Friday, February 26, 2010

पंख


उडता   उडता   एकदा   एक   राघू
झाडाच्या   एका   फांदीवर   येऊन   बसतो
हिरवट   पिवळ्या   पिकल्या   पेरूला
आपल्या   लालबुंद   चोचीने   कोरु   लागतो

तोच   एक आवाज   येतो,  "सावध   सावध
लबाड  काळ्या   बोक्यापासून   जरा   जपून   रहा"
राघू   पाहतो, अंगणातल्या   पिंजऱ्यात   पोपट   दिसतो
म्हणतो   "धन्यवाद   मित्रा,  आहेस   तू   कसा "

पोपट  म्हणतो "एकदम   झकास,
ताज्या   हिरव्या   मिरच्या,  पेरूच्या   गोड   फोडी,
पिंजऱ्यातला   या   आयुष्याची   तुला
काय   म्हणून   सांगू   गोडी "

जो   तो   लाडाने   मला   मिठू   मिठू म्हणतो
मीही   त्यांना   मग   राम   राम करतो
सध्या   घेतोय  जरा   इंग्रजीचा  लेसन
'गुड   मोर्निंग,  टाटा,  थ्यांक  यु,  नो  मेन्शन'

राघू म्हणतो  "नशीबवान   मोठा   आहेस गड्या,
पिंजऱ्याचे   भोवती   तुला आहे   सरंक्षण
खाण्या   पिण्याचीही   नाही   काही   चणचण
वेळे   आधी   तुला  कधी   यायचे   नाही   मरण

मी   बापडा   उडत   असतो,  पंख   घेऊन   आपले
पोटासाठी   जिथे   तिथे   वणवण करत
आपले   तर   जगणे   तेवढेच   आहे   जोवर
पंखांमध्ये   दोन   या आहे  थोडी  ताकद

तुला  नाही  वाटत   कधी पिंजऱ्याबाहेर   यावे,
पंखांमध्ये   वारे   भरून   लांबवर   उडावे?"
हळू   आवाजात   पोपट म्हणतो "मालकाने   पंख  कापले
पिंजऱ्यात   राहतो   त्याला,  कशाला   पंख हवे ?

 तुटल्या   पंखाकडे   पाहत   राघू   पुढे   बोलत   नाही
जाताना   फक्त   म्हणतो  'मित्रा   आता  निघतो'
दूरवर त्याला जाताना  पाहत  पोपट  मात्र
पिंजऱ्यातल्या  झोक्यावर   हळू   झोके   घेत   राहतो

सुरेश नायर
२ /२०१०

Sunday, February 21, 2010

घर

'घर'...... Dictionary मध्ये पाहिलं तर एक रुक्ष वर्णन सापडतं "a building in which people live; residence for human beings ". पण खरंच घर या शब्दाला अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक  गरजेपेक्षा  कितीतरी  मोठा अर्थ आहे. अगदी लहानपणीच  चिऊ-काऊच्या  गोष्टीतून घराची आणि आपली भेट  होते आणि आयुष्यभर वेगवेगळ्या  रूपाने, वेगवेगळ्या  अर्थाने  ते कायम आपल्या  सोबत  राहते. यातूनच  मग "घर असावे  घरासारखे, नकोत  नुसत्या  भिंती,  तिथे  असावा  प्रेम-जिव्हाळा,  नकोत  नुसती  नाती" या सारखे  काव्य  रूप घेते. याच  घरावर  लिहिलेली  एक  कविता.

घर , एक  वास्तू,  विटा  मातीची
घर , एक  कल्पना,  प्रत्येकाच्या  मनाची

घर  थारा  निवारा, कष्टाचे  अन  घामाचे
घर  इच्छा  आशा, सुखद  आठवणींचे

घर  महाल, वाडा,  झोपडे, वारूळ  गुहा, खोपटे
कधी  कपार  उंच  कड्याची, कधी  भुयार  पोखरलेले

घर  बालपणीचे, भातुकलीतल्या  खेळातले
गोष्टीतल्या  चिऊ  काऊचे, एक  मेणाचे  एक  शेणाचे

घर  तारुण्याचे, जिद्ध  अपेक्षा  आकांक्षेचे
भविष्याच्या  ओढीचे,  गोड  गुलाबी  स्वप्नांचे

घर  वार्धक्याचे, आश्रयाचे  आधाराचे
 स्मरीत, विस्मरीत अश्या आठवणींच्या  गोतावळयाचे

घर  प्रेमाचे, विश्वासाचे,नातीगोती,  जुळल्या  मनांचे
घर  संशयाचे, विरल्या स्वप्नांचे, दुभंगले  विखुरले  विभागलेले

घर  असते प्रत्येकाचे, किती  भिंती खिडक्या  दारे
सजवायचे  कसे,  भरावे  कशाने, हे  ठरवावे  ज्याचे  त्याने

सुरेश नायर
२/२०१०

Monday, February 15, 2010

शून्य

शून्य  गाव  शून्य  वस्ती
शून्य  झाडे  शून्य  घरटी

शून्य  खिडक्या  शून्य  दारे
शून्य  भिंती  शून्य  वारे

शून्य  दिवा  शून्य  वाती
शून्य  पणती  शून्य  ज्योती

शून्य  शब्द  शून्य  अर्थ
शून्य  ओळी  शून्य  पानी

शून्य  डोळा  शून्य  आसू
शून्य  गाली  शून्य  हासू 

शून्य  अधिक  शून्य  वजा
शून्य  हाती  शून्य  बाकी

शून्य  जगतो  शून्य  आम्ही
शून्य  सारे   शून्य  मीही

सुरेश नायर
२ /२०१०

ह्या  कवितेचा  संदर्भ  नक्की  द्यायचा  कसा  हा  स्वतः  मला  प्रश्न  आहे. कारण  कधी, केव्हा  आणि  का  ह्या  अशा शून्याच्या  भकास  चित्राची  झलक  मला  दिसली  ते  सांगता  येणार  नाही. खूपच  नकारात्मक  भावना  आहेत  म्हणून   मी  ही  कविता  पूर्ण  न  करता  सोडून  देणार  होतो.  पण  दुर्दैवाची  वस्तुस्थिती  अशी   आहे  की  कित्येकांच्या  मनात  हे  असेच  चित्र  कदाचित  रोज  दिसत  असेल.  एकदा  कधीतरी  माझ्या  मनात  'One Flew Over The Cuckoo's Nest' हा चित्रपटही  डोकावून  गेला. 

आत्मजा

पक्षांची  मंजुळ  गाणी
निर्मळ  झऱ्याचे  पाणी
तशी  भासे  लोभसवाणी
माझी  छकुली  फुलराणी

क्षण  क्षण  दे  नव  आनंदा
मज  स्वप्नांची  पूर्तता
मी  कुशीत  तुजला  घेता
ये  अर्थ  जसा  जणू  गीता

काया  तव  जणू  का  साय
कर  इवले,  इवले  पाय
हरपून  भान  मज  जाय
नित  पाहणे  हाच  उपाय

झुलझुलते  हळू  रांगणे
बडबडते  मधु  बोलणे
खळखळूनी  कधी  हासणे
भूवरीच  ये  चांदणे

तू  पाळण्यात  अशी  निजती
शिंपल्यात  जणू  का  मोती
सृष्टी  अंगाई   गाती
वारा  तव  झोका  देती  

पाहू  मी  तुजला  कितीदा
घेऊ  तुज   कुशीत  कितीदा
मम   हृदयाची  हर्षदा
तू  माझी  गे  आत्मजा

सुरेश नायर
२ /२०१०

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...