Friday, February 26, 2010

पंख


उडता   उडता   एकदा   एक   राघू
झाडाच्या   एका   फांदीवर   येऊन   बसतो
हिरवट   पिवळ्या   पिकल्या   पेरूला
आपल्या   लालबुंद   चोचीने   कोरु   लागतो

तोच   एक आवाज   येतो,  "सावध   सावध
लबाड  काळ्या   बोक्यापासून   जरा   जपून   रहा"
राघू   पाहतो, अंगणातल्या   पिंजऱ्यात   पोपट   दिसतो
म्हणतो   "धन्यवाद   मित्रा,  आहेस   तू   कसा "

पोपट  म्हणतो "एकदम   झकास,
ताज्या   हिरव्या   मिरच्या,  पेरूच्या   गोड   फोडी,
पिंजऱ्यातला   या   आयुष्याची   तुला
काय   म्हणून   सांगू   गोडी "

जो   तो   लाडाने   मला   मिठू   मिठू म्हणतो
मीही   त्यांना   मग   राम   राम करतो
सध्या   घेतोय  जरा   इंग्रजीचा  लेसन
'गुड   मोर्निंग,  टाटा,  थ्यांक  यु,  नो  मेन्शन'

राघू म्हणतो  "नशीबवान   मोठा   आहेस गड्या,
पिंजऱ्याचे   भोवती   तुला आहे   सरंक्षण
खाण्या   पिण्याचीही   नाही   काही   चणचण
वेळे   आधी   तुला  कधी   यायचे   नाही   मरण

मी   बापडा   उडत   असतो,  पंख   घेऊन   आपले
पोटासाठी   जिथे   तिथे   वणवण करत
आपले   तर   जगणे   तेवढेच   आहे   जोवर
पंखांमध्ये   दोन   या आहे  थोडी  ताकद

तुला  नाही  वाटत   कधी पिंजऱ्याबाहेर   यावे,
पंखांमध्ये   वारे   भरून   लांबवर   उडावे?"
हळू   आवाजात   पोपट म्हणतो "मालकाने   पंख  कापले
पिंजऱ्यात   राहतो   त्याला,  कशाला   पंख हवे ?

 तुटल्या   पंखाकडे   पाहत   राघू   पुढे   बोलत   नाही
जाताना   फक्त   म्हणतो  'मित्रा   आता  निघतो'
दूरवर त्याला जाताना  पाहत  पोपट  मात्र
पिंजऱ्यातल्या  झोक्यावर   हळू   झोके   घेत   राहतो

सुरेश नायर
२ /२०१०

No comments:

Post a Comment

एक कोना

This twilight moment at home was worth a click and inspiring दिवानखाने का एक कोना है,  मेरा दोस्त, हमदर्द और साथी सुबह की ताजा गरम चाय या शा...