वाळूची
पोती, सिमेंटचे ब्लॉक्स आणि खणलेले चर याचा आधार घेत, अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या
फैरी झडत होत्या. तासाभराची म्हणून उसंत नव्हती.
अचूक निशाण घेऊन कुणाला वर्मी मारणे हे फक्त आधी थोडे दिवस सुरु होते. नंतर नंतर बहुतेक
बंदुकीचे बार हे फक्त "खबरदार एक पाउल पुढे टाकले तर" असा दम भरण्यासाठी
होते. दिवस रात्र पाळत होती. दिवसाच्या रणरणत्या उन्हात वाळू तापून वाफेचे झोळ निघत
राहायचे. इथे तिथे थोडसं गवत यापलीकडे बाकी सर्व वैराण होतं. छोट्या छोट्या टेकड्या
आणि त्यामध्ये उतरण असा प्रदेश आणि त्याच्या अल्याड पल्याड दोन्ही सैन्याचे तळ. काही
ठिकाणी तर दोन्ही सैन्यात फक्त मोजक्या फर्लांगाचं अंतर होतं. अश्या उघड्यावर दिवसा
पुढे येउन शत्रूची फळी तोडणं अशक्यप्राय होतं. म्हणून दिवसा त्यातल्या त्यात जरा कमी
फैरी झडत. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कुणी काय करेल याचा भरवसा नव्हता. म्हणून
रात्री विशेष जागरूक राहायला लागायचं.
खरंतर
नियमानुसार ठराविक काळाच्या अंतराने, विश्रांती देण्यासाठी पुढच्या फळीची तुकडी मागे
पाठवून तिच्याजागी दुसरी तुकडी यायची. यामुळे नेहमी उत्साह आणि जोर टिकून असायचा. पण यावेळी सीमेच्या बऱ्यापैकी मोठ्या
भागावर एकाच वेळी गोष्टी तापल्या होत्या. सगळीकडचं वातावरण एकदम तंग होतं. म्हणून आहे
तीच तुकडी एका जागी अनेक महिने आपला जम धरून होती. दिवसा काय तो आळीपाळीने आराम व्हायचा
पण रात्री सर्वांनाच आपापल्या बंदुकी आणि जागा सरसावून सतर्क राहावं लागायचं. अर्थात
ही परिस्तिथी दोन्ही कडे लागू होती.
अधून
मधून नुसता आवाज आणि आरोळ्यावरून दोन्हीकडून एकमेकांना खबरदारीचा इशारा जायचा. एखादा
सैनिक जोरात ओरडून देशभक्तीपर घोषणा द्यायचा. मग त्याला साथ देत आणखी सैनिक आपला आवाज
मिसळायचे. मग दुसऱ्या बाजूने तसाच कल्लोळ माजायचा आणि कितीतरी वेळ कंटाळा येईपर्यंत
हेच चालायचे. काही दिवसांनी खबरदारीचा इशारा, याच्या ऐवजी वेळ जाण्यासाठी, म्हणून हा
एक प्रकारचा खेळ होऊन बसला होता. मग देशभक्तीपर घोषणांच्या जागी देशभक्तीपर गीते, मग
नुसतीच गीते (पण एकदम जोशदार) असं चालायचं. पलीकडच्या बाजूचे कुणाकुणाचे आवाज सुद्धा
ओळखीचे व्हायला लागले होते आणि त्यांना काल्पनिक, बऱ्याचदा गचाळ, शिवियुक्त नावे सुद्धा
देण्यात आली होती. कुणी डुक्कर, कुणी हराम
कि औलाद तर कुणी त्यापेक्षा वाईट काही.
शांतीच्या
काळात वर्षातून काही ठराविक प्रसंगी, म्हणजे
एकमेकांचे सर्वात महत्वाचे सण किंवा स्वातंत्र्य दिवशी म्हणा, दोन्ही बाजूंनी
भेटवस्तू व रुचकर खाद्यपदार्थ-मिठाई यांची देवघेव व्हायची. हे खूपच शिस्तबद्ध पद्धतीने
व बऱ्याच नियमांचे पालन करून व्हायचं. आणि फक्त वरच्या पातळीचे अधिकारी यात सामील असायचे.
सामान्य सैनिकांना एकमेकांशी फारशी सलगी करण्यास सक्त मनाई होती आणि अर्थात तशी संधी
सुद्धा नव्हती. पण तरीही काही अर्थी याचा परिणाम होऊन जरासा सलोख्याचा भाव यायचा आणि
थोडे दिवस का होईना बंदुका शांत व्हायच्या.
