Wednesday, February 23, 2022

नाव

या जगात नाव / brand याला जास्त महत्त्व दिले जाते. कुठल्याही गोष्टीचे मोल ते कुठल्या नावाशी जडले आहे त्यावरून ठरते. मग ती गोष्ट फोन असो, व्हिस्की असो की एखादे चित्र, शिल्प किंवा कथा, कविता असा साहित्यप्रकार असो. 'सुरेश भट' यांच्या नावाखाली त्यांची नसलेली एखादी कविता फेसबुक, व्हॉट्सॲप वर वाचकांचे लक्ष वेधून घेते पण ' सुरेश नायर' या नावाशी जडलेली एखादी खरीच चांगली कविता देखील आंतरजालात एखाद्या ब्लॉगवर धूळ खात, दुर्लक्षित राहते. 
ही कविता लिहिताना जरी माझा इतका मुद्देसूद संदर्भ द्यायचा हेतू नसला तरी कुठेतरी ही बोच मनाच्या डोहात तळ ठोकून आहे हेही तितकेच खरे.

नाव विसरून जगायचंय मला
निनावी होऊन फिरायचंय मला  
ज्ञात्याची सीमा ओलांडून पार
अज्ञात्यात गुप्त शिरायचंय मला   
 
नाव म्हणजे डोक्यावरचे ओझे
 गळ्यात बांधलेला मोठासा दगड 
पाठीशी जडलेला अवजड नांगर 
सर करावयाचा भला मोठा डोंगर  

कधी कधी मी माझं नावच विसरतो
नाही तर विसरायचं सोंग तरी घेतो
पण सहज कुणी विसरू देत नाहीत
कारण ओळखतात तर नावानेच
 
शेक्सपियर म्हणतो नावात काय
नावाशिवाय गुलाब गुलाब असतो
गुलजार म्हणतात नाव होईल गुम 
आवाजच आपली ओळख असते

पण ओळख ही आठवण्यावर असते
ओळखीच्या गोत्यात जग फसते  
कॉलेजातला जुना जिवलग दोस्त
आपली मर्सिडीज थांबवून उतरतो

शेयर केलेला एक चहा आठवत
तुम्ही हाक मारता 'अरे पप्या तू!’ 
आणि तो म्हणतो ‘माफ करा पण
आपलं नाव काय म्हणालात?’

सगळी नाती नावातच अडलेली,
 खोटी लक्षणं नावामागे दडलेली
नावाशिवाय जगायचं म्हणतोय
असूनसुद्धा नसायचं म्हणतोय

सुरेश नायर

Friday, February 18, 2022

शहर

Inspired by the mood and atmosphere of T. S. Eliot's  poem "Rhapsody on a Windy Night". That poem is much deeper about memories and boredom/ futility of everyday life.

निरव मध्यरात्र, अंधूकसा निर्जन रस्ता 
एखाद कुठेसा, दिवा जळे लुकलूकता

दुरून कुणी पुसटसे, हलकेच खाकरते
दबकत एक काळे, मांजर आडवे जाते

दिवसाची ती गजबज, वाहनांची येजा
रात्रीच्या समयी, ना खुणा उरे कशाच्या

रित्या उंच इमारतीत, दिवे लखलखलेले
बाहेर धुरकट अंधारात, सारे ओसाडलेले

अब्जावधींच्या इथे, होतात उलाढाली
झोपत असतात रात्री, फुटपाथवर कोणी

विराण वाळवंट की वारूळ प्रत्येक शहर
विरोधाचा चाले जिथे, खेळ रात्रौप्रहर

सुरेश नायर

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...