Friday, March 25, 2016

कुंपणापाशी ते रोप

कुठूनसं कधी एक रोप, माझ्या अंगणाच्या कोपऱ्यात
माझा डोळा चुकवून, अगदी सहज आपसूक रुजलं

कलमी गुलाबाच्या व इतर रोपांच्या ताटव्यापासून
दूर कुठेसं कुंपणापाशी, त्यानं आपलं मूळ धरलं

रोज ताटव्यातल्या रोपांना खतपाणी घालताना 
निगराणी करताना, टपोऱ्या फुलांना पाहताना

मन मोहरून जायचं, अभिमानाने भरून यायचं,
कुंपणापर्यंत नजर टाकायचं मात्र राहून जायचं

जेव्हा लक्ष गेलं तेव्हा टाकायचं होतं पार उपटून
पण वाटलं दुर्लक्ष केलं तर, जाईल स्वतःच मरून

मग पडले आजारी, राहिले अंथरुणाला खिळून
बागेत जाण्याइतकंही अंगात, त्राण नव्हतं उरून

निगराणीवाचून ताटव्यातली रोपं गेली सुकून
करपली सारी पाने अन पाकळ्या गेल्या गळून

बिछान्याशी खिडकीतून, विराण बाग दिसत होती
कलमी रोपांनी बाग कधी, आपली केलीच नव्हती

कुंपणापाशी ते रोप मात्र, झाड होऊन डवरलं होतं
बहरलेल्या फुलांनी मला, 'बागेत ये' खुणवत होतं

सुरेश नायर 
३/२०/१६

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...