Wednesday, June 12, 2013

वठलेलं झाड

वठलेलं एक झाड, ना फुल ना पालवी
वसंत, शिशिर काय, दोन्ही सारखेच घालवी

किती पक्ष्यांनी यावर आपली घरटी बांधली
किती वाटसरूंना याने दिली उन्हात सावली

पोरासोरांनी तोडून याची फळे चाखली
झोके बांधले किती, फांदी जरा न वाकली

आता झाडावर आहेत काही पिवळीशी पानं
नसा आठ्ल्यात आतून, झालंय सुष्क आणि जीर्ण

कुणी म्हणालं "कशाला वीज पडायची पहा वाट,
हातचं सरण जाऊन येईल कोळसाच हातात

दोन दमडी येतील एवढी लाकडं आहेत अजून,
चार दिवस चुलीवर भाकर निघेल भाजून”

कधीतरी व्हायचं होतं शेवटी घडून गेलं
काल रात्रीच्या वादळात झाड उन्मळून पडलं

वादळातली मृतं जाळायला सरण कामी आलं
मयतांचं माहित नाही, झाड स्वर्गात गेलं

सुरेश नायर
२०१३

No comments:

Post a Comment

असा मी असा मी

प्रत्येक माणसाचा एक मूळ जात्या स्वभाव असतो. पिंड म्हणा हवे तर. काही नैसर्गिक वृत्ती (introvert, extrovert, personality types वगैरे) तर काही ...