(एक मित्राच्या आई वडिलांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या प्रसंगी रचलेली कविता)
वय ऐंशी उलटले तेव्हा मला उमजले
जे जे मी साधले ते ते मला गवसले
उत्तुंग पर्वतशिखर मला सर करायचे होते
विस्तीर्ण सागराला आलिंगन द्यायचे होते
चांदणे वेचून ओंजळीत भरायचे होते
कल्पवृक्षाचे बन अंगणी फुलवायचे होते
विशीतल्या स्वप्नांची हीच गोडी असते
कल्पनेचे फुलपाखरू हवे तसे उडते
चाळीशीच्या उंबरठ्यावर पाय खाली टेकले
साठी आली तोवर खुंट, घट्ट खोल रुतले
मग सुरु झाली त्या स्वप्नांची उजळणी
किती अधिक, किती वजा, सर्वांची मोजणी
कर्तृत्वाची शिखरं सारी मी सर केली
संकटांना अभिडपणे आलिंगने दिली
कुटुंबाच्या सहवासात ओंजळ सुखाने भरली
सगे -सोयरे मित्रांची अंगणात बाग फुलली
कल्पनेतली फुलपाखरं नेहमीच उडत होती
क्षणोक्षणी मधुकण प्राशून घेत होती
वय ऐंशी उलटले, तेव्हा उमजतंय मला
जे जे मी साधले, ते ते गवसलय मला
सुरेश नायर
2014
Superb
ReplyDelete