Monday, February 15, 2010

आत्मजा

पक्षांची  मंजुळ  गाणी
निर्मळ  झऱ्याचे  पाणी
तशी  भासे  लोभसवाणी
माझी  छकुली  फुलराणी

क्षण  क्षण  दे  नव  आनंदा
मज  स्वप्नांची  पूर्तता
मी  कुशीत  तुजला  घेता
ये  अर्थ  जसा  जणू  गीता

काया  तव  जणू  का  साय
कर  इवले,  इवले  पाय
हरपून  भान  मज  जाय
नित  पाहणे  हाच  उपाय

झुलझुलते  हळू  रांगणे
बडबडते  मधु  बोलणे
खळखळूनी  कधी  हासणे
भूवरीच  ये  चांदणे

तू  पाळण्यात  अशी  निजती
शिंपल्यात  जणू  का  मोती
सृष्टी  अंगाई   गाती
वारा  तव  झोका  देती  

पाहू  मी  तुजला  कितीदा
घेऊ  तुज   कुशीत  कितीदा
मम   हृदयाची  हर्षदा
तू  माझी  गे  आत्मजा

सुरेश नायर
२ /२०१०

No comments:

Post a Comment

असा मी असा मी

प्रत्येक माणसाचा एक मूळ जात्या स्वभाव असतो. पिंड म्हणा हवे तर. काही नैसर्गिक वृत्ती (introvert, extrovert, personality types वगैरे) तर काही ...