष त्यांच्या खोचलेल्या पदराकडे जातं
आशाताई - अरे बापरे. अशीच TV वर येणार की काय
बाबूजी - आशा तुझा तो तसाच राहिलेला खोचलेला पदर पाहून मला समजले की तू तुझ्या स्वयंपाकघरातून पूर्ण बाहेर आलीस आणि त्या गाण्यात तुझा जीव ओतलास. तुझ्या प्रश्नावर म्हणूनच मी हसलो. तुझ्या गाण्याची मला कधीच शंका नव्हती पण त्या पदराने मात्र पूर्ण खात्री झाली
आशाताई - तुमचे शब्द ऐकून मला पोटभर मिळालं पण पंचमसाठी अजून ते कढाई गोश्त करणं बाकी आहे. येते मी...
आणि मग ते केसात माळलेलं फुल तसेच विसरून आशाताई घरी येतात आणि मसाला वाटू लागतात.
No comments:
Post a Comment