एकदा सहज मी तलतचं "जलते हैं जीसके लिए" जरा वेगळ्या उडत्या चालीत गुणगुणायला लागलो. मग काही दिवसांनी विचार आला की आपली चाल आहे तर त्यावर आपलेच शब्द घालावे आणि त्यातून हे गीत घडून आले.
कधी कधी होते की असे, लागते कशाचे पिसे
ध्यानी मनी मग एकच ते, दुजे काही न सुचे
कधी वाटे उंच आकाशी झेप घेत पंख पसरावे
कधी वाटे हलके हलके पाण्यावरी मी तरंगावे
कधी वाटे शाल पांघरुनी शेकोटीशी हात उबवावे
अन गुणगुणत अंगाई, कुणी शांत मज निजवावे
कधी यावा सूर्य हाताशी कधी सजावा चंद्र शिरी
कधी वेचू तारे यावे भरभरूनी माझ्या ओंजळी
कधी अणुमात्र होऊन मी हरवावे न पहावे कुणी
कधी पहावे तिथे मी असो विश्वची घ्यावे व्यापुनी
कधी हसावे स्वतःवर मी कधी रडावे कुणासाठी
कधी थोपटावी पाठ कुणी हात धरावा कुणी पाठी
कधी कुणा देत आधार, व्हावे कुणाची कधी काठी
कधी जगावे स्वतःसाठी, कधी मरावे कुणासाठी
No comments:
Post a Comment