Wednesday, January 13, 2010

पाउस

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

असा  पाउस  पडावा, सुक्या  मातीस  ओलावा
धरीत्रीत  निजलेल्या, बिजा  अंकुर  फुटावा

असा  पाउस  पडावा, पिके  जोमाने  वाढावी
  दोन्ही  वेळा  चुलीवर, पुन्हा  भाकर  शिजावी

असा  पाउस  पडावा, त्याचा  पैसा  झाला  खोटा
नंदीबैल  यावा  दारी, सांगे  'सुट्टी  आज  शाळा'

असा  पाउस  पडावा, मोरपिसारा  फुलावा
घरी  दारी  अंगणात, राग  मल्हार  घुमावा

असा  पाउस  पडावा, झिम्मा  खेळतील  सरी
बळीराजा  ही  खेळेल, हिरव्या  रंगाची  पंचमी

असा  पाउस  पडावा, झरे  तुडुंब  वाहती
घेती  दरीतून  उड्या, त्यांची  धिटाई  केवढी

असा  पाउस  पडावा, पुर  यमुनेस  यावा
कुणी  गोपिका  बावरी, सखा  कृष्ण  कुणी  व्हावा

असा  पाउस  पडावा, सारे  चिंब  चिंब व्हावे
मेघ  धरेस  भेटता, त्यात  मीही  विरघळावे

सुरेश नायर
१/२०१०

Tuesday, January 5, 2010

अंतर

शब्दांच्या  सुंदर  जाळ्यात  मला  अडकवू  नकोस
वचनांच्या  खोल  बंधनात  उगा  बांधू  नकोस

बोटात  बोटे  गुंफून  दोघे  हवे  तेवढे  फिरू
मनगटाभोवती  मात्र  कधी,  नकोस  हात  धरू

सहज  सुटण्याइतकी  दोघांतली  गाठ सैल  नको
पण  श्वास  कोंडेल  असा  घट्ट  गळफासही  नको

रागावू  नको, माझी  प्रेमाची  कल्पना  जरा  निराळी  आहे
फक्त  भावनांचा  रस  नाही, अनुभवाचं  सारही  आहे

शेवटी  काही  असले  तरी  तू  'तू'  आहेस, मी  'मी'  आहे
दोघेमिळून  'आपण'  असलो  तरी…. त्यात  'पण'  आहे

म्हणून  म्हणते  एकमेकांना  थोडेसे  स्वातंत्र्य  राहू  दे
तुझ्या  माझ्यात,  जरासे  का  होईना,  अंतर  राहू  दे

 सुरेश नायर
१/२०१०

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...