Saturday, August 17, 2024

त्या फुलांच्या गंधकोषी

 

नुकतेच फेसबुकवर कुणाच्या तरी भारतफेरीच्या पोस्टवर काही फुलांचे फोटो होते. ते पाहून चटकन  'शंकासुर' हे नाव, माझ्या मनातील खूप जुन्या, आतल्या कप्प्यातून आपसूक वर आले. आणि लहानपणी मी पुण्याला फर्ग्युसन रोडवर रहायचो तो 'हरिहर निवास' वाडा आणि सभोतालचा परिसर एकदम डोळ्यासमोर आला. विशेषतः तिथली फुले आणि फुलझाडे. 

इथे अमेरिकेत फुले, फुलझाडे लावणे हे landscaping, gardening अश्या सूत्रबद्ध प्रकारात मोडते. कदाचित भारतातही आता तसे असेल. पण मला लहानपणचे जे आठवते ते सारे ओबडधोबड कुणी इथे हे लावले, कुणी तिथे ते लावले असे होते. इकडच्या काही फुलांची नावे सोडली तर बरीचशी मला अनोळखीच भासतात. पण तिकडची नुसती ओझरती आठवण झाली आणि निदान दहा बारा नावे पटकन ओठांवर आली.

रोजच्या देवपुजेला, सणासुदीला आमच्या घरचे किंवा शेजारचे कुणीतरी आम्हां मुलांना 'जा फुले घेऊन या' असे सांगायचे. तेव्हढाच काय तो आमचा आणि त्या फुलांचा संबंध. नाहीतर आम्ही एकतर शाळा, अभ्यासात व्यस्त नाहीतर खेळात दंग. पण लहानपणीच्या गोष्टी आपण सहजी विसरत नाही असे म्हणतात म्हणून कदाचित ते सगळे आठवत असेल.

सर्वप्रथम आठवते ते म्हणजे आमच्या वाड्याच्या मागे होते ते प्राजक्ताचे झाड. यासारखे दुसरे झाड नाही. गर्द केशरी देठ आणि काही पांढऱ्या पाकळ्या असे साधे, छोटे फुल. पण त्याचे सौंदर्य संख्येत असते. सकाळी झाडाखाली पडलेला/ पडत असलेला फुलांचा सडा पाहणे म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव असतो. एकदा वेचली की ती फुले खूप वेळ ताजी रहात नाहीत, कोमेजतात. इथे देट्रॉइटला आमच्या समोरच्या अंगणात एक चेरीचे झाड आहे. ते spring मध्ये काहीसे प्राजक्तासारखे पुरत्या पांढऱ्याश्या फुलांनी डवरते तेवढ्यावर समाधान. फार पूर्वी मी एक चारोळी लिहिली होती "स्वर्गलोकीचा प्राजक्त, पृथ्वीवर उभा असतो, आसवांची फुले करून, ढाळीत सदा असतो". गंमत म्हणजे विकिपीडिया वर पाहिले तर याला tree of sorrow, tree of sadness असेही म्हणतात हे मला आता समजले.

प्राजक्ताच्या झाडाशेजारी एक पांढऱ्या कण्हेरीचे झाड होते. तितके उंच नाही तरीही आठ दहा फूट तरी उंच असावे. शंकराला पांढरे फुल लागते म्हणून याची मागणी असे. जरा अलीकडे वाड्याच्या भिंतीला लागून अशी गुलबक्षीची लांबलचक रांग होती. लाल, गुलाबी, पिवळी, पांढरी अश्या निरनिराळ्या रंगातील ही फुले दुपारी उशिरा वा संध्याकाळी उमलतात म्हणून याला four o'clock flower असेही म्हणतात. आमच्या शेजारच्या वैद्यकाकू गणपतीत ही फुले वेणीसारखी माळून गणपतीसाठी हार करून देत.

