Tuesday, January 5, 2010

अंतर

शब्दांच्या  सुंदर  जाळ्यात  मला  अडकवू  नकोस
वचनांच्या  खोल  बंधनात  उगा  बांधू  नकोस

बोटात  बोटे  गुंफून  दोघे  हवे  तेवढे  फिरू
मनगटाभोवती  मात्र  कधी,  नकोस  हात  धरू

सहज  सुटण्याइतकी  दोघांतली  गाठ सैल  नको
पण  श्वास  कोंडेल  असा  घट्ट  गळफासही  नको

रागावू  नको, माझी  प्रेमाची  कल्पना  जरा  निराळी  आहे
फक्त  भावनांचा  रस  नाही, अनुभवाचं  सारही  आहे

शेवटी  काही  असले  तरी  तू  'तू'  आहेस, मी  'मी'  आहे
दोघेमिळून  'आपण'  असलो  तरी…. त्यात  'पण'  आहे

म्हणून  म्हणते  एकमेकांना  थोडेसे  स्वातंत्र्य  राहू  दे
तुझ्या  माझ्यात,  जरासे  का  होईना,  अंतर  राहू  दे

 सुरेश नायर
१/२०१०

No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...