Wednesday, April 9, 2014

तरुण आहे रात्र अजुनी - सुरेश भट

आज दिवसभर तिचं मन अस्वस्थ होतं. मनात एक काहूर माजलं होतं, हुरहूर राहिली होती. खरंतर रात्रीच्या अंधारासोबत मागचं सगळं काही विरून गेलं होतं. निदान तिला तरी असं वाटत होतं सूर्यप्रकाशात धुकं विरावं तसं सारं काही सूटं, मोकळं झालं होतं. एक नवा दिवस, नवी रात्र समोर होती.

पण तिला पूर्ण जाग आली तोवर तो कधीच कामावर निघून गेला होता. तिला चाहूलही न लावू देता. काही वेळ ती तशीच पडून राहिली. रिकाम्या जागेत, चादरीच्या चुणीत, उशीच्या खोबणात त्याचा स्पर्श, गंध शोधायचा, अनुभवायचा प्रयत्न करत.

नंतर ती उठली आणि कामाला लागली. सारं घर आवरलं. धुळीचा एकेक कण, एकेक कोळीष्टक टिपून सारं काही स्वच्छ केलं. पडदे झटकले, चादरी - टेबलक्लॉथ  बदलले, फुलदाणीत फुलांची सजावट केली. तिन्ही सांज झाली तसं अंधारून येऊ लागलं. पण आज पौर्णिमा होती, चांदण्यात सारं काही न्हाहून गेलं होतं. वाऱ्याची झुळूक आली आणि त्यासोबत रातराणीचा गंध. निरव शांततेत फक्त दूर समुद्राच्या लाटांचा आवाज काय तो येत होता.

इतक्यात तो आला. तिने पाहिले तो त्याचा चेहरा शिणलेला, डोळे जडावलेले. काही न बोलता तो थेट पलंगावर जाउन निजला, त्या कुशीवर वळून. ती आली तोवर तो शांत निजला होता, त्याचा श्वास मंदावला होता. हलकेच त्याच्यावर पांघरूण टाकून, ती चाहूल न लावता पलीकडे पहुडली. दूरवरून येणाऱ्या लाटांच्या आवाजात आता त्याचा श्वासांचा आवाज एक झाला होता. आणि तिचं मन विचारत होतं 'तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे......


No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...