रानातून जाणारी ती एकमेव वाट
सत्तर वर्षापुर्वीच नाहीशी झाली
उन-पावसाच्या नित्याच्या खेळात आणि,
झाडाझुडपांच्या गर्दीत, ती कुठेशी हरवली
आता कधी तुम्ही तिथे गेलात
तर तुम्हाला कळणारही नाही
कि सत्तर वर्षापुर्वी या रानातून
एक छानशी वाट जात असे
आता तिथे आहेत, फक्त पाखरांची घरटी
आणि मुंग्यांची विचित्र आकाराची वारुळं
नाही म्हणायला, कोल्हे , ससे फिरतात दिवसभर
वा ऐकू येते कुणा सुतारपक्षाची अखंड टकटक
पण तरी सुद्धा, एखाद्या संध्याकाळी
जेव्हा अंधार सगळीकडे दाटत असतो
आणि गार वार अंगाला झोंबत असतो,
जर का तुम्ही त्या रानात गेलात
तर तुम्हाला ऐकू येईल, घोड्यांच्या टापांचा
मंद आणि एकलयी आवाज
आणि दिसेल कुठेतरी अधून मधून,
धुक्यात फडफडणारे ते श्वेत वस्त्र
जसे काही कुणीतरी एकटंच दौडतय
संथ गतीने, त्या धूसर एकांतात
त्या पावलांनाही ती एकमेव वाट
अनोळखी नाही, परिचित आहे
पण रानातून जाणारी ती वाट तर
सत्तर वर्षापुर्वीच नाहीशी झाली!
(मुळ कविता रुड्यार्ड किप्लिंग यांची – 'The Way Through The Woods')
यंदाच्या कॅम्पिंगची गोष्ट आहे. रिवाजाप्रमाणे रात्री शेकोटी भोवती मंडळी गोळा झाली आणि अंताक्षरीला सुरुवात झाली. मधेच एका मित्राने 'अरे गाणी पुरे झाली, आता भुताच्या गोष्टी सांगा' अशी मागणी केली. हिंदी-मराठी गाण्यांच्या सुलभ आणि ओळखीच्या वाटेवर रमलेल्या सर्वांना मात्र ही भूताटकीची वाट रुचली नसावी, म्हणून या मागणीला फारसा दुजोरा मिळाला नाही. किंवा 'भुताच्या गोष्टी सांगायला लहान का आहोत' असा विचार आला असेल कदाचित मनात.
असो. आपले हे असेच होते. ज्या गोष्टीबद्दल एका वयात कुतूहल, गूढ , भीती वगैरे वाटते ते सारे पुढे मात्र नाहीसे होते. आपण 'mature' होतो कि आपल्या भावनांचा कोवळेपणा जाऊन निबरपणा येतो कोण जाणे. माझ्या मनात मात्र यावरून दोन गोष्टी आठवल्या. एक म्हणजे रुड्यार्ड किप्लिंग यांची आम्हाला असलेली कॉलेज मधील कविता व त्याचे मी केलेले मराठी रुपांतर आणि आमच्या लहानपणीची 'निंबाची अळी '.
