किशोरी अमोणकर |
किशोरी अमोणकर |
किशोरी अमोणकर |
जानेवारी '९४. नव्यानेच कामाला लागलो होतो. त्यामुळे महिन्याचा पगार झाला कि खरेदीचा उत्साह असायचा. त्यातली एक महत्वाची खरेदी म्हणजे गाण्याच्या कॅसेट घेणं. असाच एका संध्याकाळी, पुण्याच्या गरवारे पुलाजवळील एक छोट्याश्या दुकानात कॅसेट्स चाळत होतो. तिथल्या टेपवर काहीतरी लागलेलं होतं त्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं. माझ्याच तंद्रीत असूनदेखील डोळयांच्या कोनातून मला काहीतरी घडताना दिसलं. एक जोडपं दुकानासमोरून गेलं, आठ दहा पावलं जातो न जातो तोच दोघे एकदम थांबले आणि मागे वळून दुकानापाशी आले. मग टेपवर काय लागलंय याची आतुरतेनं चौकशी करून, ती कॅसेट लगेच विकत घेऊन, दोघे एखादा खजिना मिळाल्याच्या आनंदात निघून गेले.
इतक्या वेळ लक्ष न देणारा मी, मग कान देऊन जे काही वाजत होतं ते ऐकायला लागलो आणि ते आवडलं सुद्धा. किशोरी अमोणकर यांचा हंसध्वनी रागातला एक तराणा होता तो. ही ताईंच्या (किशोरी अमोणकर) गाण्याशी माझी पहिली भेट. अर्थात ती कॅसेट मी विकत घेतली, ऐकून त्याची पारायणं केली खरी, पण शास्त्रीय संगीतातलं काडीमात्र ज्ञान त्यावेळी मला नव्हतं. आणखी किमान दहा वर्ष तरी जावी लागली राग म्हणजे काय, तो कसा ओळखावा, त्यातले स्वर कोणते हा सर्व बोध व्हायला. हा बोध होण्याकरिता जो शोध घेतला, त्यात कितीतरी गायक आणि वादकांचे शास्त्रीय संगीतातले निरनिराळे प्रकार मी पुन्हा पुन्हा ऐकले, अजूनही ऐकतो. पण फिरून फिरून माझ्या मनाला भावतं ते किशोरी ताईंचं गाणं.
किशोरी अमोणकर या नावाला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात तेच मानाचं, आदराचं स्थान आहे जे कदाचित सचिन तेंडूलकरला क्रिकेटच्या खेळात आहे (कुणालाही सहज लक्षात येईल म्हणून हा संदर्भ). त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे, ते इथे बरळण्याचा माझा हेतू नाही. स्वतंत्रपणे त्यावर भाष्य करावे इतकी माझी खचितच पात्रता नाही. मी मांडतोय ते फक्त मला त्यांच्या गाण्याने येते ती अनुभूती, आणि त्याचं काहीसं विश्लेषण.
बरेचसे मोठमोठे गायक आपल्या गायकीची करामत दाखवण्याच्या मोहाला बळी पडतात. लांबलचक ताना घ्या, खर्ज लावून मंद्र सप्तकात भटकंती करा, एखादा स्वर घेऊन एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात उडी घ्या, श्रोत्यांनी एकदा तिय्या घेताना दाद दिली कि पुन्हा पुन्हा तिय्या घ्या, तबलेबुवाशी जुगलबंदी करा असले नाना प्रकार चालतात. अर्थात श्रोतेही याला तितकेच जबाबदार आहेत. तर नवीन गायक गुरुचं अनुकरण करण्यापलीकडे फारसं काही नवीन दाखवत नाहीत. अगदी ठरलेले ३-४ राग पाठ केल्यासारखे आळीपाळीने गायचे हेही चालतं. अर्थात या सगळ्याला अपवाद आहेतच.
