Tuesday, December 31, 2013

लाइफलाईन (लघु कथा)


विसुभाउंनी पुन्हा एकदा घड्याळाकडे आपली नजर वळवली. पाचला आणखी पाच मिनिटे बाकी होती. त्यांच्या तोंडातून एक मोठा निश्वास बाहेर आला. खरंतर पाचला सात मिनिटे होती तेव्हा त्यांनी घड्याळ पाहिले  होते आणि मनाशी  घट्ट राहून परत तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरविले होते. पण वेळही मोठा गमतीदार असतो आणि आपल्याशी खेळत राहतो. कधी ससा होऊन लांब लांब उड्या मारत नको तेवढा पटकन जातो तर कधी कासवाच्या गतीने पुढे सरकतो. आज त्याने कासवाचे रूप धारण करून विसुभाऊंना छळायचे असे ठरविले होते. अर्थात हे सगळे विचार या दोन मिनिटात त्यांच्या मनात येउन गेले आणि त्यांना वाटले कि काटा ४-५ मिनिटांनी पुढे सरकला असेल. पण अजून पाच मिनिटे निघायची होती.

        खरंतर आता दोन महिने उलटले होते तेव्हा शरीराला भुकेची सवय झाली होती. सकाळी एखादं फळ किंवा चहासोबत दोन-तीन बिस्किटं, दुपारी डब्यात एखादी पोळी आणि खूप काकडी-गाजर- टोमॅटो-कोबी अश्या कुठल्यातरी भाज्यांची कोशिंबीर, तीनच्या सुमारास समस्त ऑफिसच्या लोकांना, निव्वळ झोप उडावी, या हेतूने आलेला समोरच्या टपरीवरचा चहा आणि संध्याकाळी घरी गेल्यावर पुन्हा एक पोळी, एक पळी भाजी, नैवेद्याच्या मुदी एवढा भात आणि एक वाटी ताक. बस, गेले दोन महिने रोज हाच विसूभाऊंनी चालवलेला आहाराचा राबता होता. अर्थात फक्त त्यांच्याने हे करणं ही अश्यक्यप्राय गोष्ट होती, पण वहिनींनी त्यांना शपथ घातली होती तेव्हा त्यांना हे करणं भाग होतं.

        शपथेचं आठवलं आणि विसुभाऊ स्वतःशीच हसले. वहिनींना वाटलं होतं कि त्यांच्या शपथ घेण्याच्या आग्रहावरून विसुभाऊ हा आहारसंयम पाळायला तयार झाले. पण त्याआधी वहिनींच्या 'माझ्यासाठी तरी तुम्ही हे करा. तुमच्याशिवाय’ या अर्धवट सोडलेल्या वाक्यावरच भाउंचा निर्धार पक्का झाला होता. झालं काय, एका संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आधी ते कुणापाशी काही बोलले नाहीत. कामाच्या ओघात वहिनींना सुद्धा काही जाणवलं नाही. पण मग शेजारच्या जोश्यांचा कुमार, उदया कामाकरता म्हणून दोन वर्ष अमेरिकेला जाणार होता, तो दोघांच्या पाया पडायला म्हणून आला आणि बोलुन गेला ‘वहिनी, दोन वर्ष तुमच्या भज्यांशिवाय काढावी लागतील’. वहिनींनी लगेच 'अरे आला आहेस तर पटकन चार तळते, खाऊनच जा' म्हणून करून आणल्या आणि विसुभाउंसमोर सुद्धा बशीत चार भज्यां ठेवल्या. पण कुमार गेला तरी त्या बशीत तश्याच आहेत ते पाहून त्यांनी भाऊंना निरखून पाहिलं आणि क्षणात 'चला दवाखान्यात' असं म्हणून त्यांचा हात धरला.