पण गेल्या वर्षापासून पेटलेले युद्धाचे वारे अजून शांत व्हायची जराही चिन्हे दिसत नव्हती.
राजकीय स्तरावर बोलणी, अंतरराष्ट्रीय देशांची मनधरणी, दटावणी, व मध्यस्ती असे सर्व
प्रकार चालू होते. पण इथे, खऱ्या मैदानावर, जो जीवघेणा खेळ चालू होता त्याच्या समाप्तीची
लक्षणे अजून केल्या दिसत नव्हती. अश्यात भेटी आणि मिठाई देण्याचा रिवाज मागे न पडला
तर नवल. अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या फैरी मात्र झडत होत्या.
जसजसे
दिवस जात होते तसतशी छावणीत काहीशी अस्वस्थता वाढत होती. सैन्याची सर्वात महत्वाची
गोष्ट म्हणजे, बरोबर कि चूक याचा विचार न करता, वरून आलेला नियम अचूक पाळणे. अधिकाऱ्यांसमोर
कसलीच तक्रार किवा साधी कुरकुर सुद्धा करायचा विचार कुणाच्या मनात नव्हता. स्वतः सैन्याचे
अधिकारी राजकीय घडामोडींच्या आणि निर्णयांच्या अधीन होते. पण तरीही वस्तुस्तिथी अवघड
होती. सुट्टी रद्ध झाल्यामुळे कुणाची लग्नाची तारीख येउन गेली होती, कुणाच्या घरात
कधीचा पाळणा हलता झाला होता, कुणाला जवळच्या माणसाच्या शेवटच्या क्षणी जवळ राहता आलं
नव्हतं. जवळच्या सगेसोयरे, मित्रमंडळी यांच्याशी साजरा करायचे वाढदिवस, सण वगैरे सर्व
प्रसंग निसटून जात होते आणि या सर्वांचा अंत कुठे दिसत नव्हता.
आज
वर्षाचा अखेरचा दिवस होता. मध्यरात्र उलटली कि नवीन वर्ष. जगभरात हा प्रसंग साजरा करायची
आता एक परंपराच झाली होती. धर्म-जात-पात-भाषा, गरीबी-श्रीमंती या कशा कशाला न जुमानता
जो तो जाणाऱ्या वर्षाला सलाम करीत नवीन वर्षाचं स्वागत करायला उत्सुक असतो. जणू काही
आपल्या अपुऱ्या इच्छा, आकांक्षा येत्या वर्षात पुऱ्या होतील, किंवा किंबहुना व्हाव्यात
अशी अपेक्षा करीत, सर्वांसोबत साजरा करायचा दिवस. इथे मात्र, गेल्या कित्येक महिन्यांच्या
घटनांवरून हाही एक असाच निसटून जाणारा दिवस, अशी भावना होती. सकाळी कवायतीच्या वेळी
एकमेकांना "संध्याकाळची पार्टी विसरू नका ", "खूप मजा करू" वगैरे
उपहासात्मक शेरे दिले जात होते. एकूण नेहमीपेक्षा जरा जास्तच चैतन्य कमी होतं.
मग
बातमी आली कि चोवीस तासाचा सीजफायरचा समझौता झालाय. आज दुपारी बारा ते उद्या दुपारी
बारा पर्यंत दोन्ही बाजूची शस्त्रं शांत राहतील. खूप दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय
प्रक्रियेला गती मिळाली होती. एका बहुराष्ट्रीय
परिषदेत महत्वाची बोलणी होणार होती आणि लढाई पूर्णपणे संपण्याची पुरेपूर खात्री वाटत
होती.
या
बातमीने सगळीकडे एकदम जल्लोष उठला. सुकलेल्या रोपाला पाणी घातल्यावर ते तरारून उठावं
तशी सगळ्यांची अवस्था झाली. एकूण रंग पाहून वरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संध्याकाळी
न्यू इयर पार्टीला परवानगी दिली. गावातून एक खानसामा बोलावून खास जेवणाचा बेत आखण्यात
आला. नेहमीपेक्षा मद्याचा कोटा वाढवला गेला. राष्टीय झेंड्या सोबत इकडे तिकडे थोडेबहुत
रंगीत कागद वगैरे सुद्धा फडकू लागले. कुणीतरी दिव्याची माळ लावली. संध्याकाळ होईस्तोवर वातावरण पूर्ण बदलून गेले होते.