लहानपणी आम्ही पुण्याला फर्ग्युसन रस्त्यावर राहायचो त्या चाळीच्या मागच्या बाजूला एक छोटीशी अरुंद गल्ली होती. भरभर चाललो तर ५-७ मिनिटात अंतर कापता येईल एवढी. दोन्ही बाजूला झाडांनी व्यापलेली, फक्त काही घरांची मागची बाजू ओझरती दिसे. रीतसर नावहि नव्हते तिला. पण दोन तीन कडूलिंबाची झाडे होती म्हणून कि काय तिचे नाव 'निंबाची अळी' असे पडले होते. मुळ रहदारीचा रस्ता नसल्यामुळे भर दिवसा आम्ही मुले खुशाल सायकल चालवणे, चोर पोलीस, लंगडी असे खेळ तिथे खेळत असू. संध्याकाळ झाली आणि अंधारून यायला लागले कि मात्र आमचा तिथे वावर नसे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत हनुमान टेकडी, कमला नेहरू पार्क अशा ठिकाणी संध्याकाळी आम्हा पोरांची टोळी फिरायला, खेळायला जायची. परत येताना मात्र 'निंबाच्या अळी' चा shortcut चुकवत जरा लांबचा वळसा घालून आम्ही घरी येत असू. एकही दिवा नसलेली, झाडांमुळे अधिकच अंधार गुडूप अशी, रात-राणी, जाई-जुई, चाफा यांच्या वासाने घमघमलेली ती अरुंद वाट, आम्हाला अगदी भयावह वाटे. त्यात अस्सल चाळीचा गुणधर्म त्यामुळे येवढ्याचे तेवढे होऊन भुताखेताच्या अनेक कथा त्या गल्लीशी जुळल्या होत्या. पांढरी साडी घालून फुले वेचणारी बाई, दोन मजली असा उंचच उंच माणूस, सायकल चालवणारी उलट्या पायाची पोरे अशा एक ना दहा कथा. कदाचित मुलांनी संध्याकाळी मुकाट घरी येऊन अभ्यास करावा म्हणून मोठ्यांनीच भीती घातली असेल!
यामुळेच कि काय कदाचित कॉलेज मध्ये असताना ही कविता वाचली तेव्हा मनात घर करून बसली. आपली मराठी भाषा कवितेत समृद्ध आहे, विषयही वेगवेगळे. पण अशी एखादी कविता वाचल्याचे मला आठवत नाही. मुळच्या कोकणातले श्री. ना. पेंडसे, गोनीदा, आरती प्रभू यांच्या कथा कादंबरीत अशा गूढ भुताखेताच्या गोष्टी आढळतात. पण कवितेत मात्र अगदी नाहीच म्हणा ना. असो, नक्की कारण आठवत नाही पण मी या कवितेचे रुपांतर केले एवढे खरे. रुपांतर हा शब्द मुद्दाम वापरला कारण हे शब्दशः भाषांतर नाहीये. उदाहरणार्थ वातावरण निर्मितीकरता किप्लिंगच्या रानातले otter, badger, ring-dove असे प्राणी, पक्षी जाऊन तिथे मुंग्यांची वारुळं, ससे, कोल्हे, सुतारपक्षी आले. काही ठिकाणी मात्र मूळ कवितेचे शब्द जसेच्या तसे आणले (Misty Solitudes - धूसर एकांत).
इंटरनेटवर पुन्हा ही कविता शोधताना अनेकांनी त्याचे केलेले रसग्रहण वाचायला मिळाले. कुणाला त्यातले गूढ वातावरण आवडले, तर काहींच्या मते सत्तर वर्षाचा काळ हा साधारण माणसाचा जीवनकाल, म्हणून ती वाट म्हणजे आपला हरवलेला आयुष्यकाल आहे, वगैरे, वगैरे. मला मात्र या हरवलेल्या वाटेसारखी लहानपणीची ती 'निंबाची अळी' आठवते. आता ती चाळहि गेली आणि ती अरुंद गल्लीही. आहे फक्त एक भली मोठी office complex ची ईमारत, सदैव माणसांनी गजबजलेली. रात्री सुद्धा दिव्यांच्या प्रकाशात लखलखणारी. कुणाला शोधूनहि दिसणार नाही ती निंबाची झाडं, ती वाट. किप्लिंगच्या हरवलेल्या वाटेवर दौडणार्र्या त्या अनोळखी स्वारासारख्या, माझ्या आठवणी मात्र त्या अंधारलेल्या 'निंबाच्या अळीत' कधीकधी फिरून येतात. रातराणी आणि चाफ्याचा घमघमाट येतो. डोळे घट्ट मिटले जातात. क्षणभर अंगावर काटा येतो, आणि तसाच निघून जातो.……
सुरेश नायर
९/२००९