Sunday, July 14, 2024

वानप्रस्थ


माझ्या शेजारच्या घरात एक खूप वयस्क जोडपे रहाते. जवळपास नव्वदीच्या वयाचे गृहस्थ आणि ३-४ वर्षाच्या फरकाने त्यांची पत्नी. दोन्ही मुले कॅलिफोर्निया येथे स्थायिक. गेल्या साधारण सहा सात वर्षाच्या वास्तव्यात मी त्यांची तब्येत सतत खालावत चाललेली पहातोय. तरीही दोघे सतत बाहेर बागकाम करत असतात. बागेची निगा, झाडांची काटछाट, weeds काढणे, mowerने गवत कापणे अशी कामे रोज चालू असतात.

त्यांना या वयात ही शारीरिक कामे करताना पाहून, विशेषतः गाडी चालवताना पाहून माझ्या मनात विचार येतो की अशी risky lifestyle हे कशाला जगतात. कुठेतरी independent assisted living community मध्ये किंवा निदान काँडो मध्ये का राहत नाहीत. पण त्यांच्याशी झालेल्या काही मोजक्या संवादातून इतका निष्कर्ष निघाला की चाळीसहून अधिक वर्षे या घरात राहिल्यानंतर त्यांना ती स्वतंत्र राहणी सोडणे कठीण वाटते.

नुकतेच जो बाईडन प्रकरण आपल्या सर्वांची उत्कंठा वाढवून गेले. चार वर्षांपूर्वी मी अतिशय उत्साहाने ज्याला मत दिले, ज्याचे समर्थन केले त्याने आता पुन्हा या वयात प्रयत्न करू नये हे माझे खूप आधीपासूनचे मत होते. नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या उमेदवाराला सूत्रे देण्याऐवजी लहान मुलासारखे "मी मी" चा हट्ट आणि अट्टाहास मला काहीसा असह्य वाटला. अर्थात एका माणसाला दोष देणेही बरोबर नाही. पार्टीतले इतर बुजुर्ग मंडळी चार वर्षे झोपली होती काय असा प्रश्नही पडतो. असो, तर इथे सत्ता आणि मीपणा सहजी सोडवत नाही हे ठळक दिसते.

माझी आई टिव्ही वर मराठी - हिंदी सीरिअल्स पहायची. त्यात सासू-सूना, आई-वडील व मुले यांच्यातील, अगदी रंगवून दाखवलेले वाद सतत असायचा. त्याची खिल्ली उडवता उडवता मीही आईला सांगायचो "हे बघ, तू तुझी कर्तव्य पार पाडली. तुझी मुले, त्यांची मुले सर्व काही व्यवस्थित आहे. मग उगाच ह्याची काळजी, त्याची काळजी करणे, हे असे का, तसे का वगैरे विचारणे हे सगळे सोडून दे. अगदी निश्चिंत आयुष्य जग". अर्थात आईला संसारातून ही असली विरक्ती घेणे अवघड होते. She was too invested in our lives. आणि त्यातून अंग काढून घेणे तिला कठीण होते.

या सर्वातून मला वानप्रस्थ ही प्राचीन राहणीमानातील एक प्रकार किंवा संस्था आकर्षित करते. निदान conceptually तरी. बहुतेकांना महाभारतातील कथेतून हे परिचित असेल. मध्यम किंवा उतारवयात, एकदा पुढची पिढी मोठी होऊन कर्ती झाली, की आपण स्वतः संसारातून दूरस्थ होऊन विरक्ती घ्यायची आणि बहुतेक सुख-भोगाच्या गोष्टींचा त्याग करून वनात जाऊन रहायचे असे काहीसे. कुंती, गांधारी, धृथराष्ट्र आणि पुढे दौपदीसोबत पाचही पांडव यांनी याचा स्वीकार केला होता.

आजच्या युगातही आपण निदान ही mentality आत्मसात करायला हवी असे मला स्वतःला वाटते. सर्व सोडून वनात जाऊन राहावे असे नाही. पण 'अडकून रहाणे' ह्या वृत्तीचा त्याग करावा. एकदा आपली कर्तव्य पार पाडली की तुमच्या आयुष्याचा focus बदला, स्वतःला वेगळ्या कशात तरी रमवा. प्रवास करा, नवा छंद जोडा, नवे मित्र मंडळी शोधा. उगाच घर, व्यवहारात खूप अडकु नका, मुलंबाळं यांच्या आयुष्यात नको तेव्हढी लुडबुड करू नका. त्यांना त्यांचा स्वतःचा मार्ग शोधू द्या, स्वतःच्या सोयीने, हवे तसे जगू द्या. तुमच्यावाचूनही त्यांचे पान हलू शकते हे जाणून घ्या. Diminishing returns हा concept कालांतराने आपल्यालाही लागू होतो हे स्वीकार करा म्हणजे उगाच नंतर हिरमुसायची वेळ नाही येणार.

मला empty nester हा शब्दही बोचतो. एकतर ज्याअर्थी आपण वापरतो ते बरोबर नाही. जेव्हा पिल्ले मोठी होऊन घरटे सोडून निघून जातात तेव्हा ती नर मादी पक्षांची जोडी दोघेच घरट्यात रहात नाहीत. नक्की कुठे जातात माहीत नाही. कदाचित नविन घरटे, नवे कुटुंब यात रमतात किंवा त्याच घरट्यात पुन्हा नवे कुटुंब सुरू करतात. मग आपण तरी कशाला आपले घरटे रिकामे होऊ द्यायचे. मी वर म्हणालो तसे नव्या गोष्टींनी ते घरटे समृध्द करा. मुक्त व्हा, मोकळे व्हा.

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है,
जीवन का मतलब तो, आना और जाना है

सुरेश नायर
७/१३/२४

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...