        दवाखान्यात जाईस्तोवर भाऊंनी वहिनींना आपलं दुखणं सांगितलं पण वहिनी शांतच राहिल्या. मग तपासणी वगैरे सगळं झाल्यावर डॉक्टर म्हणाले ' तुमचं कॉलेस्त्रोल लेवल बरंच वाढलंय, सध्या औषधं लिहून देतो. पण ताबडतोब आहारावर नियंत्रण आणा. तेलकट वर्ज्यच करा, नाहीतर हार्ट अटाकचे चान्सेस खूप वाढतील. व्यायाम, चालणं सुरु करा. दोन महिन्यांनी पुन्हा तपासुयात'. दवाखान्यातून परत येताना वहिनी आणखीनच सुन्न झालेल्या होत्या. विसुभाऊ सुद्धा काय बोलावं ते न कळून गप्पच राहिले. घरात पाउल टाकतो न टाकतो तोच वहिनी, मागून दार लावून, त्यांचा पाठीशी आल्या आणि डोकं टेकवून रडू लागल्या. विसुभाऊ मग त्यांचा हात धरत त्यांना बसवत म्हणाले 'अगं त्यात काय. दिली आहेत ना औषधं. मग काळजीचं काही कारण नाही. तू उगाच रडू नकोस. आण त्या भज्यां इकडे'. त्यावर वहिनींच्या चेहेऱ्यावर  जे भाव उमटले ते पाहून मात्र त्यांच्या छातीत चर्र झालं.

        वहिनींनी सरळ त्या भज्यां केरात टाकल्या आणि म्हणाल्या 'जळल्या मेल्या त्या भज्या. यापुढे या घरात पुन्हा व्हायच्या नाहीत. डॉक्टरांनी सांगितलंय तसं पथ्य पाळा, रोज संध्याकाळी आपण चालायला जात जाऊ. माझ्यासाठी तरी तुम्ही हे करा. तुमच्याशिवाय….…'. यापुढे त्यांना बोलवेना. तश्याच हुंदका देत राहिल्या. मग नंतर त्यांनी शपथ घातली होती. पण भाऊ म्हणाले 'अगं तुझ्या हातच्या भज्या न खाता पुढचं सारं आयुष्य काढणं म्हणजे महाभयंकर सजा आहे. तू सांगशील ते पथ्य मी पाळतो, दोन महिन्यांनी पुन्हा तपासणी आहे. गोष्टी आटोक्यात आहेत असं डॉक्टर म्हणाले तर मला चार भज्या करून दे. मग पुढचे दोन महिने मला सुखाचे जातील. डॉक्टरांची औषधं सोड, तुझ्या भज्या माझ्यासाठी लाइफलाईन आहेत'. नाईलाजाने मग वहिनी या सलोख्याला तयार झाल्या.  

        आता साध्या भज्या, मग त्यात एवढे विशेष काय असा प्रश्न कुणालाही पडणं अगदी साहजिक आहे. पण वहिनींच्या भज्यांची जादूच अशी होती कि कुणीही त्यावर जीव ओवाळून टाकावा. देव जेव्हा एखाद्या कलागुणांची वाटणी करत असतो तेव्हा कुणाच्या वाटेला काय येईल ते सांगता येत नाही. कुणाच्या गळ्यात तो मधुरस ओततो तर कुणाच्या हातात रंगा -चित्रांची जादुई चमत्कार घडविण्याची किमया. वहिनींना मात्र त्याने सुगरणीचा वर दिला होता, आणि त्यातही भज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचा किताब बहाल केला होता. साधी कांद्याची भजी, पण चवीला अशी काही रुचकर आणि खमंग कि खाणारा 'वाह क्या बात है' अशी दाद देऊन जायचा. बटाट्याची, पालकाची, वांग्याची, घोसाळ्याची, मेथीची अश्या नाना प्रकारच्या भज्या करण्यात वहिनींचा हातखंडा होता. विसुभाऊ आणि वहिनी यांचे सर्व स्नेही, सर्व मित्रपरिवार, सर्व शेजारी इतकेच काय तर त्यांच्या ओळखीच्या लोकातही वहिनींचा हा लौकिक प्रसिद्ध होता.

