गालावरून कधी तुझ्या
आसवांचे ओघळणे
हेही एक रूप तुझे
भासते लोभसवाणे
देहरूपी सतारीला
हृदयाची एक तार
रात्रंदिवस छेडी जणू
श्वासांचा गंधार
माझ्या मृत्यूवर माझा
राग मुळी नसावा
मात्र एक अश्रू तेव्हा
डोळ्यात तुझ्या असावा
चारचौघात तुला पाहूनही
न पाहिल्यासारखं करते
एकांतात मात्र तू नसतानाही
तुलाच पाहत असते
तू जवळी असते
भान मला नसते
क्षण क्षण जाती कसे
रात्र कशी सरते
सारेच सुखाचे सोबती
दुख्खात कुणीच नसते
प्रकाशातली सखी सावलीही
अंधारात सोबत नसते
प्रेमातले रुसवे फुगवे
सागरासारखे असावे
ओहोटीला दुरावा जरी
भरतीला मागे फिरावे
स्वर्गलोकीचा प्राजक्त
पृथ्वीवर उभा असतो
आसवांची फुले करून का
ढाळीत सदा असतो?
माणसे तशीच राहतात
युग फक्त सरते
महाभारतातली द्रौपदी
कलियुगातही झुरते