Wednesday, March 9, 2016

जाईन दूर गावा - आरती प्रभू

आरती प्रभू यांची एक माझी खूप आवडती कविता. आयुष्यात मी लावलेली पहिली चाल या कवितेला सुचली. बागेश्री रागावर आधारित ही चाल या कवितेच्या भावाला समर्पक आहे असे मला वाटते (हीच चाल वापरून केलेली माझी स्वतंत्र शब्दरचना 'नाही मनास आता' या ब्लॉगवर आहे)


तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ यावा

शिंपित पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी स्पर्शू मलाच यावा

देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावा

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा

तारावरी पडावा केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

आरती प्रभू

No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...