        विसुभाउंच्या ऑफिसातले मित्र महिन्यातून एका शनिवारी संध्याकाळी पत्ते खेळायचा अड्डा करत. घर कुणाचंही असो पण वहिनींना आमंत्रण आधी असायचं, भज्या करण्याकरिता. ‘आम्हाला काही येत नाहीत का?’ असं म्हणत दोघी-तिघींनी स्वतः करून घालायचा प्रयत्न केला, पण डाव सपशेल फसला. 'ठीक आहेत' या प्रतिक्रिया, जसजशी संध्याकाळ लांबत जाऊन रात्र व्हायला लागली आणि मद्याने जीभ सैल होऊ लागली तसतश्या 'साली तशी चव नाही' अशी होऊ लागली. मग त्या बायकांनी सुद्धा हात टाकले आणि तुम्ही येउन काय करायचं ते करून घाला असं म्हणत वहिनींना पाचारण केले. वहिनी अगदी न कुरकुरता, दरवेळी सगळं स्वतः करून घालायच्या आणि त्या बायका सुद्धा त्यांच्या मनापासून आभार मानायच्या.

        'आज ओवर-टाईम आहे वाटतं', जाता जाता टाकलेल्या शामरावांच्या या प्रश्नाने विसुभाऊ एकदम भानावर आले. घड्याळात काही सेकंदापूर्वीच पाच वाजून गेले होते पण बरचसं ऑफिस रिकामं झालं होतं. लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफलाईन. अवघी मुंबई लोकलच्या तालावर फिरते आणि लोकल घड्याळ्याच्या काट्यावर चालते, त्यामुळे मुंबई सेकंदाच्या काट्यावरच पुढे सरकत असते. संध्याकाळी पाच वाजले कि एक सेकंद सुद्धा कुणी ऑफिस मध्ये राहत नसत, तसं  केलं तर लोकल मिस होईल आणि उरलेल्या दिवसाचं गणितंच चुकेल या भीतीनं. विसुभाऊसुद्धा लगबगीनं  आपली बॅग आणि जेवणाचा डबा घेऊन उठले आणि  ऑफिस मधून बाहेर पडले. आफिस ते स्टेशन पाच मिनीटाचं अंतर आणि ५:०९ ची लोकल म्हणजे तसा वेळ होता. पण त्यांची पावले जोरात पडू लागली. काही करून आज विसुभाउंना लोकल चुकवायची नव्हती, घरी वेळेवर पोचायचं होतं.

        दवाखान्यात जायची वेळ आली त्याला परवाच दोन महिने पूर्ण झाले होते. वहिनीं स्वतःच डॉक्टरची अपौइंट्मेंट घेऊन त्यांना पुन्हा तपासणी करण्याकरिता घेऊन गेल्या. आज तपासणीचे रिपोर्ट मिळणार होते. दुपारी लंचच्या सुट्टीत विसुभाऊ दवाखान्यात जाउन रिपोर्ट घेऊन आले. रिपोर्ट उत्तम होते. डॉक्टर तिथेच होते, तेही म्हणाले 'सगळं काही नॉर्मल दिसतंय, दोन महिन्यात खूप प्रगती आहे. पुढच्या तपासणीत असंच आढळलं तर आपण औषधं कमी करु. फक्त औषधाचा परिणाम नाहीये हा, जो काही रुटीन चालवला आहेत तो असाच सुरु ठेवा'. विसुभाऊ म्हणाले ' अहो माझ्याने काय होणार, हे सगळं आमच्या हिचं…' आणि डॉक्टरदेखील मोकळ्याने जोरात हसले.