किशोरी ताईंचं गाणं मला यातून हमखास वेगळं वाटतं. एखाद्या प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात, मंत्रोच्चाराच्या घुमत्या नादस्वरात, शिवलिंगावर अभिषेक होत राहावा तसा हा अनुभव. सुरुवातीला स्वरमंडलाचे स्वर ऐकू येतात तिथेच याचा आरंभ होतो. मग आलाप, बंदिशीचे बोल यातून रागाचा विस्तार मंदगतीने सुरु होतो. तो सतत पुढे जात राहतो, पण एखाद्या निसर्गरम्य प्रदेशातून एक आगगाडी धीम्या गतीने जात राहावी आणि आपण आजूबाजूच्या सृष्टीचे मुक्तपणे दर्शन घेत राहावे, तसा काहीसा हा अनुभव. स्वरसंगतींचा निरनिराळा अविष्कार आपल्यापुढे उलगडत राहतो पण कुठेही घाई नाही, अनावश्यक हरकती नाहीत. केवळ असीम रसनिष्पत्ती यातून होत राहते. आणि मग पावसाच्या एका थेंबाने जन्म घेणारा धबधबा, त्याच्या वाढत्या जोराने बळ धरून, शेवटी एखाद्या कड्यावरून झेपावा तसा द्रुत मार्गाने जाऊन तो राग आपला परमोच्च क्षण गाठतो. श्रोत्याची चिंब भिजूनही तृषित राहावे अशी अवस्था होते!
मी मांडलेला हा अनुभव काहीसा स्वप्नाळू, रोमांचकारी असेल पण प्रत्येकदा ताईंचं गाणं ऐकताना मला असाच काहीसा आभास होतो. मग त्यांचा 'गौड मल्हार' ऐकताना एखाद्या ढगावर बसून डोंगर दरयांवरून स्वैर फिरल्याची जाणीव होते, 'अहिर भैरव', 'रागेश्री' ऐकताना 'रसिया म्हारा' किंवा 'पलक न लागी' म्हणणाऱ्या विरहिणीच्या व्यथेशी मी एकरूप होतो. 'मीरा मल्हार' मधील 'तुम घन से घनश्याम' ऐकताना मनाची एक अद्भुत, निरामय, शांत अवस्था होते, मीराबाईंची कृष्णभक्तीत व्हावी तशी. तर 'शुद्ध कल्याण' किंवा 'भूप' हा निव्वळ मुक्तानंदाचा अनुभव देतात. असे एकाहून एक सरस रागाविष्कार - यमन, विभास, भिन्न-षडज, संपूर्ण मालकौंस, भीमपलास, बागेश्री, देसकार, …… मनाला हवं तेव्हा हवा असेल तो भाव निवडावा आणि मोक्ष गाठावं.
मी जे वर सांगितलं तो एक रसिक श्रोता, त्यांच्या गाण्याचा भोक्ता या भूमिकेतून घेतलेला अनुभव. पण मग ताईंच्या मुलाखतीतून, लेखातून त्यांचे संगीतातील 'रस' आणि 'भाव' या विषयावरचे विचार ऐकले कि जाणवतं त्यांनी याचा सखोल अभ्यास करून ते आपल्या गायनात प्रत्यक्षात कसं आणलंय ते. केवळ परंपरागत वारसा म्हणून आलेलं स्वीकारावं आणि श्रोत्यांसमोर मांडावं यावर समाधान न मानता, श्रोत्यांच्या हृदयापर्यंत ते संगीत पोचावं, त्या स्वरांशी स्वतः आणि श्रोते एकरूप व्हावेत हा ताईंचा प्रयत्न एका कलावंताचं श्रेष्ठत्व दाखवतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "I want to plunge into the essence of the Swaras. The most important thing is the value of the sound. Explore it! Every feeling has its inherent rhythm. Find it!” आणि मग त्यांच्या आवडत्या भूप रागातल्या, त्यांनीच रचलेल्या आणि सुरात बांधलेल्या शब्दांचा अर्थ उमगतो
सहेला रे, आ मिल गाये,
सप्तसुरन के भेद सुनाये
जनम जनम को संग न भुले,
अब के मिले सो बिछुडा न जाये
मी स्वतःला भाग्यवान समजतो कि या जन्मी किशोरी ताईंच्या गाण्याशी माझं सख्य जुळलं. आणि हीच प्रार्थना करतो कि प्रत्येक जन्मी मला हाच अनुभव यावा, हे सख्य कधीही न तुटावं.
सुरेश नायर
(डिसेंबर २०१३)