Tuesday, December 24, 2013

नाट्यलेखन - एक प्रवास, एक अनुभव

लहानपणी पोहायला शिकलो नाही पण पाण्याची भयंकर आवड म्हणून पोहायला शिकायचे. संगीताची आवड पण  कधी गाणं शिकलो नाही म्हणून गायला शिकायचे. आणि वाचनाची भारी आवड तेव्हा आपणही कधी लेखक व्हायचे. विशीचा उंबरठा ओलांडायच्या आधी या तीन इच्छांनी माझ्या मनात घर केले होते.

वयाच्या चोविशित पुण्याच्या टिळक तलावात, क्लास लावून, एकदाचा पोहायला शिकलो. फार विशेष नाही, पण समुद्रात प्रवास करताना बोट बुडालीच तर तास दोन तास का होईना तरून जाईन इतकं बेताचं. इथे आल्यानंतर हौसेने मंडळाच्या कोजागिरीच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि जाणवलं कि सुरांशी आणि तबल्याच्या ठेक्याशी आपली शिवणापाणी किंवा  कबड्डी चालते. मग तिशीत शिस्तीत क्लास लावून गायनाचे धडे घेतले आणि स्वतःही मेहनत घेतली. आता मैफिल रंगविण्याची क्षमता नसली तरी मैफिलीत योग्य तिथेच दाद देण्याची अक्कल आली आहे (आणि काहींच्या delayed 'वा क्या बात है' वर मनात हसूही येतं). स्वतः लिहिलेल्या कविता व गीतांना कधी कधी चालीही बऱ्यापैकी जमून येतात.

लेखन ही कला मात्र काही कुठे धडे घेऊन शिकता येतेच असे नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात . एक म्हणजे भाषेची आवड आणि जाण. साधी गोष्ट सुद्धा अलंकार, उपमांचा वगैरे वापरून सुंदर शब्दात साकार करता आली पाहिजे. "मी नव्यानेच अमुक तमुक सुरु केलंय. मला यात खूप प्राविण्य आणि यश मिळवायचं आहे" हेच या शब्दात लिहिता येतं "मी क्षितिजाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मला तो उंबरठा ओलांडायचाय, त्या क्षितिजाचा वेध घ्यायचाय, त्याची सीमा गाठायची आहे." दुसरी गोष्ट म्हणजे निरीक्षण आणि स्मरणशक्ती. ऐकलेली, वाचलेली, पाहिलेली, दिसलेली गोष्ट कुठेतरी मनात सोनं, माणके, हिरे असल्यासारखी साचवून ठेवायची (safe deposit असल्यासारखं). मग हवी तेव्हा, हव्या त्या संदर्भात, हवी ती गोष्ट काढायची आणि योग्य ती कलाकुसर करून, आपल्या कोंदणात बसवून एखादी कथा, कविता, लेख, कादंबरी, नाटक सादर करायचं.

अर्थात मी जे वर सांगितलं त्या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ एका लेखकाची अवजारं आहेत, tools of the trade, techniques of writing, हवं तर ‘craftsmanship’ असं म्हणा. एखाद्या सुताराला किंवा शिल्पकाराला कुठलं अवजार कधी आणि कसं वापरावं हे जसं पक्कं ठाऊक असतं, तसंच काहीसं. पण नुसतं तेवढं असून भागत नाही. तुम्ही खतपाणी घालू शकता पण झाड उगवायला एक बीज असावं लागतं आणि त्या सुताराला किंवा शिल्पकाराला त्याची कलाकुसर दाखवायला उत्तम प्रकारचं लाकूड नाहीतर खडक शोधावा लागतो. तसंच एका लेखकाला एक सुंदर विषय, कथेचं एक मूळ, नाटकाचा एक प्लॉट सापडावा लागतो ज्यावर तो त्याच्या लेखनशैलीची, कलाकुसरीची करामत दाखवू शकतो. आणि इथे बऱ्याच जणांची विकेट पडते, ब्याटिंग करण्याआधीच.

कशावर लिहावं हा कुठल्याही लेखकाला पडणारा मूळ प्रश्न. एखादा विषय सुचला कि त्यावर लिहिलेलं, पाहिलेलं  दुसरं काहीतरी आठवतं आणि मग विचार येतो परत ते कशाला. हे चक्र माझ्या मनातही अनेक वर्ष सुरु आहे. कविता सुचते ती आपसूक. एखादा शब्द, वाक्य, विचार मनात येतो मग त्यावर तुम्ही विस्तार करू शकता. पण गोष्ट - कथा सांगणं वेगळं कारण नुसतं वाचनाद्वारेच नव्हे तर नाटक, सिनेमा, टिव्ही या माध्यमातून सुद्धा  आपल्यावर सतत त्याचा भडीमार होत असतो.  मग मला Christopher Booker यांचं The Seven Basic Plots या पुस्तकाचा संदर्भ सापडला. पूर्ण वाचलं नाही पण आशय कळला. माझ्या शब्दात सांगायचं तर "जगात फक्त सात मूळ कथा आहेत. कुठलीही कथा, कादंबरी, नाटक वगैरे त्या मूळ सात कथानकात मोडतात. They are just the variations of the same basic stories. उदारणार्थ नायक आणि नायिकेची प्रेमकथा, त्यांच्यात येणारे अडथळे आणि शेवटी एकत्र येणे किंवा न येणे. किंवा नायक - नायिकेचा अन्यायावर , अन्याय करणाऱ्यांवर विजय. रामायण, महाभारत अश्या मोठमोठ्या कलाकृती असोत नाहीतर लहान मुलांच्या पंचतंत्रातल्या गोष्टी. सर्व काही फक्त या सात मूळ कथानकमध्ये मोडता येतात."  