        गेल्या दोन महिन्यात वहिनींनी जेवणाचाच नाही तर संध्याकाळी लांबवर चालण्याचा सुद्धा नियम केला होता. आधी विसुभाऊ कंटाळायचे पण मग त्यांना उलट त्याची आवड लागली. वहिनींशी होणारया गप्पातून भाऊंना त्यांच्याबद्दल बरयाच नवीन गोष्टी कळून आल्या. वहिनींच्या आवडी निवडी आपण कधी जवळून जाणून घेतल्याच नव्हत्या याची जाणीव त्यांना झाली. चार भिंतीतल्या त्या संसाराच्या पलीकडे वहिनींचं जग असेल का, याचा त्यांनी विचारही कधी केला नव्हता. पण घराबाहेरच्या, आजूबाजूला घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अश्या कितीतरी गोष्टीत वहिनींना रस आहे आणि त्यावर त्या सारासार विचार करून स्वतःची मतं स्पष्टपणे मांडू शकतात हे जाणून भाऊंना आश्चर्य वाटले. एक नवीन आदर निर्माण झाला आणि लग्नानंतर वहिनींना शिक्षण पूर्ण करून पदवीधर व्हायचा आग्रह न केल्याबद्दल चूक केल्यासारखे वाटू लागले. एक उत्तम शिक्षिका किंवा सामाजिक कार्यकर्त्या त्या झाल्या असत्या. त्यांनी तसे बोलून दाखवले पण वहिनीच म्हणाल्या ' विचारलं असतं तर तुम्ही नाही थोडंच म्हणाला असता? आणि मी कुठली तक्रार करतेय किंवा संसारात समाधानी नाहीये असं तुम्हाला वाटतं का?'. यावर विसुभाउंना बोलण्यासारखं काहीच नव्हतं.

        स्टेशनवर येईतो विसुभाऊ घामाळलेले होते आणि छाती भरून आली होती. उगीच घाई केली असं त्यांना वाटले. स्टेशन खच्चून भरले होते पण नेहमीच्या सराईतपणे विसुभाऊ लोकल मध्ये पटकन चढता येईल अश्या जागी येउन थांबले. छातीतले ठोके नॉर्मल होतायत इतक्यात लोकल आलीच. लोकल अर्थात नेहमीप्रमाणे भरली होती, तेव्हा बसायला जागा मिळायची सोयच नव्हती. विसुभाऊ दारापाशीच उभे राहिले. साधारण पंचवीस एक मिनिटांचा प्रवास होता. लोकल पुन्हा धावू लागली.

        विसुभाउंनी आजूबाजूला नजर टाकली. बहुतेक सगळे ओळखीचे चेहरे होते. काहींची नावे, ते कुठे काम करतात वगैरे ठाऊक होते तर काही नुसतेच तोंड ओळखीचे. नजरेला नजर भिडता काहीजणांनी ओळखीची चिन्हे दाखवली पण बहुतेक जण आपापल्या जगात मग्न होता. कुणाच्या डोळ्याभोवती चिंतेच्या रेषा, तर कुणाच्या ओठाशी कुठल्यातरी गोड आठवणींच्या स्मितरेषा होत्या. जन्मापासून मरणापर्यंत, एका बिंदूपासून दुसऱ्या  बिंदू पर्यंत, प्रत्येकाच्या आयुष्याची एक सरळ रेष असते. पण जरा जवळून, सूक्ष्मपणे पाहिले तर जाणवते कि ती रेष आहे तितकी सरळ नाही. तिला वळणं आहेत, चढ उतार, खाच खळगे आहेत. प्रत्येक रेष दुसऱ्यापेक्षा कमी जास्त, दुसऱ्या पासून वेगळी. एखादी खडकावर दगडाने ओढलेल्या रेघे सारखी ओबड धोबड, एखादी खडूने फळ्यावर काढलेल्या रेघे सारखी शिस्तबद्ध तर एखादी रांगोळीच्या ठिपक्यांना जोडणाऱ्या रेघे सारखी नाजूक, रंगाने भरलेली. विसुभाऊ स्वतःशीच हसले. वहिनींच्या सहवासात रोज चालताना, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची, कवितेची समीक्षणे  ऐकून आपल्या विचारात थोडी कल्पकता आली आहे असे त्यांना वाटले.