हळू
हळू जमवा जमव सुरु झाली. चियर्सच्या आवाजात काचा एकमेकांना भिडू लागल्या. गप्पा टप्पा,
विनोद आणि त्यावरून उठणारे हास्याचे फवारे उठू लागले. अधेमध्ये पलीकडच्या बाजूने देखील
तसेच आवाज कानी येत होते. गेल्या कित्येक दिवसांचे चिंतेचे ओझे जणू गळून पडले होते
आणि एक निश्वासाचे, आशेचे, हलकेपणाचे असे विश्व तयार झाले होते. मधेच कुणीतरी खिशातून
मौथ ऑर्गन काढला आणि एक हलकीशी धून हवेत उठली. त्यात मग शब्दांची भर पडली आणि सूर उठले.
पण आजचे सूर जोशिले, रखरखीत नव्हते तर आनंदी, आतुर असे होते. अर्थात सगळेच काही या
सोहळ्यात सामील नव्हते. अजून ठिकठिकाणी पाळत होती, बंदुका सज्ज आणि सावध होत्या, फक्त
नेहमीच्या इतक्या संख्येत नव्हत्या.
तास
दोन तास असेच गेले. जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा सर्वांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
होती. खूप दिवस अंधारात राहिल्यावर उजेडाची सवय व्हायला वेळ लागतो, त्याचा त्रास होतो
तसं झालं होतं. मग हळू हळू त्यात ढील पडली, हलकेपणा आला, आणि सर्वजण खऱ्या अर्थाने
पार्टीचा आस्वाद घेऊन लागले. आणि तेवढ्यात धपकन आवाज आला. कुठ्न, कसला ते समजायच्या
आत जो तो क्षणार्धात सावध अवस्थेत गेला. रातकिड्यांच्या आवाजाखेरीज सगळीकडे चीडीचाप
शांतता पसरली. आणि कुणाचंतरी लक्ष एकदम मध्ये पडलेल्या एका फुटबॉल कडे गेले. त्याने
नुसताच इशारा करून दुसऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं. कुणीच काही हालचाल केली
नाही. इतक्यात टेकाडाच्या पलीकडून आवाज आला " हरामी साला, अक्कल नाही. सांगितलं
जपून कुठे मारतोय तिकडे लक्ष दे तर नाही. तुझ्या कॉलेजचं मैदान वाटलं का कुठेपण बॉल
मारायला. आता अंधारात शोधणार कुठे. आणि सापडला नाही तर खेळणार काय ? एकच तर होता"
आणि असेच बरेचसे कुरकुरते स्वर ऐकू येऊ लागले.
इतका
वेळ रोखून धरलेले श्वास आता सुटले. शरीरं ढिली पडली. जराशी हालचाल सुरु झाली. मग घोळक्यात
एकमेकांशी जरा कुजबुज झाली. आणि एकजण जोरात ओरडला " फुटबॉल शोधताय का ? इथे आमच्याकडे
आलाय ". आता पलीकडची बाजू मघासारखी शांत पडली. दाट धुकं साचावं तशी हवा दाटून
आल्याचा भास होत होता. ऐन लढाईच्या वेळी जितका तणाव कधी जाणवला नाही तितका आता जाणवत
होता. मग पलीकडून उत्तर आलं "हो, आमचा बॉल आहे. आम्ही काहीजण नुसतेच खेळत होतो".
त्यासरशी एकाने "होशियार, पाचच्या काउंटला बॉल येतोय" अशी आरोळी देत एक,
दोन, तीन, चार मोजले आणि पाचला एक जोरदार किक मारून बॉल, जिथून आवाज आला तिथे परतवला.
पलीकडून एकच आवाज उठला आणि कुणीतरी "खूप खुप धन्यवाद" असे ओरडले.
