Saturday, April 2, 2016

असा कधीही यावा

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा



असा कधीही यावा तो क्षण
जुनी पुराणी, पुसली आठवण
कवडस्यापरी, मनात माझ्या
क्षणापुरती का, चमकून जावी

असा कधीही यावा तो क्षण
वाहता वाहता, झुळूक एक ती
थबकून हलके, कानी माझ्या
जुनी सुरावट, आळवून जावी

असा कधीही यावा तो क्षण
डोळ्यापुढती चित्र देखणे
उभे राहावे जुने कशाचे
स्वप्नी अथवा जागेपणीही

असा कधीही यावा तो क्षण
सहज चालता वाटेवरूनी
पाठमोर वा, सावलीतुनी
भेट आपसूक, जुनी घडावी

असा कधीही यावा तो क्षण
वेळ जरासा, जावा थबकून
आणि पाऊले, घेत मागुती
सैर घडावी, भुतकाळची

सुरेश नायर 
४ /२/१६

No comments:

Post a Comment

असा मी असा मी

प्रत्येक माणसाचा एक मूळ जात्या स्वभाव असतो. पिंड म्हणा हवे तर. काही नैसर्गिक वृत्ती (introvert, extrovert, personality types वगैरे) तर काही ...