माने आडनावाचे आमच्या वाड्यांचे मालक तिथेच मागे एका स्वतंत्र वाड्यात रहात. त्यांच्या बागेत गुलाब, जास्वंद, लीली, मोगरा, बोगनवेल अशी बरीच फुलझाडे होती. तिथे मात्र आम्ही फारसे फिरकायचो नाही. एकदम मागच्या बाजूला धुणी भांडी यासाठी एक सार्वजनिक हौद आणि दोन तीन नळ होते. त्याच्या सभोती कोरांटीची झाडे होते. जांभळ्या व पांढऱ्या रंगाची कोरांटी आणि त्यालागत एक अबोलीचे झाड. कोरांटीला काटे असतात असे अंधुक आठवते. 

याच्या पलीकडे एक छोटीशी अरुंद गल्ली होती आणि मागे गोखले बंगला (या निंबाची आळी नावाच्या गल्लीवर मागे मी एक रोचक लेख लिहिला होता). मी वर नमूद केले ते शंकासुराचे झाड तिथेच कुंपणापाशी होते. केशरी पिवळ्या रंगाच्या फुलांचा झुपका, फुलाच्या मध्ये लांबसर तुरा असे हे फुल. तिथेच जवळपास एक बकुळीचा वृक्ष. प्राजक्ता सारखेच बकुळीचाही सडा पडतो. अगदी छोटीशी,  बारीक कमळासारख्या आकाराची, पिवळसर पांढऱ्या / मातकट रंगाची पण अतिशय सुगंधी अशी ही फुले. 

आमच्या वाड्याला लागूनच एक आणखी वाडा होता. त्याच्या मागील बाजूस कुणीतरी रातराणी लावली होती. नाजूक, बारीक फुलांच्या झुपक्याने फुलणारी रातराणी सुवासासाठी प्रसिध्द आहे. अगदी लांबूनही कुणी सहज ओळखू शकेल इतका हीचा दरवळ. पण भर जोमात फुलते तेव्हा जवळून तो सुवास काहीसा उग्र/ overpowering वाटतो. पलीकडे या दोन वाड्यांची हद्द संपे तिथे भिंत होती आणि त्या भिंतीला लागून हजारी मोगरा होता. मोठी गोलसर पाने आणि मोठाले पांढऱ्या, गुलाबीसर फुलांचे झुपके ही याची खासियत. याला मोगऱ्याइतका सुगंध असतो का ते आता आठवत नाही. तिथेच जवळ जरा झाडाझुडपाच्या गर्दीत एक चाफ्याचे झाड होते. पण चाफ्यापाशी साप असतात ही गोष्ट (खरी की खोटी देव जाणे) आम्हां मुलांमध्ये रुजली होती म्हणून आम्ही तिथे फिरकायचो नाही. खेळताना बॉल जरी चुकून तिथे गेला की बिचकत, लांब काठीने वगैरे काढणे व्हायचे.

सरतेशेवटी उल्लेख करायचा म्हणजे या वाड्याच्या पुढ्यात, फर्ग्युसन रस्त्याला लागून होते ते भले मोठे गुलमोहराचे झाड. भगव्या, केशरी रंगाने फुललेला गुलमोहोर आपल्या नावाला जागतो. गुलमोहोर नाव मी गुगल केले तर flamboyant tree, flame tree अशी आपसूक वर्णावी ही नावे या झाडाला आहेत. 

आता अर्थात यातले काहीच तिथे नाही. वाडे पाडले जाऊन नवीन इमारती आल्या, त्यासोबत झाडेही गेली. फर्ग्युसन रस्त्यावरची बरीच झाडे, विशेषतः एक दोन मोठाली वडाची झाडे रस्ता रुंदीकरता पाडली गेली तेव्हा पुणेकरांनी हळहळ व्यक्त केली होती. घर, अंगण यासोबत त्याच्या आजूबाजूचा परिसर, झाडा झुडपांशी सुद्धा आपले कळत नकळत बंध जुळतात. आणि मग असेच कधीतरी पद्मा गोळे आपल्या कवितेत लिहितात तसे आपणही विचारतो "का बरे आलास आज स्वप्नात"? मग तो चाफा असो, गुलमोहोर असो की प्राजक्त. अन् मग आपली आपणच समजूत काढतो की निदान आठवणींनी ओंजळ भरलिये ना.

सुरेश नायर 
 ८/१७/२४

No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...