माझ्यासाठी हा एक साक्षात्कार होता. पाहायला गेलो तर 'रोमियो-जुलीयट’ ही प्रेमकथा, 'लैला-मजनू' ही प्रेमकथा, 'अर्जुन-सुभद्रा' ची प्रेमकथाच आणि ‘शाकुंतल’ ही सुद्धा प्रेमकथा. पण शेक्सपियर, कालिदास, व्यास किंवा इतर अनेक लेखक असोत त्यांनी आपापल्या प्रकारे त्या कथा रंगवल्या. पात्र, प्रसंग, लेखनशैली प्रत्येकाची वेगळी आणि त्यामुळे ती प्रत्येक कथा आपल्याला वेगळी भासते, आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. So it’s the writer’s interpretation that matters the most. एक उदाहरण म्हणजे Bernard Shaw यांचं 'Pygmalion' आणि पुलंचं 'ती फुलराणी' हे नाटक. एकावर आधारित दुसरी कलाकृती. पात्रं तीच, प्रसंग बरेचसे तेच पण माझ्यादृष्टीने या दोन भक्कमपणे स्वतंत्र उभ्या राहू शकतील अश्या कलाकृती. लंडन मध्ये फुले विकणारी Eliza Doolittle असेलही पण म्हणून मुंबईत फुले विकणारी एखादी ‘मंजुळा’ नसेल कशावरून? तसंच एक अलीकडचं उदाहरण म्हणजे Yann Martel यांचं Life of Pi आणि Moacyr Scliar या ब्राझीलच्या लेखकाचं Max and the Cats पुस्तक. एकसारखी कल्पना घेऊन दोन वेगळे लेखक स्वतःच्या पद्धतीने आणि विचाराने त्यावर विस्ताराने लेखन कसं करू शकतात याची उत्तम साक्ष.

एकदा का मनाची ही अढी दूर झाली कि कुठल्याही लेखकाला कशावर लिहावं या प्रश्नावर अडायचं कारण नाही. त्यानं कशावरही लिहावं.  तुम्ही तुमच्या पद्धतीने, शैलीने, आणि कल्पनांच्या जोरावर ते लिहिलं कि झालं. माझ्या पहिल्या नाटकाचा विषय मला एका science journal मध्ये वाचलेल्या लेखात सुचला. पण त्यातून निर्माण झालं ते एक हलकं-फुलकं, काहीसं विनोदी, काहीसं मनाला स्पर्श करणारं, नृत्य- गीताने सजलेलं असं नाटक ‘वारा लबाड आहे’. तीन पिढ्यातील स्त्री-पुरुषातल्या मनाची उकल करणारं हे नाटक सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. 'नाट्यचक्र'  या या दुसऱ्या नाटकाचा विषय मात्र मला एका इंग्रजी नाटकातच मिळाला. तसं करणं योग्य आहे कि नाही या विचारात मी काही काळ अडकलो. आणि तेव्हाच वरचे काही विचार माझ्या मनात डोकावले. ते बरेचसे विचार मग मी त्या नाटकात 'प्रभाकर नाडकर्णी' या काल्पनिक नाटककाराच्या तोंडी घातले. याही नाटकाने प्रेक्षकांची परीक्षा उत्तमरीत्या पास केली. विशेषत: भाषेचा उत्तम वापर, समर्पक संवाद, वेधक कथानक आणि पात्रांचा व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा अभिनय हे सगळं रसिकांची दाद मिळवून गेलं. 

या लेखनप्रवासाची सुरुवात, हा अनुभव, आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आनंददायक आहे आणि प्रयत्न केला तर आपण असंच आणखी चांगलं लिहू शकतो हा आत्मविश्वास वाढवणारा आहे. लेखक व्हावं ही इच्छा पूर्ण झाली असं म्हणणं अतिशययोक्ती ठरेल कारण अजून व्यावसायिकरित्या छापून काहीच आलेलं नाही. कदाचित पन्नाशी यायच्या आधी योग येईलसुद्धा. मात्र या हौशी अश्याच सुरु असताना, आता पुढच्या दोन तीन दशकात काय शिकायचं, काय नवीन उद्योग करायचे ते ठरवायला हवं!   

सुरेश नायर
(नोव्हेंबर, २०१३)





    

No comments:

Post a Comment

बिलोरी मार्ग

नेहमीचा कामाला जायचा मार्ग. अश्या वेळी मेंदू auto pilot वर असतो. पण त्यातही काही क्षण, दृश्ये अशी येतात की आपले लक्ष आपोआप वेधले जाते. त्यात...