            'बाबूजी, कूछ पैसा दो ना. बहोत भूक लगी है', कडेवर एक-दीड वर्षाचं मुल घेऊन एक आठ-दहा वर्षाची मुलगी हात पुढे करून भीक मागत होती. रोजच्या सवयीमुळे फारसे प्रवासी तिच्याकडे पहातही नव्हते. एक दोघांनी खिशातून चार आठ  आणे काढून तिच्या हातावर ठेवले. ती विसूभाऊंच्या दिशेने आली तोवर त्यांचा हात खिशात पैसे काढण्याकरिता गेला होता. हातात पैसे आले त्यात दोन पाच रुपयांची नाणी होती. त्यातलं एक त्यांनी तिच्या हातात ठेवलं आणि मग त्या तान्ह्या मुलाकडे पहात दुसरं नाणं सुद्धा तिला दिलं. मुलीने एकदा हातातल्या नाण्यांकडे आणि एकदा विसुभाउंकडे पाहिले. मग नाणं कमरेवर परकरात गुंडाळत ती निघून गेली. विसुभाउंना कल्पना होती कि त्या मुलाशी तिचा काही संबंध नसेल, भीक जास्त मिळावी म्हणून जो कुणी या मुलांना भीक मागायला धाडत असेल त्यानेच ते मुल तिच्याकडे दिलं असेल. ते पैसेही बरेचसे कदाचित त्याच्याच हातात जातील, पण मुलीने एक नाणं चटकन परकरात गुंडाळलं यावरून त्यांना बरं वाटलं. कदाचित ते तरी त्या माणसाच्या हातात न जाता तिला मिलेल अशी आशा त्यांना वाटली.

                विसुभाऊ आणि वहिनींच्या लग्नाला सतरा वर्षे उलटून गेली होती  पण अपत्यसुख नव्हते. सुरवातीला घरच्यांच्या आग्रहावरून उपास तपास, देव दर्शनं, वगैरे झाली. खरंतर दोघांच्या घरच्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून दोघांनी न कुरकुरता या गोष्टी केल्या पण दोघांना जाणीव होती कि याचा काही उपयोग नव्हता. मग विसूभाऊंनीच वहिनीपाशी विषय काढला डॉक्टरांच्याकडून तपासणी करून सल्ला घेण्याचा. वहिनी नुसत्याच बघू म्हणाल्या पण तितक्याश्या उत्साही वाटल्या नाहीत. भाऊंनी दोन-तीन दिवसांनी पुन्हा विषय काढला तेव्हा वहिनी म्हणाल्या 'घडायचं असतं तर आत्तापर्यंत होऊन गेलं असतं, पण तसं झालं नाही. डॉक्टरांनी निष्कर्ष काढला कि आपल्या दोघांपैकी एकात दोष आहे तर आपण काय करायचं? एकमेकांना पारखं होऊन दुसरं लग्न करायचं? माझ्याकडून ते घडणार नाही आणि माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा तसं काही करणार नाहीत. मग मार्ग उरतो एखादं मुल दत्तक घेण्याचा. पण ज्याच्यात दोष नाही त्याला कदाचित नेहमीच आपल्याला तडजोड करावी लागली असं वाटेल. त्यापेक्षा आपण सरळ दत्तक घेऊ किंवा असेच राहू. तुमच्या भावाची, इतर नातेवाईकांची मुलं काही आपल्याला परकी नाहीत, आपण त्यांच्यावर आणि ते आपल्यावर तितकीच माया करतात. शिवाय त्याबाहेरही गरीब, अनाथ मुलांची कमी नाही. कदाचित एखाद दुसरं मुल वाढवण्यापेक्षा अश्या गरजू मुलांची मदत आपल्याकडून व्हावी असं देवाच्या मनात असेल'. अनेकदा व्हायचं तसं यावेळीदेखील विसुभाउंना बोलण्यासारखं काहीच नव्हतं.  

