Monday, June 30, 2014

वय ऐंशी उलटले

(एक मित्राच्या आई वडिलांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या प्रसंगी रचलेली कविता) 
वय ऐंशी उलटले तेव्हा मला उमजले
जे जे मी साधले ते ते मला गवसले

उत्तुंग पर्वतशिखर मला सर करायचे होते
विस्तीर्ण सागराला आलिंगन द्यायचे होते
 चांदणे वेचून ओंजळीत भरायचे होते
कल्पवृक्षाचे बन अंगणी फुलवायचे होते

 विशीतल्या स्वप्नांची हीच गोडी असते
कल्पनेचे फुलपाखरू हवे तसे उडते
चाळीशीच्या उंबरठ्यावर पाय खाली टेकले
साठी आली तोवर खुंट, घट्ट खोल रुतले

 मग सुरु झाली त्या स्वप्नांची उजळणी
किती अधिक, किती वजा, सर्वांची मोजणी
कर्तृत्वाची शिखरं सारी मी सर केली
संकटांना अभिडपणे आलिंगने दिली

कुटुंबाच्या सहवासात ओंजळ सुखाने भरली
सगे -सोयरे मित्रांची अंगणात बाग फुलली
कल्पनेतली फुलपाखरं नेहमीच उडत होती
क्षणोक्षणी मधुकण प्राशून घेत होती

वय ऐंशी उलटले, तेव्हा उमजतंय मला
जे जे मी साधले, ते ते गवसलय मला
 सुरेश नायर
2014 

Wednesday, April 9, 2014

तरुण आहे रात्र अजुनी - सुरेश भट

आज दिवसभर तिचं मन अस्वस्थ होतं. मनात एक काहूर माजलं होतं, हुरहूर राहिली होती. खरंतर रात्रीच्या अंधारासोबत मागचं सगळं काही विरून गेलं होतं. निदान तिला तरी असं वाटत होतं सूर्यप्रकाशात धुकं विरावं तसं सारं काही सूटं, मोकळं झालं होतं. एक नवा दिवस, नवी रात्र समोर होती.

पण तिला पूर्ण जाग आली तोवर तो कधीच कामावर निघून गेला होता. तिला चाहूलही न लावू देता. काही वेळ ती तशीच पडून राहिली. रिकाम्या जागेत, चादरीच्या चुणीत, उशीच्या खोबणात त्याचा स्पर्श, गंध शोधायचा, अनुभवायचा प्रयत्न करत.

नंतर ती उठली आणि कामाला लागली. सारं घर आवरलं. धुळीचा एकेक कण, एकेक कोळीष्टक टिपून सारं काही स्वच्छ केलं. पडदे झटकले, चादरी - टेबलक्लॉथ  बदलले, फुलदाणीत फुलांची सजावट केली. तिन्ही सांज झाली तसं अंधारून येऊ लागलं. पण आज पौर्णिमा होती, चांदण्यात सारं काही न्हाहून गेलं होतं. वाऱ्याची झुळूक आली आणि त्यासोबत रातराणीचा गंध. निरव शांततेत फक्त दूर समुद्राच्या लाटांचा आवाज काय तो येत होता.

इतक्यात तो आला. तिने पाहिले तो त्याचा चेहरा शिणलेला, डोळे जडावलेले. काही न बोलता तो थेट पलंगावर जाउन निजला, त्या कुशीवर वळून. ती आली तोवर तो शांत निजला होता, त्याचा श्वास मंदावला होता. हलकेच त्याच्यावर पांघरूण टाकून, ती चाहूल न लावता पलीकडे पहुडली. दूरवरून येणाऱ्या लाटांच्या आवाजात आता त्याचा श्वासांचा आवाज एक झाला होता. आणि तिचं मन विचारत होतं 'तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे......


Tuesday, April 8, 2014

आईशी जडले नाते

श्वास घेता पहिला नाते नाळेशी मग सुटते 
म्हणुनी का आईशी जडले नाते अपुले तुटते ? 

आटतो पान्हा गोडी जेव्हा मऊ भाताची जडते 
म्हणुनी का आईशी जडले नाते अपुले तुटते ? 

दुडुदुडू येता चाल कडेवरचे बागडणे विरते 
म्हणुनी का आईशी जडले नाते अपुले तुटते ? 

दृष्ट काढण्या पुढती अपुली सृष्टी गेली असते 
म्हणुनी का आईशी जडले नाते अपुले तुटते ? 

नवमासी जी उदरी अपुल्या बीजांकुर एक जपते 
आकारासी येउन बीज ते तिज हाती मोहरते 

त्या शरीरातील नसानसातून तीच वाहत असते 
म्हणुनीच तर आईशी जडले नाते कधी ना तुटते


सुरेश नायर
एप्रिल/ २०१४

New England Trip - Summer 2023

Links to all photos and videos from the trip  https://photos.app.goo.gl/XqbL45Cf6DTUyyLq5 Planning I asked my son Malhar where he wanted to ...