Sunday, January 2, 2022

हे सुंदर जग मी पाहून जाईन




तुमचे छंद (hobbies) कोणते असा प्रश्न विचारला तर बहुतेकांच्या यादीतील पहिल्या तीन क्रमांकात प्रवास (travel) हे असतंच. मग ते फेसबुक असो की एखाद्या डेटिंग साईटचं प्रोफाइल असो. आजवर आयुष्यात तुम्ही केलेला प्रवास म्हणजे लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान एवढंच असो की अमेरिकेतल्या मिडवेस्टकरने पाहिलेला नायगारा असो. आवडीचा छंद - प्रवास! 

मीही काही याला अपवाद नाही. अगदी लहानपणी  शिवापूर, बनेश्वर, कात्रज प्राणीसंग्रहालय अश्या शाळेच्या सहली व्हायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत केरळला आजोळी (आणि मामाच्या गावाला) आगगाडीने लांबचा (एकमार्गी 40 तास) प्रवास व्हायचा. शाळेत वरच्या इयत्तेत गेल्यावर बंगळूर-मैसूर व देहली-आग्रा-हरिद्वार-ऋषिकेश अश्या मोठ्या सहली झाल्या. 

कॉलेजमध्ये असताना पंख फुटले आणि आली लहर केला कहर असे म्हणत खूपसे outing झाले. आपापल्या दुचाकी काढून मित्रांसोबत सिंहगड नाहीतर अलिबाग-किहीम-अक्षी समुद्रकिनारा इथे कित्येकदा गेलो. शिवाय रायगड, प्रतापगड, हरिश्चंद्रगड, वासोटा, ढाक-बहिरी असे ट्रेक्स झाले. एक लक्षात रहावी अशी कोकण (दाभोली, चिपळूण, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, गणपती पुळे) ट्रिप मित्रांसोबत झाली. इंजिनियरिंगच्या चार वर्षात मित्रांसोबत गोव्याला जायचे सारखे बेत व्हायचे ते शेवटी एकदा चार वर्षानंतर जमून आले आणि नंतर नोकरीनिमित्त संपूर्ण गोवा अनेकदा पालथा घातला. 

या सर्व भांडवलावर, प्रवास माझा छंद आहे, ही माझी भावना कधीतरी मनामध्ये दृढ झाली. अमेरिकेत स्थलांतर झाल्यावर स्थिरावयाला थोडा वेळ लागला. मग काम, संसार, मुले यामध्ये व्यस्त झालो तरी प्रवास झाला नाही असे नाही. नायगारा (हो तोच तो!), डिस्नेवर्ल्ड, स्मोकी माउंटन्स, न्यू यॉर्क झालंच तर कॅनडा येथील टोरोंटो, मॉन्ट्रियल, क्युबेक वगैरे झालंच. कॅम्पिंग हा प्रकारही आवडीने स्वीकारला. 

अश्यात यावर्षी पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेकलो. हे वय असे की आयुष्याच्या वजाबाकीला सुरवात होते (फक्त माधुरी दिक्षितनेच पन्नाशीत बकेट लिस्ट का बरं करावी). शिवाय गेल्या वर्षातील काही जवळच्या अनुभवानंतर आयुष्य किती क्षणिक असू शकते याची प्रखरतेने जाणीव झाली आणि "Seize the moment" याचे महत्व जाणवले. म्हणून सहज मी एक Excel sheet काढून आपण आजवर किती देश, राज्ये, प्रांत पाहिले याची नोंदणी केली. आणि गेल्या 22-23 वर्षात आपण पाव अमेरिका सुद्धा नीटसा पहिला नाही हे पाहून मला माझ्या 'प्रवास' छंदावर कीव करावीशी वाटली. प्रवास कधी आणि कुठे करायचा हे खूपश्या गोष्टी जुळून येण्यावर अवलंभून असते. सर्वांच्या सुट्ट्या, खाणे-पिणे-देखावे याच्या आवडी निवडी, चालण्याची व चढण्या-उतरण्याची क्षमता आणि त्यावर खिशाला भार. या सगळ्या गोष्टी विचारात घेताना आपलं खूप काही पहायचं राहून गेलं/ जाईल याची मला खंत वाटू  लागली. 

मग मनाचा ठिय्या केला की यापुढे आपण कुठला योग जुळून यायची वाट पहायची नाही, स्वतः गोष्टी जुळवून आणायच्या. मग इतर कुणाला जमत नव्हते म्हणून एकटाच व्हर्जिनियाला चार-पाच दिवसांची ट्रिप केली. शेनंडोह नॅशनल पार्क, न्यू गोर्ज नॅशनल पार्क आणि असे इतर काही निसर्गरम्य परिसर पाहिले, hiking, whitewater rafting याचा मनमुराद आनंद घेतला. लांबचा एकला ड्राईव्ह आजूबाजूचा रम्य परिसर पहात आणि Audible वर एक सुंदर कादंबरी ऐकून अगदी मजेदार झाला. ओळखीचे सोबत नसतील तर अनोळखी लोकांशी ओळख पटकन होते, मग ती ओझरती का असेना हे जाणवलं. तसंच South Dakota बद्दल माहिती काढून ट्रिप प्लॅन केली. इथे मात्र चार मित्र जमले आणि तिकडचा सर्व रम्य परिसर मनमुराद हिंडलो. नुकतीच Arizona आणि Utah इथे जाऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आणि मनमुराद भटकंती करून आलो. 

आता माझी एक बकेट लिस्ट तयार आहे. निदान ज्या देशात आपण रहातो त्यातली सगळी राज्ये पहायची. निसर्गाची आवड आणि अमेरिकेतले National Parks याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. जमलंच तर परदेशी सुद्धा जमेल तितकं जाऊन यायचं. असेल तर सोबत, नाहीतर एकटंच भटकायचं . जगात पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप आहे. प्रांत बदलला की निसर्ग, संस्कृती, खाद्यपदार्थ असं खूप खूप काही बदलतं. आयुष्यात त्यातलं जितकं समावून घेता येईल तेवढं घ्यायचं. 

पुलंचे एक भाषण आहे "हे जग मी सुंदर करून जाईन' ज्यात ते केशवसुतांच्या ओळींचा संदर्भ देत कलानिर्मिती बद्दल बोलतात - "प्राप्तकाल हा विशाल भुधर, सुंदर लेणी तयात खोदा". खरंतर प्रत्येकाला काही लेणी खोदण्याइतका वेळ किंवा तितकी कलात्मकता असेल असे नाही. पण ह्या जगात जे आधीपासून सुंदर आहे ते पहायला, अनुभवायला सर्वानाच जमू शकते. ते सर्व पहायला म्हणून एक जन्म खरंतर कमीच आहे. म्ह्णून मी म्हणेन "प्राप्तकाली या विशाल भूधरी, जे जे सुंदर, ते ते शोधा" 

सुरेश नायर

Dec 2021

No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...