            दत्तक घ्यायचं राहून गेलं पण नात्यातल्या आणि शेजारच्या सगळ्याच मुलांची वहिनी ही आवडती मावशी, आत्या, मामी, काकू होऊन राहिली होती. त्यामुळे घरी सतत मुलांची ये जा असायची. आजूबाजूच्या बऱ्याचश्या घरात दोघे कमावते होते, त्यामुळे त्यांची मुले शाळेतून लवकर घरी यायची त्यांना खाऊ-पिऊ, शाळेचा अभ्यास वगैरे वहिनी करायच्या. त्यातली बरीचशी आता मोठी होऊन, शिक्षण, नोकरी साठी बाहेर पडली होती पण पुन्हा आली की वहिनींच्या हातचं खाल्ल्याशिवाय जायची नाहीत. आणि त्यातही भज्यांना विशेष मागणी. आपले विचार घोळून पुन्हा भजीपाशी आले याची विसुभाउंना गंमत वाटली. एखादी गोष्ट मनात ठाण मांडून बसली कि कितीही दुसरा विचार करो, पुन्हा फिरून आपण त्यावरच येतो. पण असू दे, आता आपलं स्टेशन आलंच आहे, आणि स्टेशन पासून घर अगदी तीन चार मिनिटांच्या अंतरावर तेव्हा फार वाट पहावी लागणार नाही, या विचाराने विसुभाऊ विसावले. गाडीचा वेग मंदावला आणि गाडी स्टेशनवर येउन लागली.

            माणसांच्या उतरत्या लोंढ्यासोबत विसुभाऊ सुद्धा खाली उतरले. कधी एकदा घर गाठू असं त्यांना झालं होतं. डॉक्टरांचा रिपोर्ट घेऊन ऑफिस मध्ये आल्या आल्या त्यांनी वहिनींना फोन केला होता. आधी त्यांना वाटले जरा गंमत करावी आणि रिपोर्ट चांगला नाही असं सांगावं, पण वहिनींचा काळजीचा चेहरा त्यांच्या समोर आला आणि त्यांनी तो विचार काढून टाकला. वहिनींनी फोन घेतल्या घेतल्या त्यांनी रिपोर्ट चांगला आहे असं सांगून टाकलं. वहिनींनी पुन्हा पुन्हा विचारून सगळी रीतसर माहिती घेतली तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली. इतक्यात साहेबांनी बोलावलंय असं सांगत ऑफिस मधला प्यून आला म्हणून त्यांना घाईघाईत फोन ठेवावा लागला.

            ट्रेनचा जोरात वाजलेला होर्न आणि त्यासोबत एक मोठा सामुदायिक कल्लोळ उठला. काय झालं म्हणून पहायला विसुभाऊ मागे वळले आणि त्यांच्या छातीत धस्स झालं. मघाशी भीक मागणारी मुलगी रुळावर होती. काहीतरी पडलं होतं ते उचलायला म्हणून ती वाकली होती. आता तिच्या हातात ते मुल नव्हतं पण त्या रुळावरून जाणारी दुसरी लोकल वेगाने स्टेशनवर येतेय ह्याकडे तिचं लक्ष नव्हतं. लोक मोठ्याने ओरडून तिला रुळावरून बाजूला हो म्हणून सांगत होते पण जे काही उचलण्याचा तिचा प्रयत्न चालला होता त्यात ती गर्क होती. विसुभाउंना आपण दिलेल्या नाण्याची आणि तिने तो परकरात खोचल्याची आठवण झाली. त्यांच्या हातातून ऑफिसची बॅग आणि डबा आपसूक खाली पडला आणि कसलाही विचार न करता त्यांनी प्लॅटफॉर्म वरून थेट रुळावर उडी घेतली. जमावातून आणखी आवाज उठला, विसुभाऊ धावत मुलीपाशी गेले, तिच्यापाशी पोचतो न पोचतो, तोवर ती जे काही घ्यायचा प्रयत्न करत होती ते घेऊन रुळावरून उडी मारून पलीकडे गेली. विसुभाउंनी पाहिले, तो ती मुलगी कागदाच्या पुरचुंडीतुन काढून एक भजी तोंडात टाकत होती. त्यांना दुपारी फोन ठेवायच्या आधी ऐकलेले वहिनींचे शब्द ऐकू आले 'संध्याकाळी भजी करते'. आणि विसुभाऊंच्या आयुष्याची रेघ दुसऱ्या बिंदूवर येउन टेकली.

सुरेश नायर
डिसेंबर २०१३

No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...