Sunday, November 8, 2020

पपा

 




साधारण चार वर्षांपूर्वी मी जैचई बद्दल लिहिलं तेव्हा पपांबद्दल देखील लिहीन असं ठरवलं होतं. पण राहूनच गेलं. ३-४ महिन्यांपूर्वी आमच्या बुक क्लब मध्ये आम्ही "A Man Called Ove" हे पुस्तक वाचलं आणि पपांची आठवण झाली पण पुन्हा राहून गेलं. मग अगदी परवा परवाच "भाई-व्यक्ती कि वल्ली" हा पुलंवर चित्रपट पाहिला आणि पुलं, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे शिवाय फर्ग्युसन कॉलेज, प्रयाग हॉस्पिटल पाहून पुन्हा आठवण झाली आणि आता लिहावेच असे ठरवले.

हे वाचण्याआधी ज्यांनी जैचई बद्दल वाचलं नसेल ते आधी वाचावं म्हणजे काही संदर्भ लागतील जैचई

पपा म्हणजे दिलीप जोशी. पण त्यांच्या कुटुंबातले आणि आमच्या वाड्यातले सगळेच लोक त्यांना पपा म्हणूनच संबोधायचे. साधारण १९१९ सालचा त्यांचा जन्म असावा. ऐशींच्या दशकात कधीतरी त्याची एकषष्टी झाली होती. मला जितक्या आधीचं आठवतंय तेव्हापासून मी त्यांना रिटायर असलेलंच पाहिलंय. विचारायचं फारसं कारण नव्हतं पण माझ्या मते शिक्षण खात्याशी त्यांच्या नोकरीचा संबंध होता. सेवादलातही बहुतेक काम केलं होतं. एकदा इंग्लंडला देखील जाऊन आले होते.

जैचई जर निरागस, बालमनाची तर त्याहून पपा एकदम तटस्थ आणि शिस्थखोर स्वभावाचे. घरातल्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, सर्वकाही रीतसर आणि नीटनेटकं ठेवावं याकडे कल. वाचनाची खूप आवड. शास्त्रीय संगीताची आवड. त्यांना आठवले कि काही गोष्टी चटकन डोळ्यासमोरून जातात. एका लांबश्या आरामखुर्चीत पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असलेले पपा, गॅलरीत येरझाऱ्या घालणारे पपा, बुकमार्क म्हणून वापरायला जाडसर कागदाची कात्रणं करणारे पपा, त्यांच्या खास गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे अप्पा पटवर्धन नावाच्या मित्राशी गप्पा मारत असलेले पपा

माझ्या बहिणीशी जसं जैचईशी अधिक सूत होतं तसं माझं पप्पांशी. आपल्या इथे शारंगपाणी पुस्तकप्रेमी आहेत, तसे पपा होते. त्यांच्याकडे लहानसा पुस्तकांचा साठा देखील होता. माझी वाचनाची आवड त्यांच्या घरीच रुजली आणि जोपासली गेली. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचं सभासद व्हायला waiting list असायची पण पपांनी त्यांचा ओळखीवर कि प्रिव्हिलेजवर मला membership मिळवून दिली. रविवारच्या वर्तमानपत्रातल्या कोड्या मधला एखादा राहिलेला शब्द मी सोडविला कि एकदम "वा बरोबर " असे काहीसे म्हणायचे. माझी पहिली कविता कॉलेजच्या मासिकात छापून आली ती मी त्यांना दाखवली तेव्हा अशीच शाबासकी दिलेली. पं. भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांचं गायन रेडिओ किंवा टीव्ही वर असेल तर लक्ष देऊन ऐकायचे आणि दाद द्यायचे. मी लहान होतो त्यामुळे कळायचं/ आवडायचं नाही पण कुठेतरी बीज रुजत होतं.

जैचईच्या आजारपणाचा आणि मृत्यूचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. अंतू बरवा मध्ये अंतूशेठ एकदा त्यांच्या पत्नीबद्दल सांगताना म्हणतात " ही गेली आणि दारचा हापूस तेव्हापासून मोहोरला नाही " तसं काहीसं पपाचं झालं असावं. हे सर्व मला त्यावेळी उमगलं नव्हतं पण मागे जाऊन पाहताना एक दोन प्रसंग आठवतात आणि याची जाणीव होते. दिवसभर मुले कामानिमित्त घराबाहेर असायचे तेव्हा घरात एकटेपण हे सुद्धा असेल. मी फर्ग्युसनला कॉलेजात असताना किंवा नंतरही अनेक वेळा अधून मधून दुपारी त्यांच्या घरी जाऊन वाचत वगैरे बसायचो. आमच्यात  खूप संवाद व्हायचा असे नाही पण निदान सोबत असायची.

१९९८ ला मी अमेरिकेत आलो त्यानंतर एक दोनदा पुन्हा पुण्याला गेलो. दरवेळी त्यांची तब्येत बऱ्यापैकी  खालावलेलीच होती. एका भेटीत मी गेलो तेव्हा ते पलंगावर पहुडले होते. शरीर आणि स्मरणशक्ती दोन्ही क्षीण झालेलं. मला नीटसं ओळखलं कि नाही कळत नव्हतं. मला अनावर झाले आणि त्यांचा हात हातात घेऊ मी तसाच अश्रू गाळत बसलो. परत  आल्यानंतर काही दिवसातच बातमी आली कि पपा गेले.

मी हे सर्व का लिहितोय? वयाची पन्नाशी जवळ आली, आयुष्याची उतरण सुरु झाली, एकेक पान लागले गळावया व्हायला लागले, कि मागे वळून पहाणं आलं. विशेषतः आपल्यावर ज्यांचा विशेष प्रभाव असतो, संस्कार असतात, जिव्हाळा असतो त्यांच्याबद्दल. किंवा कदाचित आरती प्रभूंच्या ओळींसारखं काहीसं असावं "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने". पपांच्या आता माझ्याकडे आहेत त्या आठवणी आणि माझ्याकडे राहून गेलेलं त्यांचं एक पुस्तक, माझ्याहून अधिक वयाचं, पिवळसर पाने सुटी सुटी झालेलं आणि त्यांची स्वाक्षरी असलेलं. आणि आहेत काही सवयी, नीटनेटकेपणाची, कात्रणांची बुकमार्क्स करण्याची, पुस्तकांवर तारीख घालून स्वाक्षरी करण्याची....

सुरेश नायर

नोव्हेंबर  २०२०

1 comment:

  1. जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला तुझा लेख आवडला.तुझीच बहीण संगीता

    ReplyDelete

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...