मग
हळू हळू दोन्हीकडून एक संवाद सुरु झाला. आधी 'हैपी न्यू इयर" अश्या शुभेच्छा एकमेकांना
दिल्या गेल्या. मग '"पार्टी कशी चालली आहे" वगैरे झाले. खायला पदार्थ काय,
प्यायला काय याचीही चौकशी होऊन गेली आणि उगाच "अरेरे आम्हाला पण ते खायला, प्यायला
आवडलं असतं" वगैरे झालं. नंतर काय बोलावे ते कळेना पण काहीतरी दुवा जुळला होता
तो तसाच सोडून जावं असं कुणाला वाटत नव्हतं. मग एकजण ओरडला "अरे सिझफयार आहे, शस्त्रं चालवायची नाही असा हुकुम आहे मग प्रत्यक्ष
एकमेकांची तोंडे तरी बघुयात. पुन्हा मौका मिळणार नाही". त्यासरशी पुन्हा शांतता
पसरली, तणाव जाणवला. आणि मग आवाज आला "चालेल पण हात रिकामे नको, तुमच्याकडचे चमचमीत
पदार्थ घेऊन या" आणि त्यासरशी हशा पिकला. मग दोन टेकाडाच्या मधून जिथे मोकळी मैदानासारखी
जागा होती त्याच्या दोन्ही बाजूच्या सीमारेषेवर सर्व जमले. दोन्हीकडचे एकदोन जवान धाडस
करून पुढे सरसावले आणि हळू हळू पावले टाकीत मध्यभागी आले. पुढे येउन एकमेकांचे हात
हाती घेत शुभेच्छा दिल्या. तसे इतरही जवान पुढे आले. काही जणांनी खरंच काही खायचे पदार्थ,
सिगारेट्स वगैरे भेटी आणल्या आणि एकमेकांना दिल्या. नावेगावे याची अदलाबदल झाली. तुटपुंजी
का होईना ओळख जमली.
माणुसकीचा
एक अभूतपूर्व सोहळा अगदी आपसूक, न सांगता, न ठरवता या रात्री इथे वाळवंटात घडत होता.
ओळखीच्या आवाजाला आज चेहरे आणि नावे आली होती. सीमा पुसट झाल्या होत्या. सर्वांना माहित
होते की जे होतं ते अल्पकाळा करताच होतं. त्याला खूप काही महत्व नव्हतं. उद्या कदाचित
बातमी येईल कि सलोखा झालाय, युद्ध संपलंय पण तेही नेहमीचेच टिकेल याचा नेम नाही. याआधीही
अनेकदा भडका उडालाय, त्यावर पाणी पडलंय आणि पुन्हा भडका उडालाय. आणि कदाचित बातमी येईल
कि बोलणी मोडून पडली. पुन्हा लढाईला सुरवात होउदे. पुन्हा तोफा डगडगू द्या. पुन्हा
आपआपली शस्त्रे हातात घ्या. मात्र यावेळेला
गोळी झाडताना पलीकडच्या वाळूच्या पोतींच्या आड, रात्रीच्या अंधारात दिसलेला एखादा चेहरा
असल्याचा भास होईल. आणि मध्ये दम घेताना पेटवलेली सिगारेट, कुणी दिलेली भेट असेल. पण
हे सर्व कदाचित नंतर आठवेल. ऐन निर्णयाच्या वेळी कर्तव्यात रुजलेली बोटे मात्र बंदुकीचा
चाप ओढताना अजिबात अडणार नाहीत.
जशी
जमली तशी हळू हळू पांगापांग सुरु झाली. एकमेकांचा निरोप घेत सारे एकेक करून मागे फिरू
लागले. मधलं मैदान पुन्हा रिकामं झालं. अनेक पावलांच्या ठश्यांच्या रेघोट्या मात्र सर्वत्र येता जाताना
दिसत होत्या. आणि अधून मधून, इथे तिथे फक्त पुसटश्या आवाजात ऐकू येत होतं "हैपी
न्यू इयर दोस्त, हैपी न्यू इयर"
सुरेश नायर
३/२९/२०१६
(काही
दिवसापूर्वी आम्ही बुक क्लब मध्ये पहिल्या महायुद्धावर पुस्तक वाचलं. तेव्हा 'Christmas Truce' बद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली व कुतूहल वाटले. मग जरा शोध घेताना
भारत-पाकिस्तान सैन्याचं होळी-ईदला वगैरे मिठाई देण्याबद्दल वाचले. सर्व एकत्र येउन ही कथा रचली. सुरुवातीला तसं ठरवलं नव्हतं तरी
लिहिताना कुठला ठराविक देश प्रदेश न देता neutral ठेवणेच योग्य वाटले. पात्रंही तशीच.
ही कथा जशी एक ठिकाणी घडली तशी इतरत्र कुठेही घडू शकते
***मला सैनिकी जीवनाचा काहीही अनुभव नाही. आहे ते सर्व काल्पनिक आहे. त्यामुळे तांत्रिक चुका भरपूर असू शकतात. त्याबद्दल क्षमस्व*** )
वा, ही एक वेगळी पार्टी ची गोष्ट.चांगली जमलीये आणि रंगलीये पार्टी.
ReplyDeleteशिल्पा.
धन्यवाद
Delete