Saturday, February 27, 2016

नेसूनी पैठणी वाट पाहते

कल्पना  करा मराठी फौज मोहिमेवर गेली आहे. दिवस, आठवडे, महिने लोटतात. मग बातमी येते कि मोहीम फत्ते झाली. सगळीकडे आनंदी आनंद. इतके दिवस थरथरणाऱ्या  हातांनी कपाळी कुंकू लावणाऱ्या स्त्रिया आज ठेवणीतली पैठणी घालून, डोळ्यात तेल लावून वाट पाहतायत. 
हे composition पटदीप रागावर आधारित आहे. काहीशी लावणीच्या अंगाची चाल, मध्ये कोरस. पटदीप हा एक करुण, विरही भावाचा राग. 'मर्मबंधातली ठेव ही', 'मेघा छाये आधी रात' किंवा हिराबाई बडोदेकर यांच्या आर्त स्वरातील 'पिया नाही आये'  बंदिश, ही या रागातली काही ठळक उदाहरणे.   

नेसूनी पैठणी वाट पाहते दारी
अजून का न आली परदेसाहून स्वारी

(टपटप टपटप टापा टाकीत, दौडत घरच्याकडे
दरी खोऱ्या अन कडे-कपारी, भेदीत जाती पुढे
धुळीचे वादळ मागे उडे)

पाहिली न कधीची पडछायाही त्यांची
संपेल अशी ही रात्र कधी अवसेची
जीव झुरतो पाहण्या चंद्र पुन्हा आकाशी

(तड तड तड तड वाजत उठती, ताशे अन चौघडे
गुड्या तोरणे सडा अंगणी,जरीपटका फडफडे
भरून आनंद आज चहूकडे)

थोपविण्या गनीमा गेले मुलुखापार
फडकवला झेंडा भगवा अटकेपार
घरी येता वाहीन, ओवाळून जीव पायी

सुरेश नायर 
२/२०१६

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment

ये पावसा

ये पावसा मेघांचा रथ करुनी भेटून जा तू आनंदे बरसोनी  संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी  वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी सृष्टीच आहे सारी तुजसाठ...